पान:निवडक अंतर्नाद.pdf/४४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामिष पदार्थांबद्दल अधिकारवाणीने मला काही लिहिता येणार नाही. कारण शाकाहाराचा आमच्यावरील प्रभाव! तरीदेखील अनेक जातींच्या मित्रमंडळींत वावरणं, वाचणं व टीव्हीवरील अनेक कार्यक्रमांमुळे नागपूरकडचं सावजी मटण, कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, मालवणी वडे-सागुती, नाशिकचं काळं मटण हे बनवण्याच्या पद्धतीतले फरक व वेगवेगळे मसाले यांचं ज्ञान मात्र झालं. पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी, रवींद्र पिंगे प्रभृतींनी मत्स्याहाराबद्दल भरपूर लिहिलं आहेच. त्यात मी बापडी काय भर घालणार? गोडाचं म्हणाल तर मात्र श्रीखंड, बासुंदी, पुरणपोळ्या, गूळपोळ्या, सुधारस, पाकपुऱ्या, घावन गुळवणी, पुरणाची दिंड यापलीकडे आपली गाडी जात नाही. कारण जेवणानंतर खायचे पुडींग, कस्टर्ड, पाय, यर्ट आदी पाश्चात्त्य पदार्थ आपल्या खाद्यसंस्कृतीत कधी आलेच नाहीत. दीडशे वर्षांची इंग्रजांची राजवट आमच्या खाद्यसंस्कृतीवर टोमॅटो केचप, केक आणि ब्रेडपलीकडे फारसा काहीच प्रभाव टाकू शकली नाही, याचं मला आश्चर्य वाटतं. उत्तर भारतातल्या मिठायांवर व इतर गोड पदार्थांवर मुसलमान संस्कृतीचा मोठा प्रभाव पडला. त्यामुळे त्यात भरपूर दूध व सुक्यामेव्याचा, केवडा-गुलाब आदी सुगंधांचा वापर झाला व बहुधा त्यामुळेच हे पदार्थ बऱ्यापैकी लोकप्रिय झाले. यामध्ये फिरनी, शाही टुकडा, कुल्फी, मालपोवा, शीरकुर्मा, खुबानीका मीठा आदी पदार्थांचा समावेश होतो. रसगुल्ला, संदेशसारख्या बंगाली मिठाया तर हल्दीराम व के. दासने पार जगभर पोचवल्या. समृद्ध अशा या मराठी खाद्यसंस्कृतीची आज आपल्याला दुदैवाने पीछेहाट होताना दिसत आहे. मराठी लग्नात वा पाट्र्यांतही मराठी खाद्यपदार्थ फारसे कधी खायला मिळत नाहीत. पाहुणे येणार असतील, तर मराठी घरातही हटकून पंजाबी किंवा दाक्षिणात्य पदार्थ बनतात, नाहीतर अलीकडचे पनीर आणि मशरुम घातलेले प्रकार मराठी खाद्यपदार्थ देणारी मुंबईतली हॉटेलंही नामशेष होत चालली आहेत. लग्नात मराठी खाद्यपदार्थ ठेवले, तर "काय ते अळूचं फदफदं आणि बटाट्याची भाजी! हे काय लानी जेवण आहे का?” असं आपलेच मराठी लोक बोलू लागले आहेत. मग हा प्रश्न उभा राहतो, की मराठी खाद्यसंस्कृतीचं आज भारतात काय स्थान आहे? मिसळ, बटाटेवडे, साबुदाणा खिचडी, कोंबडी वडे, भाकरी- पिठलं- ठेचा, कोथिंबीरवडी हे मराठमोळे पदार्थ अमराठी लोकांपर्यंत हळूहळू पोचत आहेत, विविध खाद्यजत्रांतून या पदार्थांना चांगला प्रतिसादही मिळत आहे, पण ज्या प्रमाणात पंजाबी, दाक्षिणात्य वा गुजराती पदार्थ देशभरच नव्हे, तर जगभर लोकप्रिय झाले, त्या प्रमाणात मराठी पदार्थ लोकप्रिय झाले नाहीत हे मात्र खेदाने नमूद करावंसं वाटतं. 'चख ले इंडिया', 'विकी गोज व्हेज', 'हाय वे ऑन माय प्लेट' यासारख्या टीव्हीवरच्या अनेक कुकरी शोजमध्ये आजपर्यंत मी तरी (मिसळीव्यतिरिक्त) मराठी पदार्थ दाखवलेला कधी पाहिलेला नाही. मराठी पदार्थ इंग्रजी - हिंदी भाषांच्या माध्यमांतूनच जास्तीत जास्त अमराठी लोकांपर्यंत पोचतील, असं वाटतं, मराठी खाद्यपदार्थांची विक्री अजून आक्रमकपणे व्हायला ४४४ • निवडक अंतर्नाद हवी. आपण प्रत्येकाने आवर्जून आपले मराठी पदार्थ आपल्या अमराठी मित्रमंडळींना खायला घालायला हवेत. आपल्याकडच्या लग्नांत, पाट्यांत दोन-चार तरी मराठी पदार्थ आवर्जून ठेवावेत. कोक व ज्यूस अशी पेयं पाहुण्यांना देण्याऐवजी कोकम सरबत, कैरीचं पन्हं द्यावं. आपल्या तरुण पिढीला हे पदार्थ करायला व खायला प्रोत्साहन द्यावं. तरच आपल्या मराठी खाद्यसंस्कृतीची त्यांना ओळख होईल. माथेरान महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी हजारो पर्यटक देशभरातून येत असतात. उत्तम मराठी पदार्थ विकायची तिथे व्यवस्था करायला हवी. मराठीपण जपण्याचा हाही एक महत्त्वाचा मार्ग आहे. पिझ्झाला पिझ्झा हट आणि बर्गरला मॅकडोनल्ड यांनी जगभर पोहोचवलं. चितळेंची बाकरवडी हा आपल्याकडचा एक यशस्वी ब्रँड म्हणता येईल. साबुदाण्याच्या खिचडीला व कैरीच्या पन्ह्याला ब्रँडचं स्वरूप देणारी तशीच एखादी चेन भेटली असती किंवा एखाद्या मराठी उद्योजकाने छोट्या प्रमाणात का होईना, पण तशी एखादी स्वतःची चेन सुरू केली असती, तर किती छान झालं असतं! एकंदरच आपल्या मराठीपणाचा साकल्याने विचार करताना आपल्या खाद्यसंस्कृतीला त्यातून वगळता येणार नाही असं मला वाटलं, म्हणून हा लेखप्रपंच, असं म्हणतात, की माणसाच्या हृदयात शिरायचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. मराठी संस्कृती इतर बहुरंगी, बहुढंगी समाजाच्या हृदयात स्थानापन्न करण्यासाठीसुद्धा खाद्यसंस्कृतीचंच साहाय्य घ्यावं लागेल. (दिवाळी २०११) सांस्कृतिक समृद्धीसाठी अंतनाद २०१५ रुपये ४० Baby जुलै २०१५ शनिवारवाडा (चित्रकार एडवर्ड लिअर)