पान:निवडक अंतर्नाद.pdf/४६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जातात. यात पोस्ट मास्टर, सेंट्रल लायब्ररी, कलेक्टर वगैरेंना कायद्यानुसार पाठवाव्या लागणाऱ्या प्रती, अंतर्नादकडे जे आपली नियतकालिके पाठवतात त्यांना 'प्रतिभेट' म्हणून पाठवायच्या प्रती, आणि व्यक्तिगत मित्र जाहिरातदार काही लेखक यांना पाठवल्या जाणाऱ्या प्रतींचा समावेश आहे.) यातही पुन्हा सुमारे ७५ टक्के खप हा मुंबई, पुणे, ठाणे व नाशिक या चारच जिल्ह्यांमध्ये (त्याच अनुक्रमाने) एकवटलेला आहे. दहा वर्षे जवळ जवळ पूर्णवेळ हे एकच काम करूनसुद्धा, नऊ कोटी मराठी भाषकांत, खपाची एवढीच पातळी गाठता यावी, ही एकच गोष्ट अंतर्नादच्या मर्यादा स्पष्ट करायला खरेतर पुरेशी आहे. वर्गणीदार वाढवायचे प्रयत्न केले गेले नाहीत, असे अर्थातच नाही. 'प्रकाशन- डायरी' तून लेखक-प्रकाशक-ग्रंथालये यांचे, तसेच देशभरातील महाराष्ट्र मंडळांचे, पत्ते घेऊन त्यांना तीन-तीन अंक व सहपत्र पाठवणे, परदेशस्थ मराठी माणसांचे पत्ते मिळवून त्यांना पत्र व एखादा नमुना अंक पाठवणे, वेगवेगळ्या वर्गणीदारांनी सुचवलेल्या व्यक्तींना पत्र व नमुना अंक पाठवणे, ज्यांचे दर परवडतील अशा मासिकांमधून जाहिरात देणे, स्थानिक पातळीवर वर्गणी भरणे सोपे जावे म्हणून पंधरा-वीस मित्रांचे पत्ते येथे वर्गणी स्वीकारली जाईल' म्हणून छापणे, विद्यार्थ्यांसाठी वर्गणी निम्मी करणे, वाढदिवस- दिवाळी अशा प्रसंगी भेटवर्गणी द्यायची सोय करणे वगैरे विविध योजना वेळोवेळी राबवून झाल्या, पण त्यांना फारसे यश लाभले नाही. उत्पन्नाचे दुसरे साधन म्हणजे जाहिराती. त्याही आघाडीवर परिस्थिती बिकटच आहे. मराठी मासिकांसाठी जाहिराती मिळवणे हा एक खूपच कठीण प्रकार आहे. खप अगदीच कमी असल्याने त्या हक्काने कधीच मागता येत नाहीत. अर्थात याचा अर्थ जाहिराती मिळवणे अशक्य आहे असा नाही. पण त्या मिळवायचेही एक विशेष तंत्र बनले आहे व त्यासाठी वेगळीच यंत्रणा लागते, अंतर्नादकडे तशी यंत्रणा नाही. पंधरा-वीस टक्के कमिशन घेऊन जाहिराती गोळा करणारा एखादा चांगला एजंट बरेच प्रयत्न करूनही अंतर्नादला मिळवता आलेला नाही. सध्या अंतर्नादला फ्लीटगार्ड फिल्टर्स, फिल्ट्रम पॉलिमर्स, होडेक व्हायब्रेशन, पी. सी. आर. ए. (पेट्रोलियम कॉन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन) व केप्र मसाले यांच्या जाहिराती नियमित मिळतात. पण त्याही केवळ अंतर्नादला मदत करायच्या भावनेतून दिल्या जातात. यातल्या मुखपृष्ठाच्या तीन बाजूंवर छापल्या जाणाऱ्या उपरोक्त पहिल्या तीन जाहिराती या अरुण किर्लोस्कर यांच्या औदार्याने व सौजन्याने मिळतात. अंतर्नादचा तो मोठा आधार आहे. या जाहिरातींचाच एक भाग म्हणजे अंतर्नादच्या मलपृष्ठावर दरमहा छापली जाणारी 'नव्या जगाची सुरुवात स्वत:पासून होते ही जाहिरातमालिका, अगदी कमी आणि सोप्या शब्दांत मांडलेले, मनाला भिडणारे एक जीवनविषयक