पान:निवडक अंतर्नाद.pdf/४१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्याच सुमारास पु. ल. देशपांडे यांनी रामूभैय्या दाते यांच्यावर लिहिलेला लेख खूपच गाजला होता. रामूभैय्या दाते यांचं अख्तरी प्रेम, त्यांचं गजल प्रेम सगळ्या महाराष्ट्रात गाजत होतं. रामूभैय्यांचा मुलगा अरुण दाते पण भावगीतगायक म्हणून चमकू लागला होता. पुण्याच्या प्रसिद्ध कलावती आणि धनवती वसुंधरा पंडित या आपल्या बंगल्यावर मोठमोठ्या कलावंतांच्या खासगी मैफली करायच्या आणि काही निवडक लोकांना निमंत्रित करायच्या. त्यांनी अख्तरीबाईंचा गंडा बांधला होता आणि त्या वसंतराव देशपांड्यांच्याकडेपण गाणं शिकायच्या. वसुंधराबाईंकडे आम्ही अनेक नामवंतांची गाणी अगदी खासगीत ऐकली. पं. जसराज जेव्हा उगवते कलाकार होते तेव्हा त्यांचा अप्रतिम यमन इथेच ऐकला. आज उस्ताद असलेल्या जाकीर हुसेनचा तबला त्यांच्या पोरवयात इथेच ऐकला. "आमच्याबद्दल पेपरमध्ये काहीतरी लिहाना' अशी त्यांनी त्यावेळी केलेली विनंती अजूनही आठवते. पं. शिवकुमार यांनी संतूरवर रंगवलेला अप्रतिम पहाडी आणि पं. गोपीकृष्ण यांचे नेत्रसुखद भावनृत्य इथेच मनमुराद अनुभवले. अशा या मैफलीत बेगम अख्तर गाणार, एवढंच नव्हे तर त्या आठ दिवस इथे मुक्काम करणार, अशी बातमी वसुंधराबाईंनी फोनवरून दिली आणि मैफलीचं आग्रहाचं निमंत्रणपण दिलं. मैफलीसाठी बंगल्यावर गेलो तेव्हा नुकतीच पावसाची सर येऊन गेली होती. हवेत सुखद गारवाही होता. मोगऱ्याचा गजरा देऊन सगळ्यांचं स्वागत करण्यात आलं होतं. त्याचा सुगंध घेत गुलाबाच्या फुलांनी सजवलेल्या दिवाणखान्यात पाऊल टाकलं तेव्हा संगीत आणि साहित्य या क्षेत्रांतील नामवंत मंडळी दिसली. पु. ल. देशपांडे, वसंतराव देशपांडे, संगीत समीक्षक वामनराव देशपांडे, माणिक वर्मा अशी दिग्गज मंडळी हजर होती. इतक्यात बेगम अख्तर सुहास्य मुद्रेनं रंगमंचावर आल्या. चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास, नाकात चमकणारी चमकी आणि तोंडात पान! सर्वांना नमस्कार करून त्यांनी पेटीवर लडिवाळपणाने बोटं फिरवली आणि सूर लावला. दोन पेट्या, दोन तंबोरे या सर्वांच्या सुरांवरून तरंगत त्यांचा मधाळ स्वर कानातून थेट हृदयात उतरला. अंगावर रोमांच उभे राहिले. मला त्यांचे धारवाडचे शब्द आठवले. सुरांचा असर! परिणामकारक सूर! माझ्या शेजारीच वसंतराव देशपांडे बसले होते. ते म्हणाले, "प्रत्येक स्वर म्हणजे चोख सोनं आहे. अहाहा! याला म्हणतात गाणं. ” मी माणिकबाईंकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते. हिराबाईसारखी ज्येष्ठ गायिका मूकपणे बसून होती, "मुश्किल है भैय्या! मुश्किल है!" पु.