पान:निवडक अंतर्नाद.pdf/४१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"छे: छेः नवऱ्याला सोडण्याचा, " "बापरे!" मी दचकून म्हणालो, माझी मध्यमवर्गीय नीतिकल्पना हादरून गेली. "हाः हाः हाः " अख्तरीबाई हसत म्हणाल्या. "दचकलास ना! पण माझा दुसरा नवरा चांगला आहे बॅरिस्टर तर आहेच पण गाण्याचा, उर्दू शेरोशायरीचा शौकीन आहे” बेदरकारपणानं सिगरेटचा झुरका घेत आणि ऐटीत मान झुकवीत त्या म्हणाल्या, "माझी निष्ठा फक्त सुरांशी आहे. सूर माझा परमेश्वर आहे मी जर बेसूर गायले तर आणि तरच तो व्यभिचार होईल. बाकी सगळं झूट आहे फक्त सूर हेच सत्य आहे." किंचित थांबून त्या थोड्या आत्ममग्न झाल्या आणि मग जराश्या गंभीरपणानं म्हणाल्या, "हे बघ बेटा, या विश्वाचा मालिक, आपल्या सर्वांचा जन्मदाता, आपल्याला जन्म देताना प्रत्येकाच्या कानात पुटपुटतो आणि त्याचं जन्माचं प्रयोजन त्याला सांगतो. क्रांतिकारकाला तो सांगतो, तू देशासाठी हसत हसत फाशी जा. शास्त्रज्ञाला सांगतो, तू तहान-भूक विसरून प्रयोग करीत राहा. बाकी सगळं मी बघतो. बस्स! मी त्याची आज्ञा पाळते आहे. त्याचा हुकूम पाळते आहे. त्यात कसलाही कसूर करत नाही. म्हणून मला वाटतं बाकी सगळं मला माफ आहे. आपण आपल्या सुरात गात राहावं. जीवन कसं सुरेल होऊन जातं." घरी परतलो तेव्हा त्यांचे हेच शब्द मनात घुमत होते. 'आपण आपल्या सुरात गावं जीवन कसं सुरेल होऊन जातं. ' संध्याकाळी निमंत्रितांसमोर मैफल होती. मी त्यांना नेण्यासाठी गाडी घेऊन गेलो तेव्हा त्या नमाज पढत होत्या. नमाज संपवून त्या गाडीत बसल्या तेव्हा म्हणाल्या, "इतकी वर्षं गाते आहे हजारो मैफली केल्या. पण खरं सांगते, अजूनही प्रत्येक मैफलीच्या आधी मी मनापासून त्याची प्रार्थना करते. विनवणी करते. ऐ खुदा, रहम कर माझा प्रत्येक सूर सच्चा लागू दे. तू जे काम मला नेमून दिलं आहेस ते सचोटीने पार पाडण्याचं सामर्थ्य मला दे, ” संध्याकाळची ती मैफल विलक्षण रंगली. धारवाड आणि हुबळी इथले निवडक रसिक हजर होते. या कानडी मुलुखातल्या, उर्दू विशेष न जाणणाऱ्या लोकांसमोर अख्तरीबाईंचं गाणं रंगणार का, अशी मला बारीकशी शंका होती. पण अख्तरीबाईंचा स्वर असा तेजाळ होता की त्या स्वरांनीच सर्वांना दिपवून यकलं. त्या मैफलीत अख्तरीबाईंनी ठुमरी, दादरा, होरी लोकगीत हेच प्रकार जास्ती गायले आणि नंतर दोन गजल पेश केल्या. त्यामुळे मंडळी खूष होती. स्वरांचा 'मझा' मनमुराद लुटत होती. दुसऱ्या दिवशी त्यांना 'अलविदा' करताना त्या म्हणाल्या, "बेय, लक्षात ठेव. सुरांचं सतत स्मरण हे महत्त्वाचं आहे. हाच खरा रियाज, मग प्रत्यक्ष ते स्वर गळ्यातून काढायला जो रियाज हवा, तो थोडा वेळ केला तरी तेवा पुरेसा होतो. महत्त्व आहे ते चिंतनाला अध्यात्मामधले लोक जसं सतत ईश्वराचं नामस्मरण