पान:निवडक अंतर्नाद.pdf/४७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मासिकांची आवश्यकता या सगळ्या अडचणींवर मात करत अंतर्नादसारखी मासिके चालू ठेवायचा खटाटोप करायचा का? माझ्या मते याचे उत्तर होकारार्थी आहे तीन कारणांसाठी. पहिले कारण म्हणजे साहित्याचे महत्त्व आणि अशा सकस साहित्यनिर्मितीसाठी असलेली मासिकांची आवश्यकता (ललित व वैचारिक हे साहित्याचे सोयीसाठी केलेले तथाकथित वर्गीकरण या संदर्भात महत्त्वाचे नाही. वैचारिक साहित्यातही लालित्य असते आणि ललित साहित्यातही विचार असतोच. कुठल्याही अंगाने घेतला - ललित वा वैचारिक तरी तो एक प्रकारे सत्याचाच शोध असतो आणि दोन्हींच्या अभिव्यक्तीत शब्दलाघव, वाचनीयता, कल्पकता आणि रचना- सौंदर्य सारखेच असू शकते. असो.) साहित्य नसेल तर मानवी जीवन अपरंपार समृद्ध करणारा आणि त्याच वेळी एक अनिर्वचनीय आनंद देणारा मान ठेवा आपण हरवून बसू, अंतर्नादच्या पहिल्याच (ऑगस्ट १९९५ अंकातल्या) संपादकीयाची सुरुवात होती : "शब्दब्रह्माचा महिमा काही और आहे. लोकलमधून लोंबकळताना हातातलं मासिक कसंबसं वाचणाऱ्याच्या गालावर, एखादा चुटका वाचून उमटणारं मंद हसू आणि रूसो-व्हॉल्टेअरच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन, बॅस्टिलचा तुरुंग फोडायला निघालेल्या फ्रेंच क्रांतिकारकाच्या डोळ्यांतील उन्माद, हे शब्दब्रह्माच्या प्रभावाचेच दोन टोकाचे आविष्कार, दलाल स्ट्रीटवरचा जल्लोष आणि टीव्हीवरचा रंगीबेरंगी चंगळवाद ह्यांच्या पलीकडच्या एका आगळ्या विश्वात साहित्य तुम्हांला घेऊन जातं...' " आज दहा वर्षांनंतरही हे साहित्यमाहात्म्य मनाला पटते. 'रोमिओ अँड ज्युलिएट मधली प्रेमभावनेची उत्कटता आणि 'दी ओल्ड मॅन अँड दी सी' मधला माणूस आणि नियती यांच्यातला संघर्ष यांचे आविष्कार मानवी अनुभवविश्वाला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातात. उन्नत मनोवस्थेचा तो परीसस्पर्श सर्वसामान्य अस्तित्वाचेही काही क्षण सुवर्णमय करून यकतो. अगदी जवळचे एक उदाहरण अलीकडेच लिहायला लागलेल्या अभिजित कदम या एका खेड्यातल्या कवीची 'बिचारी' ही अवघ्या बारा शब्दांची कविता. हेडमास्तरांनी काल दहावीतली मुलगी स्वयंपाकासाठी घरी नेली... बिचारीची पहिलीच भाकरी जळून गेली! पुरुषोत्तम पाटील लिहितात ( अंतर्नाद, ऑक्टोबर २००३, पृष्ठे ३७) : "असली कविता आरडीएक्सच्या चिमूटभर भुकटीसारखी असते. समाजाच्या बधिरतेच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवणारी. " अशा श्रेष्ठ साहित्यनिर्मितीसाठी लेखकांना लिहायला आणि वाचकांना वाचायला भरपूर सवड देणारे मासिकासारखे माध्यम वृत्तपत्रांपेक्षा अधिक पोषक आहे. सावरकरांचे घणाघाती निबंध