पान:निवडक अंतर्नाद.pdf/५०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चित्रकार माळी, जाधव यांचे समर्पक रेखाटन. शं.वा. किं. ची हास्यचित्रे आनंदात भर टाकायची, मुखपृष्ठावरील सुंदर बाया जीव कासावीस करत, दिवाळी अंकही जाडजूड आणि सुरेख असायचा. पण सगळ्यात गाजली ती महादेवशास्त्री दिवेकरांची 'बुवाबाजी व स्त्री' ही धक्कादायक लेखमाला, उपासनी महाराज तर होतेच पण आणखीही होंगी संत आणि बुवा यांची वस्त्रे किर्लोस्करने टराटरा फाडली होती. बुवाबाजीला आळा घालण्यात अक्षरे किती प्रभावी ठरतात याचे हे ज्वलंत उदाहरण पुरोगामी महाराष्ट्र उभारण्यात किर्लोस्करचा मोलाचा वाटा होता. आणखी एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे. कॉलेजात असताना १९५० मध्ये 'मनोहर'ने माझा एक लेख छापला होता, त्या अंकाबरोबर लेखाची दोन कात्रणे व रु. १५ची मनिऑर्डरही आली होती, म्हणजे कमालच! कारण माझा मासिक पॉकेटमनी रु. २० होता. किर्लोस्कर मासिक चोख आणि ताबडतोब मोबदला पाठवायचे. (अंतर्नादने तो कित्ता गिरवला आहे, ही सुखदायक गोष्ट.) मागे वळून बघताना वाटते, माझ्यात सुसंस्कृतपणाचा काही अंश असेल, तर तो रुजवण्यात किर्लोस्करच कारणीभूत होता. अशी मासिके आता का बरे निर्माण होत नाहीत? किशोर आरस, ताडदेव, मुंबई (दिवाळी २०१३) शेवटी नुकसान होते ते देशाचेच मार्च अंकातील डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांचा लेख (लॉग-इन आयडी आणि पासवर्ड विसरलेली सुवर्णभूमी) आवडला माझ्या भारतभेटीमध्ये डॉ. विजय केळकर, प्रभाकर देवधर यांसारख्या मित्रांबरोबर मी या विषयावर चर्चाही केली. दाभोळकर यांच्या प्रतिपादनाशी मी पूर्णत: सहमत आहे. नर्मदाप्रकल्पाच्या वेळी मी जागतिक बँकेशी संलग्न असलेल्या एका संस्थेबरोबर काम करत होतो. बँकेच्या अध्यक्षांनी एका प्रख्यात कॅनेडियन संस्थेची प्रकल्पाचे फायदे व प्रकल्पावरील आरोप यांचा अभ्यास करण्यासाठी नेमणूक केली, त्या कॅनेडियन संस्थेचा उत्कृष्ट अहवाल पुस्तकरूपाने प्रकाशितही झाला. प्रकल्पग्रस्तांचे योग्य तसे पुनर्वसन न केल्याबद्दल अहवालात भारत सरकारवर ठपका ठेवला होता. पण त्याचबरोबर प्रकल्पाचे फायदेदेखील अहवालात अधोरेखित केले होते. बँकेने घालून दिलेल्या निकषांची शासनाने पूर्तता केली नाही म्हणून बँकेने आपले कर्ज रद्द केले. नर्मदाप्रकल्प पार पडल्यावरही गेल्या काही वर्षांमध्ये मी अनेकदा गुजरातला गेलो आहे. कधीकधी तर वर्षातून तीनदा माझे जाणे होत असते. माझ्या कामाचे मुख्य क्षेत्र खते व कृषिरसायने हे असल्याने पार कच्छपर्यंतच्या ग्रामीण भागातही माझे जाणे होते. या सर्व परिसरातील शेती व पाणीप्रश्न यांत प्रचंड सुधारणा झाल्याचे मी पाहिले आहे. उत्तम काम करणाऱ्या काही अपवादस्वरूप संस्था वगळता बहुसंख्य एनजीओंचा कार्यक्रम (अजेंडा) मात्र मला संशयास्पद वाटत आला आहे. त्यांच्या कारवायांमुळे व त्यातून झालेल्या विलंबामुळे दोन उत्कृष्ट प्रकल्प तीन-चार वर्षांच्या मेहनतीनंतर कसे रद्द करावे लागले याचा मी स्वतः एक साक्षीदार आहे त्यातला एक भारतात तामिळनाडूमध्ये होता व दुसरा थायलंडमध्ये होता. माझ्या व्यावसायिक कारकिर्दीतलाच हा प्रत्यक्ष अनुभव होता. दोन्ही प्रकल्पांमधील एकत्रित गुंतवणूक (त्यावेळचे) ९० कोटी डॉलर्स होती, अणुऊर्जा प्रकल्पाबाबतही माझ्या भावना अशाच आहेत. