पान:निवडक अंतर्नाद.pdf/४५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देवदासचे गारूड प्रकाश भूपाल मगदूम विसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला ज्यावेळी ही कादंबरी प्रसिद्ध झाली त्यावेळी या कथानकाने एकाच वेळी खळबळ उडवून दिली आणि प्रसिद्धीही अनुभवली. आत्मघाताचे तीव्र आकर्षण असणारा नायक, त्याचप्रमाणे प्रस्थापित विवाहसंस्थेविषयीची भूमिका आणि नायकाचे दारूच्या आहारी जाणे; भरीस भर म्हणून नायकाचे गणिकेबरोबर असलेले संबंध या भारतीय समाजातील निषिद्ध गोष्टी! या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे या कादंबरीची सिनेमामध्ये रूपांतरण करण्याविषयीची उपयुक्तता अनेकांच्या लक्षात आली, नव्हे तिने अनेकांना भुरळच घातली. काही कलाकृती रसिकांच्या मनावर वर्षानुवर्षे अधिराज्य करत राहतात आणि त्यांची गोडी कमी न होता ती उलट वाढतच जाते. अर्थात फार कमी कलाकृतींना हे भाग्य लाभते. देवदास ही त्यांपैकीच एक. शरच्चन्द्र चटर्जी यांची बंगाली भाषेतील देवदास (१९०१) ही कादंबरी या भाग्याची धनी ठरली आहे. केवळ बंगाली साहित्यरसिकांच्या हृदयात स्थान मिळवून न थांबता देशातील आणि विदेशातील अनेक भाषांमध्ये या कादंबरीचे अनुवाद झाले आणि सर्वत्र ही कलाकृती लोकप्रिय ठरली. अशा या लोकप्रिय कादंबरीकडे भारतीय चित्रपटसृष्टीचे लक्ष न वळले तर नवलच ! शोकात्म कथानक असलेल्या या कादंबरीमध्ये चित्रपट बनवण्यासाठीची बीजे होती हे अनेक दिग्दर्शकांनी लगेच ओळखले. त्यामुळेच भारतामध्ये बोलपटांना सुरुवात होण्याअगोदरच या कादंबरीचे रूपांतर पडद्यावर केले गेले. देवदासवरील पहिलावहिला मूकपट नरेशचंद्र मित्रा यांनी १९२८ साली बनवला. दुर्दैवाने भारतातील बहुतांश मूकपटांप्रमाणे हाही चित्रपट आपल्या देशातील चित्रपटजतनाबद्दल असलेल्या अनास्थेमुळे काळाच्या पडद्याआड गेला आहे लक्षात घेण्याजोगी विशेष बाब म्हणजे भारतामध्ये राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची (National Film Archives of India) १९६४ साली स्थापना होऊन रीतसर चित्रपटांचे जतन सुरू होण्याअगोदरच जवळपास ९०% मूक चित्रपट नष्ट झाले होते. प्रथमेश बारूआ या आसामी राजघराण्यातील युवकाचे लक्ष या कादंबरीने वेधून घेतले आणि १९३५ साली त्यांनी प्रथम बंगाली आणि त्याच वर्षी लगेचच हिंदी भाषेमध्ये देवदास पडद्यावर आणला. बी. एन. सरकार यांच्या कलकत्ता येथील प्रसिद्ध न्यू थिएटर्सच्या बॅनरखाली ह्या बोलपटाची निर्मिती झाली. हा चित्रपट चालला खरा, मात्र काही वर्षांनंतर या चित्रपटाच्या सर्व प्रती नष्ट झाल्या. न्यू थिएटर्सच्या स्टुडियोला लागलेल्या आगीमध्ये बाकी काही चित्रपटांबरोबर हा चित्रपट जळून खाक झाला. त्यामुळे सर्व देशभरात हा चित्रपट अस्तित्वात नाही असे समजले जात होते. ४५० निवडक अंतर्नाद नंतर कळले, की बांगलादेशातील फिल्म अर्काइव्हमध्ये या चित्रपटाची एक प्रत उपलब्ध आहे. NFAIच्या पी के नायर यांच्यापासून अनेक संचालकांनी हा चित्रपट भारतामध्ये परत आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले परंतु ते अयशस्वी ठरले. फक्त एकदाच २००२मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने दिल्लीमध्ये अतिशय कडेकोट बंदोबस्तामध्ये या चित्रपटाची प्रत बांगलादेशातून आणली गेली व विशेष प्रदर्शन झाल्यानंतर पुन्हा परत नेली गेली. कोणत्याही देशाच्या सांस्कृतिक अवकाशात चित्रपटांचे महत्त्व हे अनन्यसाधारण असते आणि त्यामुळे अशा चित्रपटांबद्दल आस्था ठेवून त्यांचे पालन करणे किती महत्वाचे असते हे या घटनेवरून दिसते. NFAIचा संचालक म्हणून मी कार्यभार स्वीकारल्यानंतर एकदा चित्रपट अभ्यासक अमृत गंगर यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये या चित्रपटाचा विषय निघाला. लगेचच मी एक इ-मेल बांगलादेशाच्या फिल्म अर्काइव्हच्या संचालकांना पाठवली. दोन अर्काइव्हच्यामध्ये चित्रपटांच्या आदानप्रदानांविषयी FIAF (International Federation of Film Archives) या आंतरराष्ट्रीय संघटनेने काही मार्गदर्शक तत्त्वे आखली आहेत. त्यानुसार दोन्ही संस्थांमध्ये एकमेकांना हव्या असलेल्या चित्रपटांविषयी सहमत व्हावे लागते. ही प्रक्रिया वेळखाऊ असते. इथे तर देवदाससारखा बंगाली भाषेतील क्लासिक चित्रपट बांगलादेशाकडून मिळवायचा होता! काही दिवसानंतर त्यांचे प्रत्युत्तर आले. लगेचच भरलेल्या FIAFच्या सिडनी आणि कॅनबेरा येथील वार्षिक परिषदेमध्ये बांगलादेशाच्या प्रतिनिधींची प्रत्यक्ष गाठभेट झाली. मी पुन्हा ह्य विषय छेडल्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. परत आल्यावर पुन्हा पत्रव्यवहार सुरू झाला आणखी एका योगायोगाद्वारे बांगलादेशाचे हे अधिकारी भारतभेटीवर पुण्यास आले आणि त्यांनी देवदासची डिव्हिडी प्रत आमच्याकडे सुपूर्द केली. त्या बदल्यात आम्ही त्यांना राजा हरिश्चंद्र या भारतात निर्माण झालेल्या पहिल्या चित्रपटाची डिव्हिडी भेट म्हणून दिली. अशा प्रकारे NFAIच्या संग्रहामधील आणि भारतीय चित्रपट इतिहासातील एक महत्त्वाची उणीव भरून निघाली.