पान:निवडक अंतर्नाद.pdf/४७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संपादकीय श्रेष्ठ पुस्तके विशेषांक : थोडी पार्श्वभूमी पंचवीस वर्षांत अंतर्नादने अनेक साहित्यिक उपक्रम राबवले. त्यांची एक झलक म्हणून त्यांपैकी 'वीस श्रेष्ठ पुस्तकांची निवड' या एका उपक्रमाविषयी माहिती देणारे हे संपादकीय. "Some books are to be tasted, others to be swallowed, and some few to be chewed and digested." ("काही पुस्तके चव घेण्यासाठी असतात, बाकीची गिळून टाकण्यासाठी, आणि काही थोडी चावून चावून खाण्यासाठी व पचवण्यासाठी. ") फ्रान्सिस बेकन (१५६१-१६२६) दिवाळी अंकाची परंपरा पुढे नेणारा, पण त्याचबरोबर एक आगळा प्रयोग करणारा, हा दिवाळी अंक वाचकांच्या हाती देताना आनंद होत आहे. जगभरच्या सर्व क्रिकेटपटूंमधून आपल्या आवडीचा एक 'आदर्श संघ' निवडणे, आजवरच्या सर्व चित्रपटांमधून 'सर्वोत्कृष्ट दा' ठरवणे किंवा आपल्याला सर्वश्रेष्ठ वाटणाऱ्या गाण्यांची एखादी यादी बनवणे हा प्रकार आपल्यापैकी सगळ्यांनीच केव्हा ना केव्हा केला असणार! अशा याद्या तयार करण्यात नियतकालिकेही मागे नसतात. वीस श्रेष्ठ मराठी पुस्तकांची यादी करण्याचा असाच एक उपक्रम अंतर्नादनेही गेल्या वर्षभरात केला. अर्थात हा प्रयत्न म्हणजे केवळ एक छंद वा गमतीचा चाळा नव्हता; त्याला एक व्यापक औचित्य होते, त्यामागे एक विशिष्ट भूमिका होती. २००५ साल हे मराठी साहित्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे मराठीतले पहिले पुस्तक प्रकाशित झाले त्याला २००५ मध्ये २०० वर्षे पूर्ण झाली. १८०५ साली बंगालमधल्या श्रीरामपूर (सेरामपूर) गावी असलेल्या ख्रिस्ती मिशनच्या छापखान्यात देवनागरी यईप वापरून दोन मराठी पुस्तके प्रसिद्ध झाली होती. एक होते, 'अ ग्रामर ऑफ द महरट्ट लँग्वेज' व दुसरे होते, 'मॅथ्यूचे शुभवर्तमान' म्हणजेच बायबल यांतले पहिले कुठचे व दुसरे कुठचे, याविषयी तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत; पण कलकत्त्याच्या फोर्ट विल्यम कॉलेजात शिकवणारा भाषातज्ज्ञ ख्रिस्ती मिशनरी विल्यम कॅरी हाच या दोन्ही पुस्तकांचा कर्ता होता, यावर एकमत आहे. पुढल्या २०० वर्षांत मराठी प्रकाशनविश्वाचा बराच विस्तार झाला. एका अंदाजानुसार गेल्या एका वर्षातच मराठीत ३००० पुस्तके प्रकाशित झाली. या प्रचंड ग्रंथसंपदेतून काही थोडी पुस्तके निवडणे किती कठीण असेल याची यावरून कल्पना येईल. • पण अशा काही निवडक पुस्तकांची यादी बनवणे हे आपल्या ग्रंथवैभवाची, समृद्ध साहित्यपरंपरेची नीटशी कल्पना यावी यासाठी खूप उपयुक्तही असते. आजच्या परिभाषेत सांगायचे तर तो मराठी साहित्याचा 'रोड शो' म्हणता येईल ! • मराठीतील दीडशे निवडक पुस्तकांची अशी एक यादी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या संपादकांनी स्वतःच २८ जून १९८६ च्या रविवार आवृत्तीत प्रकाशित केली होती. नंतर त्यात वाचकांचा प्रतिसाद विचारात घेऊन सत्तावीस पुस्तकांची भरही घातली गेली. या पुस्तकांचा थोडा अधिक तपशील देणारी दीपक घारे यांची 'मराठीतील साहित्यलेणी' ही पुस्तिका 'ग्रंथाली' ने २५ ऑक्टोबर १९८६ रोजी प्रकाशित केली होती. 'आकाशवाणी' नेही अशीच एक १९४७ ते १९९७ या पन्नास वर्षांतील अठरा उत्तम पुस्तकांची काही निवडक श्रोत्यांच्या शिफारशीनुसार केलेली यादी स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने प्रसिद्ध केली होती. (या दोन्ही याद्या याच अंकात इतरत्र संदर्भासाठी छापल्या आहेत.) इतरही काहींनी अशा याद्या पूर्वी प्रकाशित केल्या असतील. या सर्वांचा संदर्भासाठी उपयोग करून घेत अंतर्नादनेही असा एक प्रयत्न यथामति यथाशक्ति केला. त्यातून तयार झालेली मराठीतल्या १०० निवडक पुस्तकांची एक प्राथमिक यादी, वाचकांना त्यांची निवड करणे सोयीचे जावे म्हणून, मागच्या दिवाळी अंकात छापली होती. ती करत असताना अनिल बळेल, यास्मिन शेख, सु. रा. चुनेकर व अवधूत परळकर यांनी मोलाचे सहकार्य दिले होते. यादीतील त्रुटी ही अर्थातच फक्त अंतर्नादची जबाबदारी. निवडक अंतर्नाद ४७१