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या जैतापूर प्रकल्पाचे सुरक्षानिकष हे निश्चितच पूर्वीपेक्षा खूप अधिक काटेकोर आहेत. तंत्रज्ञानही आता पूर्वीपेक्षा खूप जास्त पुढारलेले आहे. अणुऊर्जावापराचे फ्रान्स हे उत्तम उदाहरण आहे. ते वापरत असलेल्या एकूण ऊर्जेपैकी ८५ टक्के ही अणुऊर्जा आहे. अणुऊर्जाक्षेत्रात चाळीस चाळीस वर्षे काम केलेल्या माझ्या तीन मित्रांकडून मी या विषयाची शहानिशा करून घेतली आहे. दुर्दैवाने काही राजकारणी नेते अशिक्षित जनतेचा फायदा उकळतात आणि काही उच्चशिक्षित लोकही या प्रश्नाबाबत लोकांच्या भावना भडकवत ठेवतात. शिवाय, तसे करताना ते कुठलाही उचित पर्याय मात्र लोकांपुढे ठेवत नाहीत. शेवटी नुकसान होते ते देशाचेच! डॉ. आनंद बर्वे, वॉशिंग्टन डिसी, युएसए, (दिवाळी २०१५) नैराश्य दूर करणारे लेख 'नव्वदीतली नवलाई' हा प्रा. यास्मिन शेख यांच्यावरील आपला संपादकीय लेख सुरेख. नव्वदीतही स्वतःच्या दैनंदिन व्यवहारात स्वत:ला गुंतून ठेवून दिवसभर कुठल्या ना कुठल्या कामात गर्क असणे व क्षणाचीही विश्रांती वा वामकुक्षी न घेता हसतमुखाने वावरणे, या त्यांच्या जीवनशैलीला मनापासून दाद द्यावीशी वाटते. मराठी भाषेवर त्यांनी असामान्य प्रभुत्व मिळवले व आज 'अंतर्नाद' सारख्या मासिकाच्या त्या व्याकरण- सल्लागार म्हणून काम करत आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे त्यांची कन्या डॉ. शमा भागवत (एक अॅनेस्थेटिस्ट) व मी (एक कार्डिओव्हस्क्युलर सर्जन) आमच्या वैद्यक व्यवसायाच्या निमित्ताने एकमेकांना ओळखतो, पण त्या यास्मिन शेख यांच्या सुकन्या आहेत याचा शोध हा लेख वाचल्यानंतरच झाला. त्यांच्या हुरहुन्नरी व प्रेमळ स्वभावाचे प्रतिबिंब डॉ. शमा भागवत यांच्यामध्ये पुरेपूर उतरले आहे. ह्य 'किमया करांची- प्रतिभेच्या विध्वंसाची' हा साधना बहुळकर यांचा मासिकाच्या मुखपृष्ठावरील चित्रासंबंधीचा रसग्रहणात्मक लेख अप्रतिम आहे चित्राचे अवलोकन कसे करावे याचे उत्तम मार्गदर्शन त्यांनी या लेखातून सहजेतेने केलेय व त्यामुळे चित्र बघण्याचा व समजून घेण्याचा एक नवा दृष्टिकोन समजला. समाजाची एकूणच खालावलेली सांस्कृतिक मूल्ये व नैतिक पातळी व त्यामुळे येणारे नैराश्य, काही क्षणतरी दूर होण्यास अंतर्नादमधील लेखांची मोलाची मदत होते. असेच उत्तमोत्तम व विविध विषयांवरील लेख 'अंतर्नाद'मधे येत राहोत ही इच्छा, डॉ. सुधीर भाटे, डेक्कन, पुणे (दिवाळी २०१५ ) निवडक अंतर्नाद ५०३