पान:निवडक अंतर्नाद.pdf/४४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यात्रा रेल्वेची! गणेश मनोहर कुलकर्णी आपण सगळेच काही ना काही कारणांनी रेल्वेने प्रवास करतच असतो. ती ट्रेन चालवणाऱ्या इंजिन ड्रायव्हरचा आणि साहित्याचा काही संबंध असावा असे सहजतः वाचकांना वाटत नाही. पण रसिक आणि संवेदनक्षम मन त्या नोकरीतही अनेक वेधक अनुभव टिपत असते. कॉलेज संपता संपता मी रेल्वेची कुठलीतरी परीक्षा दिली होती. त्यात पास होऊन रतलामला प्रशिक्षणासाठी जायचं होतं. दोन वेळचा जगण्याचा झगडा इतका मोठा होता, की कसली नोकरी आहे याचा काहीही विचार न करता ट्रेनिंगसाठी रतलामला पोचलो, तिथे कळलं की, आपण इंजिन ड्रायव्हर बनणार आहोत. सुरुवातीला सहायक, मग चालक, त्यातही पहिल्यांदा छोट्या शंटिंग गाड्या, मग मालगाडी, मग पॅसेंजर आणि सरतेशेवटी मेल- एक्सप्रेस चालक. मेल गाड्यांचा चालक हा सर्वांत सीनिअर असतो. इथपर्यंत येण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर कठोर प्रशिक्षण / वैद्यकीय परीक्षा / सायको टेस्ट अशा विविध गोष्टींना सामोरं जावं लागतं, हा सारा प्रवास, वाचताना वाटतो तितका, सोपा असतच नाही. निसर्गाच्या विरुद्ध वेळात, लांब घरापासून दूर जात, सातत्याने एक तणावाचं आयुष्य जगत स्वतःला सिद्ध करत राहणं सोपं नाही. त्यात माझी पदवी वनस्पतिशास्त्रातली. त्यामुळे नट आणि बोल्ट कशाशी खातात हेच माहीत नाही. मग नोकरीला गेल्यावर चार वर्षांचा पार्ट टाइम यांत्रिक शाखेचा सोमय्यात डिप्लोमा केला. नोकरीत काही कुणी पायघड्या घातलेल्या नव्हत्याच. त्या सगळ्या अडचणींवर मात करत खूप कष्टाने शिक्षण घेतलं मी थोडासा कवी वगैरे जे वयाप्रमाणे सारेच असतात - तसाही होतो. आमच्या कॉलेजातदेखील सर्वांना शंका होती, की मी हे सारं कसं निभावेन. आमच्या दूरच्या एका काकांनी तर बाबांना घाबरवून टाकलं होतं, की हा मुलगा पाच वर्षांत नोकरी सोडून देईल. टिपिकल मध्यमवर्गीय बापाने त्यावेळी तर अगदी हाय खाल्ली होती. पण आज २२ वर्षं मी सगळे टक्केटोणपे खात माझ्या नोकरीत ताठ मानेने उभा आहे. मी आज मेल ड्रायव्हर आहे. बांद्रा ते अहमदाबादपर्यंत रोज ये-जा करतो. 'गरीबरथ' सारखी मानाची गाडी नित्य नवी आव्हाने पेलत चालवतो. जंदगी पण.... सोसण्यासाठीच कुणी जगत नाही.... हेसुद्धा तितकंच खरं असतं तर ड्रायव्हरच्या आयुष्यावर मी काहीतरी लिहावं हा संपादकांचा तगादा, हा विषय 'पुलं'नी थोडासा मांडला होता. तोही मिश्किलपणे, म्हणजे कुलकर्णी / बापट कोळशाची इंजिनं चालवू शकलोच नसते! आज अतिशय प्रगत अशी इंजिनं आल्यामुळे तसे शारीरिक कष्ट कमी असतात. याचप्रमाणे, अनिल अवचटांनी स्टेशनवर लिहिताना ड्रायव्हरसारखा अस्पर्शित विषयाला ओझरता स्पर्श केला आहे. त्यांच्या नव्या पुस्तकात (पुण्याची अपूवाई). खरं तर अवचटांचा लेख वाचताना मनातून थोडा खट्टही झालो होतो. कारण त्यांनी या विषयाला हात घातला, तर आपला हुकमी विषय आपल्या हातून निसटेल ही भीती आणि त्यांच्यासारखं लिहिणं आपल्याला बापजन्मात जमणार नाही हा विश्वास पण स्टेशनवर लिहिताना अचानक तो विषय त्यांनी अर्धवटच ठेवला. कदाचित माझ्यासाठी! ड्रायव्हर हा कुठल्याही संस्थेत महत्त्वाचा भाग असतो. साधं आपण कुठे फिरायला गेलो तरी आपल्या गाडीच्या ड्रायव्हरला आपण अपार प्रेमानं सांभाळतो. इथे तर रेल्वेच्या इतक्या मोठ्या अजस्त्र पसाऱ्यात ड्रायव्हरचं महत्व आजही अबाधित आहे. पूर्वी अँग्लो-इंडियन लोक ड्रायव्हर असायचे. त्यावेळी कोळशाची इंजिनं असायची. तसली वाफेवर चालणारी इंजिनं आज कालबाह्य झाली, तरीही काही ठिकाणी रेल्वेची हौस म्हणून ती चालवली जातात. मी ज्या ठिकाणी काम करतो, तो भारतीय रेल्वेचा मानाचा मार्ग आहे. ज्याला इंग्रजीत ट्रॅकरूट म्हणतात अशा मार्गावर माझी नोकरी असते. आज डिझेल / इलेक्ट्रिक यांवर चालणारी नवी नवी इंजिनं आलेली आहेत. भारतीय रेल्वेचा प्रवास थक्क करणारा आहे पृथ्वीच्या चोवीस प्रदक्षिणांइतके किलोमीटर आपली रेल्वे रोजच्या एका दिवसात धावत असते. ठाणे येथला पारसिकचा बोगदा १९९६ साली बांधला. त्यावेळी नुकतीच रेल्वे रांगत होती. पण आत त्याच बोगद्यातून रोज असंख्य गाड्या ये-जा करतात. इंग्रजांनी बांधलेल्या अनेक स्टेशनापैकी व्हीटी स्टेशन हे एकमेव स्टेशन होतं ज्यावर पादचारी पूल नव्हता. किंबहुना, त्याची गरज वाटू नये अशीच त्याची रचना होती. जाता जाता इथे नमूद करतो, की व्हीटी स्टेशनचं जुनं नाव ज्या राणीच्या नावावर होतं, तिच्या घराण्यातून काही रक्कम दरसाल या स्टेशनच्या देखभालीसाठी यायची, पण ज्या दिवशी नवे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस ठेवलं, त्या दिवसापासून हा निवडक अंतर्नाद •४४५