पान:निवडक अंतर्नाद.pdf/४५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यामुळे भोवताल झोपलाय आणि तुम्हीही झोपलाय, असं क्वचितच ह्येतं. रनिंग रूममध्ये म्हणजे बऱ्याचदा कोंडवाड्यात झोपल्यासारखं असतं. इथे आम्हाला २४ तास जेवण बनवणारा उपलब्ध असतो, पण कोरडा शिधा मात्र प्रत्येक वेळी द्यावा लागतो. जे द्याल ते बनवतात, पण त्यांच्या पद्धतीने माझ्या आईची चिंच गुळाची आमटी गेल्या कैक वर्षांत मला बाहेर खायलाच मिळत नाही. कारण इथे सगळी कांदा, लसूण, मिरची खाणाऱ्यांची चलती. हे सारं रोजच्या जेवणात नसेल, तर लोकांना जेवल्यासारखं वाटतच नाही. माझ्यासारखा बराच सौम्य खाणारा त्यांना त्रासदायक असतो. बनवणारे मुस्लिम, भैये असे कुणीही असतात. त्यांच्याकडे अठरापगड लोकांची रोजच वर्दळ असते. तेव्हा तुम्ही कितीही सांगितलं तरी कमी तिखट जेवण त्यांना बनवता येत नाही. कारण त्यांच्या हाताला तशी सवयच नसते. मी कवी मनाचा वगैरे. त्यात कुलकर्णी, घरात कधी अंडे या विषयावर चर्चादेखील न करणारा, अशा गोतावळ्यात मी स्वतःला खूपच आकसून घेतो. एका बाजूला मटण, अंडे खाणारा असतो, त्याच्याच बाजूला मी माझी पोळी, भाजी खात असतो. खरंतर शाकाहारी, मांसाहारी अशी नावं लिहिलेली दोन वेगळी स्वयंपाकघरं उपलब्ध असतात. पण कोणतं घर कोणात मिसळून गेलं आहे, हे न कळण्याइतपत तिथे सारी लगबग चाललेली असते. प्रत्येकाला घाई असते. दोन घास पोटात यकून मिळेल तेवढी विश्रांती घेणं महत्त्वाचं, पण कधी कधी इथेही खूप चांगले अनुभव येतात, उत्तम जेवण पदरात पडतं. ती चव मग घरी कधीतरी ट्राय केली, तर घरच्यांनादेखील आवडतं. बऱ्याचदा घरातदेखील सखी फर्माईश करते रनिंग रूमच्या दाल फ्राय, पुलावची, मग मीही वेळ असेल तेव्हा लसूण, आलं, कांदे, मिरची, टोमॅटो यांचा सढळ वापर करत प्रेमानं हे सारं करतो. सखी चिरंजीव खूष होतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मलाही सुखावून जातो. अशा तऱ्हेने जेवण मिळणं हा एक भाग झाला. त्यांच्या नंतरचा भाग झोपणं, तो खूपच अवघड असतो. घरात आपण आपली चादर, उशी बदलली तरी तक्रार करतो. इथे मात्र रोज नवं अंथरूण, नवी उशी, नवा बेड. एकाच बेडवर दरवेळी झोपायला मिळेल याची खात्री नाही. परत कधी बरोडा, कधी सुरत, कधी अहमदाबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी झोपण्याची कसरत करायची. रात्रभर गाडी चालवून अंग अगदी आंबून गेलेलं असतं. डोळे थकलेले असतात. रनिंग रूममध्ये जाऊन लगेच झोपावं तर खूपदा झोपच लागत नाही. घरापासून दूर ४०० ते ५०० कि.मी. प्रवास केल्यावर त्याच्या व्हायब्रेशनचा शरीरावर परिणाम होणारच. ती शरीरातील वादळं शांत व्हायला काही वेळ जावा लागतो. त्यानंतर थोडीशी झोप येते. परत वातावरणातले बदलही शरीराला मारक असतात. मुंबईत आपण ३३°C मध्ये वावरत असतो. इथे रनिंग रूममध्ये आणि बाहेर बराच फरक असतो. बाहेर अहमदाबाद, सुरत, बरोडा उन्हाळ्यात धगधगत असतात. (४०°C ते ४२°C) संपूर्ण इंजिन, आम्ही, आमचं खाणं, पाणी सर्व काही तापलेलं असतं. (रात्रीच्या वेळी या दिवसांत