तत्त्वज्ञान त्यातून सांगितले जाते. खरेतर तीच अंतर्नादची स्वतःची जीवनदृष्टीही आहे. ४६८ निवडक अंतर्नाद अंतर्नादमधील इतर कुठल्याही लेखनापेक्षा अधिक वाचक प्रतिसाद या जाहिरात - मालिकेला मिळाला आहे. या संदर्भात लोकसत्तेच्या 'चतुरंग' पुरवणीत (शनिवार, ४ जून) सुधीर जोगळेकर यांनी एक सुंदर लेखही लिहिला आहे (त्यामुळेच खरेतर श्री. किर्लोस्कर यांचे नाव जाहीर झाले; अन्यथा निनावी राहायच्या अटीवरच त्यांनी त्या दिल्या होत्या. मजकुरात शेवटी त्यांचा लोगो छापायचा आग्रहही आमचाच; त्यांचा त्याला विरोधच होता.) ●अशा जाहिराती निश्चितच खूप हातभार लावतात, त्याबद्दल मनोमन कृतज्ञताही वाटते, पण त्या कायम मिळत राहणे अशक्य आहे आर्थिक बाजू बळकट करायचा आणखी एक मार्ग म्हणजे साहित्य संस्कृती मंडळातर्फे नियतकालिकांना मिळू शकणारे अनुदान, पण ते अगदीच कमी असते. सध्या वार्षिक रु. १५००० तेही व्यक्तिगत मालकीच्या नियतकालिकांना दिले जात नाही. अंतर्नादची आजीव सदस्य योजना म्हणजे ही कोंडी फोडण्याचा एक चांगला प्रयत्न होता. प्रत्येकी २००० रुपये देणारे १००० आजीव सदस्य नोंदवायचे व त्यातून उभ्या राहणाऱ्या वीस लाख रुपयांच्या व्याजातून मासिकाचा खर्च भागवायचा, अशी ही योजना, तिला प्रतिसादही चांगला मिळाला. ८३५ आजीव सदस्य बनले होते; ती संख्या लौकरच वाढूही शकली असती. दुर्दैवाने त्यानंतर एकतर व्याजदर झपाट्याने घटत गेले व दुसरे म्हणजे तशातच एक- दोन सहकारी बँकांची स्थिती नाजूक बनली आहे, अशा बातम्या ऐकू येऊ लागल्या. या बँकांमध्ये आपण ठेव म्हणून ठेवलेले हे वर्गणीचे पैसे बुडले तर, ही भीती वाययला लागली. या दोन्ही कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून ही योजना बंद करावी लागली. सर्वांचे पैसे अंतर्नादने परत करून टाकले. धनादेशासोबतच्या पत्रात केलेल्या विनंतीनुसार वर्गणीदार राहणे मात्र यांतल्या बहुतेक सर्वांनी चालू ठेवले. आता इतक्या वर्षांनी मासिकाचा खर्च दुप्पट झाला आहे, तर व्याजदर निम्म्याहून खाली आले आहेत! काही अर्थतज्ज्ञांच्या मते ते आणखीन खाली जाणार आहेत व स्थावर निधीच्या व्याजावर एखादा उपक्रम चालवणे भविष्यात अव्यवहार्य ठरणार आहे त्यामुळे ही योजना बंद केली ते बरेच केले, असे आता वाटते. अंतर्नादपुढच्या अडचणी या तशा एकूणच मराठी साहित्यविश्वापुढच्या अडचणी आहेत. या लेखात त्यातील काहींचा उल्लेख केलेलाच आहे. त्याशिवाय अगणित टीव्ही चॅनेल्सचे आक्रमण, इंग्रजी माध्यमातील शिक्षणामुळे मराठीपासून दुरावलेली तरुण पिछी, विकत घेऊन वाचायच्या सवयीचा पारंपरिक अभाव, लेखकांमधील ढासळती लेखननिष्ठा, नव्या सकस साहित्यनिर्मितीचा आक्रसणारा स्रोत, तुटपुंजी वितरणयंत्रणा, जाहिरातींचे दुर्भिक्ष, कमी खप कमी उत्पन्न कमी दर्जा आणखी कमी खप हे दुष्टचक्र, मराठी मानसिकतेतील एकारलेपणा आणि इतरांविषयींची तीव्र अनास्था... अडचणींचा पाढा कधीच न संपणारा आहे