असोत वा फडक्यांच्या रसिल्या कादंबऱ्या, ताम्हनकरांचा 'गोट्या' असो वा दळवींचा 'ठणठणपाळ', मिलिंद बोकीलांच्या कथा असोत वा दासू वैद्यांच्या कविता; रसिकांच्या मनात घर करून राहणारे असले साहित्य मासिकांतूनच प्रकाशनात आलेले आहे, वृत्तपत्रांतून नव्हे, म्हणून मासिके टिकायला हवीत. दुसरे कारण आपल्या मातृभाषेच्या संदर्भातले आहे. जी मराठी भाषा टिकवण्याची आपण धडपड करत आहोत, त्या भाषेलाही तिची महत्ता प्राप्त होते ती मुख्यतः तिच्यातील साहित्यामुळे चांगले साहित्य नसेल तर भाषा कंगाल, उजाड बनेल. मग मराठी केवळ एखाद्या बोलीभाषेप्रमाणे उरेल. यू. आर. अनंतमूर्ती म्हणतात त्याप्रमाणे, "आई, भूक लागली, जेवायला दे असे स्वयंपाकघरात मुलाने म्हणण्यापुरती. म्हणूनच भाषासंवर्धनासाठी ही मासिके टिकायला हवीत, मासिकांची तिसरी आवश्यकता आहे नव्या, वेगळ्या विचारांना व्यासपीठ म्हणून आर्थिक बाबींना सर्वत्र प्राथमिकता देणाऱ्या आजच्या समाजातले वैचारिक दारिद्र्य व्यथित करणारे आहे. लोकसभेतील चर्चा असो, की कट्टयावरच्या गप्पा - बहुतेकदा खटकतो तो व्यासंगाचा अभाव आणि उथळ मतप्रदर्शन, वैचारिक प्रबोधनाची आज खूपच गरज आहे आणि त्या बाबतीत छोट्या मासिकांचे योगदान विशेष लक्षणीय असते. सात-आठशे शब्दांच्या जाचक वृत्तपत्रीय मर्यादेत मांडता न येणारे, किंवा इतरही काही कारणांसाठी प्रस्थापित व्यवस्थेला गैरसोयीचे वाटणारे अनेक विचार छोट्या मासिकांतून मांडता येतात. अभिव्यक्तिस्वातंत्र्य टिकून राहण्यासाठी अशी छोटी-छोटी व्यासपीठे आवश्यक आहेत. सॅम्युअल इंटिंग्टन यांचे 'The Clash of Civilizations' हे आजच्या आंतरराष्ट्रीय राजकारणावर खूप प्रभाव टाकणारे पुस्तक म्हणजे मुळात 'Foreign Affairs' या त्रैमासिकातीलच एक लेख आहे. म्हणून अशी छोटी-छोटी मासिके टिकायला हवीत; समाजातला तो एक महत्त्वाचा असा मोकळा अवकाश असतो. अंतर्नादचे भवितव्य असे असूनही गंभीरपणे वाचन करणारे कुठल्याही समाजात दोन-तीन टक्क्यांहून अधिक नसतात. 'आमच्या वेळी...' हे स्मरणरंजन नेहमीच सुखद असते, पण प्रत्यक्षात पूर्वीही वाचकसंख्या फार नसावी. अर्थात आज ती अधिकच रोडावली आहे. कारण वाचनाशिवायही माणूस आरामात जगू शकतो. पण तो गायन, तसा वादन, चित्रकला, नृत्य यांच्याशिवायही जगू शकतो. प्रश्न फक्त खाणे, पिणे आणि विणे या प्राथमिक पातळीवर जगण्याचा नाही, प्रश्न आहे, ते जीवन अधिक अर्थपूर्ण करण्याचा खूप कमी लोकाश्रय असलेली, पण तरीही उपयुक्त अशी मासिके कशी जगतील – चांगल्या प्रकारे कशी जगतील - याचा समाजाला आवश्यक वाटते ते आपोआप चालते व जे कालबाह्य असते ते आपोआपच बंद पडते, हा बाजारी अर्थव्यवस्थेचा (मार्केट निवडक अंतर्नाद ४६९