जरा बरं वाटतं!) आणि रनिंग रूममध्ये जावं तर ए. सी. १६० वर सेट केलेला, म्हणजे बाहेर घामाच्या धारा आणि आत ब्लॅकेट घेऊन झोपावं लागतं, या साऱ्याचा शरीरावर परिणाम होत असेलच. भले तो दृश्य नसेल. रनिंग रूममध्ये स्वतंत्र झोपण्याची व्यवस्था असते. प्रत्येक बेडवर आपण वेगळे असतो. घरी पोचतो तेव्हा सर्वांबरोबर झोपताना बऱ्याचदा खूप वेगळा अनुभव येत राहतो. मुलगा अंगाला चिकटून झोपल्याशिवाय पूर्वी झोपायचा नाही. त्याला कुशीत घेऊन झोपणं एक आनंदाचं निधान असायचं. या साऱ्या आनंदाला मी सध्या मुकतोय. मला आता अंगावर हात पडलेलाही सहन होत नाही. त्यामुळे नकळत दुरावा आल्यासारखा वाटतो. मुलाच्या स्पर्शाला जसा मुकलो, तसाच सखीचा स्पर्शदेखील खूपदा नकोसा, अनोळखी वाटतो. आपण गाढ झोपेत असतो, सखी अलगद जवळ येते, आपल्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न करते आणि तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया करवादण्याची असली, तर काय होईल ? समोरच्याचा रोमँटिक मूड कसा बरं टिकेल ? सखी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते, आपण एका वेगळ्याच धुंदीत असतो. या जगाच्या वेदनेचे दाखले देते कशाला, दुःख माझे एवढेसे मी तुला सांगू कशाला?' हा झगडा मनातल्या मनात सुरू असतो. एवढ्यानेही आपली पटकन झोपमोड होते, गांगरून आपण बाजूला बघतो. सखी म्हणते, "अरे मीच आहे एवढं घाबरायला काय झालं?" या प्रश्नाला उत्तर नाही. आपण या नोकरीच्या नादात 'काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात या अनुभवाला मुकतो आहोत याचा प्रचंड त्रास होतो. हा माझ्या नोकरीचा माझ्यावर झालेला एक जबरदस्त परिणाम आहे पटकन झोप लागत नाहीच. मग खूपदा चेहऱ्यावर पुरळ येणं, डोळ्यात पुळी येणं अशा तऱ्हेने हीट बाहेर पडत राहते. मग त्यासाठी सतत औषधं घेत राहणं हेच आपल्या हातात उरतंत! ज्या प्रवासासाठी लोक तीन तीन महिने अगोदर नियोजन करतात तो आम्ही रोजच करत असतो. यासाठी आमची बॅग सतत सज्ज असते. यात आणीबाणीच्या प्रसंगात लागणारी प्रत्येक गोष्ट मौजूद असते. परत या जोडीला एखादं नवं पुस्तक, नवा दिवाळी अंक, माझा शास्त्रीय संगीताने समृद्ध असा मोबाइल अशा अनेक गोष्टी यात सामील असतात. खूप थकतो, तेव्हा कानावर किशोरीताईंचा यमन / भीमसेनजींचा पुरिया / राशिदखानचा नटभैरव, गोरख कल्याण कानाला लावतो. शरीर झोपेची मागणी करत असतं. प्रचंड थकवाही अंगभर पसरलेला असतो. मग हे जादुई स्वर प्रत्येक अवयव शांत करत जातात. हळूहळू शांत शांत वाटायला लागतं. मग मधेच एखादी डुलकी येते. पुन्हा नव्या आव्हानाला सामोरं जायला नवं बळ मलातरी यातून मिळतं. कदाचित हे सारं मानसिक असेल, पण मला स्वतःला यातून निर्मळ आनंद मिळतो. काम संपल्यावर कानावर मोबाइलमधून या स्वरांची झिंग अनुभवणं माझ्यासाठी आल्हाददायक असतं. खरं तर कधीतरी वाटतं, एखाद्या मानसोपचारतज्जाकडे जावं, त्याचा सल्ला घ्यावा. पण पुन्हा नकोसं वाटतं आहे त्या परिस्थितीत आनंद शोधणं हेच मी खूप मोठं समजतो ! (जून २०१३) निवडक अंतर्नाद ४४९