करतात तसं संगीतातल्या माणसानं सतत सुरांचं स्मरण करायला हवं, कारण तोच त्याचा ईश्वर आहे तोच त्याचा मोक्षपण आहे. अच्छा, खुदा हाफीज, उपरवालोने चाहा तो फिर मिलेंगे." त्या हात हलवीत म्हणाल्या. त्यांच्या मंदस्मिताबरोबरच त्यांच्या नाकावरची चमकीपण मंदपणे हसली. उपरवाला खरोखरच मेहेरबान होता. कारण केवळ आठच वर्षांनी त्यांचा माझा पुन्हा एकदा निकट सहवास झाला. धारवाडहून पाटणा आणि पाटण्याहून पुणे अशी माझी बदली झाली. पुण्यात अनेक गुणी कलावंतांशी जवळीक झाली. वसंतराव देशपांडे यांच्याबद्दल मला अतीव आदर होता. त्यांची विद्वत्ता, त्यांचा हजरजबाबीपणा, त्यांचा चौफेर जाणारा गळा, त्यांची चिकित्सक दृष्टी हे सारं सारं चकित करणारं होतं. थक्क करून टाकणारं होतं. त्यांचे आणि माझे सूर कसे काय जुळले कुणास ठाऊक. माझ्या कुंडलीतला तो शुभयोगच म्हणायचा. पण जुळले खरे. एरवी लोकांना चटकन तोडून टाकणारे वसंतराव माझ्या सुदैवाने माझ्याशी अत्यंत आपलेपणाने बोलायचे. एवढा मोठा कलाकार पण आकाशवाणीने त्यांना सामान्य कलाकाराचा दर्जा दिला होता. त्यामुळे ते आकाशवाणीवर गातच नव्हते. त्यांचा आकाशवाणीवरचा दर्जा वाढावा म्हणून अनेक अधिकाऱ्यांनी खटपटी केल्या. पण दिल्लीवाल्यांनी दाद दिली नाही आणि म्हणून वसंतरावही आकाशवाणीवर गायला आले नाहीत. आकाशवाणीचा सर्वोच्च वर्ग मिळाल्याशिवाय मी गाणार नाही या त्यांच्या प्रतिज्ञेला त्यांनी केवळ एकच अपवाद केला. पुणे आकाशवाणीवर 'गीतारती' नावाचा रागदारीवर आधारित 'सुगम संगीताचा कार्यक्रम मी दरमहा सादर करीत असे. या कार्यक्रमाच्या एका गाण्यासाठी ते केवळ माझ्या विनंतीवरून आले. माझ्या स्नेहासाठी त्यांनी आपल्या प्रतिज्ञेला जी मुरड घातली, मनाचा जो मोठेपणा दाखवला, त्या आठवणीनं आजही गहिवरून येतं. अशा या दिलदार आणि प्रतिभावान कलाकाराच्या जीवनात वादळवारं शिरलं सरकारी नोकरीत असलेल्या वसंतरावांची दूरच्या प्रांतात बदली झाली. कलेसाठी अत्यंत पोषक असलेलं पुण्यामुंबईचं क्षेत्र सोडून दूरप्रांती केवळ नोकरीसाठी जाणं त्यांना मानवेना. त्यांनी निर्णय घेतला; स्वेच्छानिवृत्ती घेतली. " या ग्रेट बाईमुळे मी हा निर्णय घेतला, " वसंतराव समोरच्या अख्तरीबाईंच्या तसबीरीकडे बोट दाखवीत म्हणायचे, त्यावेळी त्यांच्या लहानशा घरात भिंतीवर फक्त अख्तरीबाईंची तसबीर होती. "या बाईनं मला सांगितले, 'अरे तू सिंह आहेस, असा कोकरासारखा काय वागतोस. तुझ्यासारखा चौफेर गायक कोण आहे? सोड नोकरी. सुरुवातीला होईल थोडा त्रास. पण एकदा मैफली व्हायला लागल्या की फुरसत नाही मिळणार तुला.' आणि अगदी तसंच झालंय. या बाईमुळे मी या क्षेत्रात झोकून दिलं स्वत:ला, नाहीतर कुठल्यातरी खेड्यात आकडेमोड करीत बसलो असतो, " वसंतराव कृतज्ञतेने म्हणायचे. निवडक अंतर्नाद •४१७