पान:निवडक अंतर्नाद.pdf/५१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ह्याविषयी ते सतर्क असत. म्हटलं तर ही फार किरकोळ, बिनमहत्वाची, क्षुल्लक बाब आहे; म्हटलं तर ही अंतर्नादला अपेक्षित कार्यसंस्कृती आहे अंतर्नाद कशासाठी, याबाबत त्यांची भूमिका अगदी चोख होती. त्यांनी ती वारंवार जाहीरही केली होती व त्या भूमिकेशी त्यांनी कायम बांधिलकी ठेवली. कुठल्याही साहित्यिक वादात न पडता, डावे-उजवे अशा विचारसरणीत न पडता या मासिकाने प्रदीर्घ वैचारिक लेख प्राधान्यपूर्वक प्रकाशित केले. दत्तप्रसाद दाभोळकर, नरेंद्र चपळगावकर, राम शेवाळकर, सुरेश द्वादशीवार, ज्ञानेश्वर मुळे, यास्मिन शेख, मधु मंगेश कर्णिक, द. भि. कुलकर्णी, अरुण गद्रे ही अगदी सहज आठवणारी नावं, काळे यांना मुळातच सामाजिक कामाविषयी विशेष आस्था असल्याने तसले विषय मासिकात वारंवार येत होते. 'स्वयंस्फूर्त कार्याचे समाजजीवनातील स्थान यावर १९९९ साली दिवाळी अंकही प्रकाशित केला. कलाक्षेत्रही वाचकांसमोर येत राहावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अंतर्नादची मुखपृष्ठं अनेक प्रयोग करून पाहणारी असत. मुखपृष्ठावर कविता प्रथितयश तसंच नवोदित चित्रकारांची चित्रं असत या सगळ्यात दर्जा राखताना कुठेही तडजोड नव्हती, पण अनाठायी चकाचकही नव्हती. अतिशय साधं, तरीही प्रसन्न, देखणं मुखपृष्ठ ही एक खासीयत या मासिकाने नेटाने जपली, अंतर्नादची खासियत असणारं आणखी एक सदर म्हणजे प्रतिसाद, कुठल्याही लेखकाला आपल्या लेखनाविषयी वाचकांची मतं ऐकण्याची स्वाभाविक उत्सुकता असते. या सदरातून वाचकांच्या सविस्तर प्रतिक्रिया छापून येत असत, विषयाच्या अनुषंगाने चर्चा चालत व यामध्ये वाचकाबरोबर बऱ्याचदा लेखकही उतरत, एक निखळ मनमोकळा संवाद घडत असे. प्रत्येक वाचकाचा त्याच्या हस्ताक्षरात लिहिलेला प्रतिसाद वाचणं, हा आमच्यासाठी फार आनंदाचा भाग असायचा. आता अशी वाचकांची प्रतिक्रिया दुर्मीळच असणार आहे. अंतर्नादला दहा वर्षं पूर्ण झाल्यावर काळे पुन्हा एकदा आपल्या लेखनाकडे वळले. पूर्वीही त्यांचं बरंच लेखन प्रकाशित झालंच होतं. तिसरी चांदणी, कॉम्रेड यांसारख्या राजकीय व सामाजिक विषय अत्यंत प्रगल्भतेने मांडणाऱ्या दोन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या. आता ते जागतिकीकरणात 'बदलता भारत' पाहात होते. त्यासाठी प्रवास करत होते. माहिती घेणं, संदर्भ शोधणं, विषयाच्या आसपासच्या गोष्टींचं वाचन, चिंतन आणि त्यातून निकर्षापर्यंत येत, लेखन-पुनर्लेखन करत त्यांनी 'बदलता भारत' मधले लालित्यपूर्ण भाषेतले लेख पूर्णत्वास नेले आहेत. वेळोवेळी संपादकीयातून केलेल्या लेखनाचं 'अंतरीचे धावे' हे पुस्तकही पाठोपाठ मौजतर्फेच प्रकाशित झालं. अंतर्नाद बंद करण्याची चर्चा या पुढच्या टप्प्यावर लोकांसमोर आली. २०१७ साली अंकातल्या संपादकीयात त्यांनी ह्याविषयी ठळक उल्लेख केला. त्यावर वृत्तपत्र, फेसबुक, व्हॉट्सअप यांसारख्या माध्यमातून बरीच उलटसुलट चर्चा सुरू झाली. "अंतर्नादने नव्या लेखकांचा शोध घेतला नाही, ते 'मनोरा संपादक आहेत वगैरे,” या काळात मी अंतर्नादच्या कामात सहभागी