ल. शहारून म्हणत होते. त्या रात्री अख्तरीबाईंनी अनेक गजल, दादरे, ठुमऱ्या पेश केल्या. त्या मैफल संपवणारच होत्या इतक्यात भीमसेनजींनी नम्रपणे फर्माइश केली. "कोयलिया मत कर पुकार " भीमसेनजींनी आमच्या सर्वांच्याच मनातली फमाईश केली होती. या दादयाशिवाय त्यांची मैफल होणंच शक्य नव्हतं. त्या हसल्या आणि त्यांनी सुरुवात केली. ४१८ निवडक अंतर्नाद 'कोयलिया मत कर पुकार, कलेजवा लागे कटार' अहाहा! पुन्हा तो आमराईतला आम्रगंध आणि ती विरहिणी आमच्यासमोर साकार झाली. स्वरांचा सामर्थ्यशाली आविष्कार आम्ही पुन्हा अनुभवू लागलो. "आता बरीच रात्र झाली. भैरवी घेते,” अख्तरीबाई म्हणाल्या. "गुस्ताखी मुआफ ! पण भैरवीच घ्यायची असेल तर मग 'रतियां किधर गवाई रे बलम हरजाई हीच घ्या.” वसंतराव अदबीने म्हणाले, "हां हां ! क्यूं नहीं" असं म्हणून अख्तरीबाईंनी भैरवी सुरू केली. "रतियां किधर गवाई रे ऽऽ.., " शेवटचे सूर वातावरणात विरले! शांत शांत! कोणीही त्या श्रवणसमाधीचा भंग करायला तयार नव्हतं. सन्नाटा ! मैफलीच्या यशाची पावती! ज्या शांततेमुळे कलावंताची तपश्चर्या धन्य होते तो शांततेचा क्षण ! श्रोत्यांना मूक करणारा! अंतर्मुख करणारा! मैफलीनंतर आम्ही काही निवडक लोक थांबलो होतो. अख्तरीबाईंबरोबर खाणेपिणे, गप्पा-टप्पा झाल्या. वसंतराव जायला निघाले. अख्तरीबाई त्यांना सोडायला तयार नव्हत्या. गाणं ऐकवा म्हणाल्या, "क्या गला और कैसा दिमाग दिया है परवरदिगारने ' अख्तरीबाई कौतुकाने म्हणाल्या. वसंतराव मग पेटी घेऊन पहाटेपर्यंत गात होते. पु.ल. आणि अख्तरीबाई भरभरून दाद देत होत्या. "जीओ ! जुग जुग जीओ!” मैफल संपली तेव्हा अख्तरीबाई म्हणाल्या. पहाटेची चाहूल लागली होती. अख्तरीबाईंचा निरोप घेऊन बाहेर पडलो तेव्हा रामू भैय्यांचे उद्गार आठवले. त्यांनी म्हटलेला शेर मनात घोळू लागला, "अब तो ये तमन्ना है के, किसको भी न देखूं सूरत जो दिखादी है, ले जाओ नजर भी!" दिवस जातच होते. अधूनमधून भेटी होत होत्या आणि १९७४च्या ३० ऑक्टोबरला त्यांच्या अचानक निधनाची बातमी आली. अहमदाबादच्या एका मैफलीत गातानाच हृदय बंद पडून त्यांचं निधन झालं. ती बातमी ऐकून सुत्रपणानं मी बसून होतो. त्यांचा हसरा चेहरा डोळ्यांसमोर तरळत होता. नाकातली चमकी चमकत होती. आणि त्याचे ते उद्गार आठवत होते "बस्स! एकच इच्छा आहे. मरण येणारच आहे, गाता गाता ते यावं हीच इच्छा, " परवरदिगारनं त्यांची ती 'मुराद पूर्ण केली. पुण्यवान आत्मा! त्यांच्या निधनानं शोकाकूल झालेलं माझं मन म्हणत होतं, 'बड़े शोक से सुन रहा था जमाना, तुम ही सो गये दास्तां कहते कहते. ' (एप्रिल १९९८)