पान:निवडक अंतर्नाद.pdf/४४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खाद्यसंस्कृतीतले मराठीपण वर्षा काळे इतिहास, भूगोल, राजकारण, समाजकारण, साहित्य, कला इत्यादीप्रमाणे खाद्यपदार्थांतही मराठीपण बऱ्याच प्रमाणात सामावलेले असते. आपण जे नेहमी खातो त्यातूनच आपण घडत जातो. 'अन्नाद्भवती भूतानि असे म्हटलेच आहे. मराठी खाद्ययात्रेची ही एक झलक. 'मराठीपण जपणे म्हणजे नेमके काय या विषयावर अंतर्नादच्या या अंकात अनेक मान्यवरांचे मौलिक विचार आपण वाचालच, पण साहित्य, भाषा, वैचारिकता, वागणं यांमधून आपला मराठीपणा जसा दिसतो, तसाच आपल्या खाद्यसंस्कृतीमधूनही तो ठळकपणे डोकावतो, याची जाणीव असल्यामुळे मी हा लेख लिहायला प्रवृत्त झाले. मुंबईतील विलेपार्ले येथील माझ्या शाळेत अठरापगड जातींच्या मैत्रिणींच्या घोळक्यात बसून डबा खाताना प्रत्येकीच्या डब्यातले वेगवेगळे पदार्थ त्या त्या जातींच्या खाद्यसंस्कृतीचे द्योतक होते, हे कळायला वेळ लागला, पण मैत्रिणींच्या डब्यात आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं असतं, हे मात्र लगेचच कळत होतं. त्यामुळे माझी एक सीकेपी मैत्रीण जेव्हा मला "तुझ्याकडलं कोकणस्थी गोडं वरण, भात व अळूची भाजी खायची आहे,” असं म्हणायची, तेव्हा त्यातलं इंगित मला कळायचं कारण ब्राह्मणी गोड्या वरणात हळद-हिंगाबरोबर थोडा गूळही घालायची पद्धत आहे तसंच अळूभाजीतही. त्यामुळे किंचित गोडसर असणारं आमचं वरण व अळूभाजी तिला खूप वेगळी वाटायची व आवडायची. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीचं मराठी स्वयंपाकघर व आजचं मराठी स्वयंपाकघर यांत जमीनअस्मानाचा फरक आहे. विज्ञानाने पुरवलेल्या आधुनिक उपकरणांमुळे स्वयंपाक करणं फारच सुखावह झालं. जागतिकीकरणानंतर कॉंटिनेन्टल, मेक्सिकन, थायी, चायनीज पदार्थांचाही स्वयंपाकात शिरकाव झाला. जगभरातल्या वेगवेगळ्या 'क्विझिन्स'ची ओळख होऊ लागली. याअगोदर हिंदी चित्रपटसृष्टीवरील पंजाबी प्रभावामुळे पंजाबी खाद्यसंस्कृती महाराष्ट्राच्या पचनी पडलीच होती. 'माँ, तेरे हाथ का....' असा हिरोने डायलॉग मारायचा अवकाश, की तो 'गाजर का हलवा, मक्कई की रोटी व सरसों का साग' हेच पदार्थ मागणार याची आम्हांला खात्री होती! पार्ल्यात गुजराती वस्तीही बरीच असल्याने उंधियू- ढोकळा- फरसाण अधूनमधून व्हायचं, जागोजागी पसरलेल्या उडिपी हॉटेल्समुळे इडली-डोशाचीही ओळख आम्हांला शाळेत असतानाच झाली होती. वयाच्या चौदाव्या वर्षी उडिपी हॉटेलात पहिल्यांदा मसाला डोसा खायचा योग आला असताना तो काट्या चमच्याने खायच्या काल्पनिक संकटाने मला किती घाम फुटला होता, हे माझं मलाच माहिती. गेल्या चाळीस वर्षांत अनेक देशी विदेशी पदार्थ खायचा व करायचा योग आला, तरी माझ्या कुटुंबाची वरण-भात- तुपाची गोडी यत्किंचितही कमी झालेली नाही, याची मला गंमत वाटते व अभिमानही वाटतो एक महिन्याच्या युरोपातल्या प्रवासानंतर परतताना माझ्या बारा वर्षांच्या मुलीने विमानातच, “आई, घरी गेल्यावर लगेच वरण-भात व बटाट्याच्या काचऱ्या कर, " या बेताची केलेली फर्माईश आठवली, की मला आजही हसू येतं. 'प्रतिनायक' हे बॅरिस्टर महंमदअली जिना यांच्यावरचं पुस्तक वाचताना त्यांच्या मृत्यूसमयीचं वर्णन वाचलं, मरणासन्न स्थितीतल्या जिनांनी दोन-तीन दिवस अन्नाचा कणसुद्धा खाल्ला नव्हता. त्यामुळे त्यांची बहीण फातिमा त्यांना काहीतरी खाण्याचा आग्रह करत होती. त्यावेळी पाकिस्तानच्या त्या सर्वेसर्वांनी तिला "आपली आई जशी भरपूर तूप घालून व वर पिठीसाखर पेरून गव्हाची लापशी करायची ना, तशी करून मला दे' असं सांगितलं. (जिनांचे पूर्वज गुजराती वैष्णव ह्येते. त्यामुळे त्यांच्या घरातल्या खाण्यापिण्यावर गुजराती खाद्यसंस्कृतीचा प्रभाव असावा.) खरं तर जिनांनी आयुष्यभर विदेशी राहणीचा अंगीकार केला होता. त्यांच्या बहिणीलाही आश्चर्य वाटलं. पण तिने लगेच त्यांना तशी लापशी करून भरवली. ती समाधानाने खाल्ल्यावर जिना जे कोमात गेले, ते वारलेच, तेच त्यांचं Last Supper होतं! खाण्याच्या आवडीसुद्धा बहुधा आपल्या जीन्समधूनच येत आपल्या असाव्यात, एक जुनी आठवण सुमारे तीन आठवड्यांच्या कर्नाटक व तामिळनाडूमधील वास्तव्यानंतर मुंबईला परतताना गाडी सोलापूर स्टेशनवर थांबली. खिडकीतून खमंग कांदाभज्यांचा वास आला आणि जीभ खवळून उठली! खरं तर, आम्हा दोघांना दाक्षिणात्य पदार्थ आवडतात, पण तीन आठवड्यानंतर मात्र भज्यांची आठवण निवडक अंतर्नाद • ४४१