पान:निवडक अंतर्नाद.pdf/४३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अॅटनबरोही मनातून काहीसे धास्तावलेले होते. पण आपलं हे पहिलंच दृश्य तिनं अत्यंत उत्कृष्ट दिलं. तिचं इंग्रजी निर्दोष, सफाईदार होतं. बेनप्रमाणेच तिनंही आपल्या भूमिकेवर अगदी शिस्तबद्ध परिश्रम घेतले. तिनंही सूतकताईत प्रावीण्य मिळवलं. कस्तुरबांविषयी जे जे हाती लागेल ते ते ती वाचून काढत होती; त्यावर मनन करत होती. आपल्या इंग्रजी संवादांचा ती अगदी तपशिलात जाऊन अभ्यास करी. इंग्रजीबाबतच्या तिच्या या परिश्रमांना दाद देत अॅटनबरो आपल्या पुस्तकात म्हणतात, "(मुळात) एक मराठी नाट्यकलाकार असल्यानं ती मोजकंच इंग्रजी बोले, परंतु चित्रपटाचं काम संपेपर्यंत ती आम्हां सर्वांशी अगदी सफाईदार बोलू लागली होती. " गांधीहत्येचं दृश्य : बेन आणि हर्ष चित्रपटाच्या आरंभी येतो, तो गांधीहत्येचा सीक्वेन्स, जिथं प्रत्यक्षात ती महाभयंकर घटना घडली त्या बिर्ला हाऊसच्या गार्डनमध्येच केलेलं चित्रण पुरा आठवडाभर युनिट तिथं काम करीत होतं. चित्रीकरणास काही अटींवरच परवानगी मिळाली होती. युनिटमधला तसंच जमावामधला (मॉब) प्रत्येकजण त्या अटींचं काटेकोरपणे पालन करत होता. हिरवळीवर जिथं गांधीजींनी अखेरचा श्वास घेतला, ती जागा श्रद्धेय असल्यानं तिच्या पावित्र्यास जराही धक्का लागू नये, यावर विश्वस्तांचा कटाक्ष होता. सर्व जण केवळ नियम म्हणूनच नव्हे, तर आंतरिक श्रद्धेनं ती काळजी घेत. त्यामुळे तिथं वावरताना कुणीही पादत्राणांचा वापर करत नव्हतं. सारेच अनवाणी वावरत, प्रत्यक्ष गांधीहत्येचं दृश्य चित्रित करायचं होतं, त्या दिवशी अख्खं युनिटच एक प्रकारच्या तणावाखाली होतं. वस्तुतः अॅटनबरोंच्या काटेकोर शिस्तीमुळे पूर्वतयारी पक्की होती, सारं काही जिथल्या तिथं होतं. आयत्या वेळी कशासाठीही धावपळ करावी लागणार नव्हती. पण तरीही... जो तो कामापुरतंच एकमेकांशी बोलत होता. एक विरोधाभासाची गोष्ट म्हणजे, गांधीजींचा मारेकरी नथूराम गोडसे ही भूमिका करणारा हर्ष नायर हा गांधीचरित्रकार प्यारेलाल नायर यांचा पुतण्या होता. तसा तो शारीरिकदृष्ट्या फारसा नथूरामसारखा दिसत नव्हता. तरीही अॅटनबरोंनी त्याची त्या भूमिकेसाठी निवड केली, ती त्याच्या डोळ्यांमुळे ते भेदक होते; नजर एकटक होती; पापण्या क्वचितच लवत तो चित्रीकरणाच्या आधीपासूनच खूप अस्वस्थ होता. तो बेनशी बोलत नव्हता, की त्याच्या आसपासही जात नव्हता. चित्रीकरणापर्यंत तो जणू त्याला यळतच होता. गांधीजींच्या मृत्यूचा प्रसंग जेव्हा चित्रित झाला, तेव्हा उपस्थित कलावंत, तंत्रज्ञ आणि जमाव या साऱ्यांवरच एक विलक्षण परिणाम झाला. सारेच सुत्र होऊन गेले. बेन तर नखशिखान्त नुसता थरथरत होता. त्या दृश्याचं चित्रण आटोपून अॅटनबरो त्याच्यासह छोट्या विश्रामासाठी व्हॅनकडे जात असता तो त्यांना