नव्हते व त्यामुळे चर्चेत पडून काही बोलणं मला उचित वाटत नव्हतं; पण वेळोवेळी अनेक लेखकांचं पहिलं लेखन अंतर्नादमध्ये छापून आलेलं माझ्या स्मरणात होतंच. अनेक वर्षं अंतर्नादमध्ये मी पूर्णवेळ काम केलं होतं. या काळात नव्या लेखकांसाठी वेळोवेळी राबवले गेलेले उपक्रम, त्यातला माझा उत्साही सहभाग आणि काळे यांनी सगळ्या उपक्रमात कुठेच समोर न येता, दिलेला संपूर्ण पाठिंबा मला स्पष्ट आठवत होताच, आजही आठवतो. नव्या लेखकांसाठी अंतर्नादने दोन वेळा कार्यशाळा घेतली होती. अनेक नवेजुने लेखक त्यात सहभागी होते. ते केवळ मुंबई- पुण्यातले नव्हते, तर इतरही अनेक गावांतून आलेले होते. अगदी सुरुवातीच्या काळातही एका नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेणारा लेख लिहिण्यासाठी त्यांनी एका तरुण होतकरू लेखिकेला बऱ्याच लांब पाठवलं होतं. छोटे-छोटे वाचकगट करून त्यांच्यासाठी काही कार्यक्रम आयोजित केले जात असत, मनकविता हे कवितेविषयक खास सदर दोन वर्षं मासिकात सुरू होतं. महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत कवींनी या सदरात लिहिलं होतं. या सदराच्या समारोपाच्या मुंबईतील कार्यक्रमात अनेक कवी उपस्थित होते. अतिशय हृद्य, देखणा आणि कसदार कार्यक्रम या निमित्ताने पार पडला होता, अंतर्नादच्या कितीतरी लेखकांनी आज मोठा नावलौकिक मिळवला आहे. अंतर्नादमध्ये प्रकाशित झालेल्या कितीतरी सदरांची पुस्तकं झाली आहेत. कितीतरी लेखकांना अंतर्नादच्या निमित्ताने उत्तम मैत्र लाभलं आहे पंचवीस वर्षं हा तसा मोठा प्रवास आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भवताल त्याच्या वेगानं पुढे सरकत आहेच, पण या काळातही एका कोपऱ्यात राहून अंतर्नादने जे काम केलं त्याची ठळक नोंद घ्यायलाच हवी. प्रत्येक अंक हाती आल्याबरोबर काळेंना मनःपूर्वक आनंद वाटायचा, बारीकशी चूक नजरेस पडली तरी बेचैन होतानाही त्यांना पाहिलं आहे. नव्या आणखी दमदार मजकुराचा पाठलाग व त्यासाठी होणारी त्यांची तगमग ह्या सगळ्याची मी साक्षीदार आहे त्यांना त्यांच्या मनासारखा अंतर्नाद प्रकाशित करता आला का ? याचं उत्तर बहुधा 'नाही' हेच असावं. एकदा माझ्याशी बोलताना ते म्हणाले होते, "अंतर्नादमध्ये मी पूर्ण यशस्वी झालो असं मला वाटत नाही. मुळात मासिक कितीही निष्ठापूर्वक चालवलं तरी त्याच्या काही मर्यादा आहेत; अनेकांना बरोबर घेऊन जावं लागतं.” आज अक्षरधाराच्या अंकाचं संपादन करत असताना, किंवा इतरही प्रकाशकांच्या पुस्तकांचं संपादन करताना वेळोवेळी अंतर्नादच्या कामातला अनुभव हाताशी येतो. विषयाकडे व्यापकतेने पाहणं, अभ्यासू वृत्ती, नव्या साहित्याकडे बघण्याची असोशी, माणसं वाचत राहण्याची सवय ह्या सगळ्यांचे मूलभूत धडे नकळत गिरवले गेले. आणि या सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपल्या कामातून तयार होणारी आपली जीवनवृत्ती, सकस, सहज, आणि संवेदनशील माणूस बनण्याची आच या काळात अंगी नकळत बाणवली गेली. आणखी किती अपेक्षा असते एका कामाकडून? (ललित दिवाळी अंक २०२० मधील लेखाचा संक्षेपित भाग) स्नेहा अवसरीकर (९९२३४ १७०६६) निवडक अंतर्नाद •५०९