पान:निवडक अंतर्नाद.pdf/४२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झालेल्या अनेक कामांत ते व्यग्र होते, 'गांधी' परंतु अॅटनबरोंनी त्यातूनही एक तोडगा काढला चित्रपटाच्या पटकथेचा पहिला खर्डा तयार होईपर्यंत सर अॅलेक यांनी दम धरावा आणि तो वाचल्यावरच त्यांनी काय तो अंतिम निर्णय घ्यावा. यास मात्र त्यांनी संमती दिली. यापूर्वी दिग्दर्शक डेव्हिड लीन यानं याच विषयावर चित्रपट करण्याचा विचार चालवला होता, तेव्हा गांधीजींची भूमिका वठवण्याबद्दल तो आणि सर अॅलेक गिनेस यांच्यात चर्चा झाल्याचं अॅटनबरोंना ठाऊक होतं. त्यामुळे ते आशावादी होते. परंतु चित्रपटाच्या सुधारित पटकथेचा पहिला भाग पाठवल्यानंतर सर गिनेस यांच्याकडून आलेल्या पत्रानं अॅटनबरो यांची पार निराशाच झाली. पटकथा अत्यंत काळजीपूर्वक वाचल्यानंतर तर आपली पुरतीच खात्री पटली, की ही भूमिका करण्याची आपली मुळीच पात्रता नाही, असं सांगणाऱ्या त्या पत्रात गिनेस यांनी जे लिहिलं होतं त्याचा भावार्थ असा - “पटकथा अत्यंत तरल आणि वेधक झाली आहे. सत्याचं अधिष्ठान असल्यानं तिला अधिकृतता प्राप्त झाली आहे त्याबद्दल तू आणि पटकथाकार दोघेही अभिनंदनास पात्र आहात, पण मत्प्रिय डिकी (रिचर्ड), मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं, की माझ्याशिवायच तू अधिक काहीतरी चांगलं करू शकशील. मला अजूनही वाटतं, की गांधीजींच्या भूमिकेसाठी एखाद्या भारतीयाचीच गरज आहे. माझ्या या पत्रानं तुझी किती निराशा होणार आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. माझ्याबद्दलचा तुझा नितांत सुहृदभाव, तसंच ही भूमिका मलाच देण्याविषयी तुझा उत्साह आणि माझ्या पात्रतेबद्दल तुला वाटणारी खात्री मी जाणतो. परंतु ही भूमिका मी करणं, हे मला स्वत:लाच अप्रामाणिकपणाचं वाटतं, कारण मी खूपच वयस्कर, खूपच करड्या डोळ्यांचा नि खूपच धट्टाकट्टा आहे. असो.” पत्राच्या वाक्यावाक्यातून प्रांजलपणा व्यक्त होत होता. तरीही सर अॅलेक यांचा हा नकार पचवणं अॅटनबरोंना जडच गेलं. त्याहूनही अवघड प्रश्न म्हणजे, पंडित नेहरूंना हे कसं सांगायचं? कारण गांधीजींच्या भूमिकेत सर अॅलेक गिनेस, या कल्पनेनंच ते किती उत्साहित, प्रभावित झाले होते! आणि त्यानंतरच्या प्रत्यक्ष भेटीत नेहरूंनी तो विषय काढलाच अॅटनबरोंनी एकूण हकिगत सांगितल्यावर नेहरूंनी ही निराशा, खंत व्यक्त केली. कारण बापूंच्या भूमिकेसाठी सर अॅलेक यांचंच व्यक्तिमत्त्व अत्यंत सुयोग्य आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता. या विषयाच्या ओघात अॅटनबरो यांनी त्यांना विचारलं, "पंडितजी, मला अगदी खरंखरं सांगा. एका इंग्लिशमननं आपल्या महान नेत्याची भूमिका वठवणं, हे तत्त्वतः तुम्हांला स्वतःला आणि एकूणच अखिल भारताला कितपत स्वीकारार्ह वाटतं?" पंडितजी क्षणभर घुटमळले आणि मग एक खट्याळ हास्य करीत म्हणाले, "तसं जर खरोखरच घडलं... एक इंग्लिशमन आपली भूमिका साकारतोय, हे गांधीजींना स्वर्गात कळलं, तर ते पोट धरधरून हसतील." POV बेन किंग्जले (गांधी) आणि अॅटनबरो नेहरूंच्या मनाचा एकूण कल पाहून अॅटनबरोंनी पुन्हा एकवार सर अॅलेक गिनेस यांच्याकडे विचारणा केली. पण त्यांचा नकार कायमच होता. १९६४मध्ये नेहरू यांचं निधन झालं आणि सरकारी स्तरावरील चित्रपटविषयक संपर्कच काही काळ खंडित झाला. नंतर लालबहादूर शास्त्री मंत्रिमंडळात इंदिराजी माहिती आणि प्रसारण खात्याच्या मंत्री झाल्या. त्यांच्या अखत्यारीत चित्रपट माध्यमही येत होतं, तेव्हा, आणि त्यानंतरही त्या देशाच्या पंतप्रधान असताना, त्यांनी 'गांधी' प्रकल्पासंदर्भात अॅटनबरोंची सतत पाठराखण करत त्यांना मोलाची मदत केली. साठच्या पूर्वार्धात अॅटनबरो आणि कोठारी यांनी आपल्या चित्रपट निर्मिती संस्थेचं नाव 'इण्डो- ब्रिटिश फिल्म्स' असं ठेवलं. चित्रपटाचं तात्पुरतं नाव 'द नेकेड फकीर' असं ठेवण्यात आलं. अजूनही आवश्यक ते भांडवल उभारण्यासाठी ते दोघे आटोकाट प्रयत्न करत होते. परंतु त्यांना त्यात म्हणण्यासारखं यश येत नव्हतं. लवकरच अॅटनबरोंच्या लक्षात आलं, की या मार्गात निवडक अंतर्नाद ४२५