म्हणाला, की आजवरच्या अभिनय कारकिर्दीत आपण आजच्यासारखी विलक्षण मनः स्थिती पूर्वी कधीच अनुभवली नव्हती. गांधीहत्येच्या दृश्याचा अपवाद वगळता भावनांवर जबरदस्त आघात करणारं, चित्रपटातील अत्यंत भव्य (आणि अवघडही) दृश्य म्हणजे भारतीय इतिहासातलं अत्यंत निर्घृण असं 'जालियनवाला बाग हत्याकांड. त्या चित्रणाच्या वेळीही अशाच काहीशा अनुभवातून जावं लागलं. अंत्ययात्रेच्या भव्य दृश्याचं चित्रीकरण ३१ जानेवारी १९८१ ( प्रत्यक्ष घटना घडल्यानंतर बरोबर ३३ वर्षांनी) रोजी तंत्रज्ञांनी 'गांधी' चित्रपटातील सर्वाधिक अवघड आणि भव्य दृश्याचं चित्रीकरण केलं. प्रातः काळापासून तिन्हीसांजा होईपर्यंत, मैलभर लांब असलेल्या राजपथावरून राजघाटाकडे चाललेल्या गांधीजींच्या अंत्ययात्रेचं शोकाकुल असा प्रचंड जनसमुदाय महात्म्याच्या पुष्पावृत अचेतन देाला अखेरची सोबत करत होता. प्रचंड जनसमुदाय असलेलं, चित्रेतिहासात संस्मरणीय ठरलेलं हे एक विराट दृश्य. त्यात महत्त्वाच्या प्रमुख भूमिका साकारणाऱ्या १४ कलाकारांखेरीज पोलीस नि लष्कर यांच्या सहा विविध शाखांची एकूण १०६० गणवेशधारी माणसं, शववाहक गाड्याच्या आसपास सबंध दिवसभर वावरणारे १००० शोकग्रस्त (३३ वर्षांपूर्वीच्या मूळ व्यक्तींसारखीच त्यांची वेशभूषा ठेवण्यात आली होती); गर्दीचा बंदोबस्त राखणारे ३००० होम गार्ड आणि ८९,५०० लोकांचा शिस्तबद्ध जमाव भाग घेत होता. या दृश्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ११ कॅमेरे नेमस्त केले होते. त्यांनी निश्चित केलेल्या चित्रण क्षेत्रांनुसार गर्दीतल्या लोकांना रस्त्यावरील वेगवेगळे विभाग वाटून दिले होते. कॅमेऱ्यांची हाताळणी भारतीय, सध्या भारतातच असलेले ब्रिटिश आणि खास या दृश्यासाठी इंग्लंडडून मागवलेले आणखी ब्रिटिश तंत्रज्ञ यांचा ताफा करत होता. या अंत्ययात्रेच्या दृश्यासाठी प्रचंड प्रमाणावर जनसमुदायाची आवश्यकता होती. एवढे लोक जमवणं, त्यांना त्यांचा मेहनताना देणं, ही गोष्ट अॅटनबरोंच्या ह्यताबाहेरची होती. त्यांनी गांधीजींच्या पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशीच चित्रीकरण निश्चित केलं. कारण दर वर्षीप्रमाणेच बाहेरचेही खूप लोक श्रद्धांजली वाहण्यासाठी दिल्लीत येणार होते. त्यांनी, तसंच स्थानिकही लोकांनी दृश्यात भाग घेण्यासाठी एक आवाहनात्मक जाहिरात चित्रीकरणाच्या आदल्या दिवशी ३० जानेवारीला 'हिंदुस्थान टाइम्स' मध्ये झळकली - 'उद्या ३१ जानेवारीस इतिहासाची पुनर्निर्मिती होणार आहे. आपण तेव्हा तिथं असाल ?' अवघ्या दोन वाक्यांची पण अत्यंत कल्पक अशी ही जाहिरात कमालीची परिणामकारक ठरली आणि चित्रीकरणाच्या दिवशी हा हा म्हणता राजपथ गर्दीनं ओसंडून गेला. नेहमी भरपूर वर्दळ असलेला राजपथ या दृश्यासाठी एका सकाळपुरता बंद राखण्याचा परवाना मिळवण्यात आला होता. निवडक अंतर्नाद ४३३