पान:निवडक अंतर्नाद.pdf/४१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एकूणात दहा लाखांचे सैन्य पाठवले होते. त्यापैकी ५८ हजारांवर सैनिक मारले गेले होते. ७५ हजार अपंग झाले, त्यापैकी २३ हजारांवर पूर्णपणे अपंग झाले होते. पाच हजारांवरच्या काहीनी हात, नाहीतर पाय गमावला होता, जे सैनिक मारले गेले होते त्यांची वये बव्हंशी २० वर्षांखालचीच होती. दीड हजारांचा पत्ताच लागला नव्हता, ते हरवलेच होते जणू. जे मारले गेले होते त्यांच्यापैकी अधिक संख्या होती ती कृष्णवर्णीयांचीच. त्या दहा लाख लोकांपैकी काही स्वयंपाकी, कामगार अशी माणसेही होतीच, त्यांच्यामधले काही लोकदेखील बॉम्ब वर्षावाखाली मृत्यू पावले होते, अपंग झाले होते. दक्षिण व्हिएटनाममधील दोन ते अडीच लाख लोक व्हिएटकाँगने केलेल्या बॉम्ब वर्षावात, गनिमी युद्धात मारले गेले होते. तर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामुळे नऊ लाखांच्यावर व्हिएटकाँगच्या सैनिकांना मारले होते. त्यांच्यापैकी काही सामान्य नागरिकदेखील होते. व्हिएटनाममधून परत आल्यानंतर सगळ्यांनी आपले पूर्वीसारखे आयुष्य जगायचा प्रयत्न केला, तशीच त्यांची इच्छा होती. पण अनेकांचे घटस्फोट झाले, बरेच ड्रग अॅडिक्ट झाले, मनोरुग्ण झाले. कुटुंबापासून दुरावलेपण आले, आजारपणे सोसावी लागली. अमेरिकन सरकारने ज्यांना ज्यांना वैद्यकीय मदतीची गरज असेल त्यांना सर्वप्रकारे मदत दिली. तरीदेखील त्यांना सर्वतऱ्हेची दुःखे, अपमान सहन करावे लागत होते. त्यांची संख्या मोठीच होती. हे सगळे यळण्यासाठी अनेकांनी सांगायला सुरुवात केली की आम्ही व्हिएटनामला गेलोच नव्हतो, आम्ही फक्त तिकडे जाणाऱ्या सैनिकांच्या सामानाची ने आण केली. तिकडे जावे लागले तरी आम्ही लढायला गेलो नाही, तळावरची कामे करीत होतो. अमेरिकन सैन्य परत गेले. ज्यांना शक्य झाले ते व्हिएटनामी लोकही गेले अमेरिकेला. पण ज्यांना मागे राहावेच लागले, त्यांना व्हिएटकाँगकडून अतोनात छळ सोसावा लागला. तिथेही आत्महत्या करणाऱ्यांची संख्या कमी नव्हती, दक्षिणेतील राजधानीचे शहर 'सायगाव' हे नाव बदलून त्याचे संपूर्ण 'हो ची मिन्ह' ठेवण्यात आले. आजही व्हिएटनामवर कम्युनिस्टांचेच राज्य आहे. पण काय काळाचा विचित्र महिमा, की आजच्या व्हिएटनामला आपल्या एकमेकांच्या कट्टर शत्रू असलेल्या अमेरिकेशीच व्यापारी, आर्थिक संबंध जोडायचे आहेत; ते वाढवीत न्यायचे आहेत; त्याबद्दलची बोलणी सुरू झालीच आहेत. व्हिएटनाममधील युद्ध संपल्यानंतर २५-३० वर्षांनंतर अनेक अमेरिकन सैनिक, आपल्या वृद्धावस्थेत पुन्हा दक्षिण व्हिएटनाममध्ये गेले आहेत. काहींना त्या वेळच्या युद्धकाळातील आपल्या व्हिएटनामी सहकाऱ्यांचा शोध घेऊन भेटायचे आहे. काहींना तर तिथेच स्थायिक व्हायचे आहे. युद्धकाळात ज्यांचे स्थानिक स्त्रियांशी नाते जुळले होते, मुले झाली होती, त्यांना भेटायचे आहे. पुन्हा संसार सुरू करायचा आहे. त्यासाठी जमेल त्या नोकऱ्या करायच्या आहेत. एक वयस्क सैनिक तर एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करू लागले आहेत. 'त्या काळात आम्ही किती वाईट वागलो ! मूर्खपणाच होता तो! त्याची भरपाई करावीशी वाटते म्हणून परत आलोय' असे सांगणारे आहेत. तसेच, अमेरिकेत राहाताना मनाला सतत येचणी लागली होती. आता इथं या लोकांमध्ये राहून मनाला शांत वाटतंय.' तर कोणी म्हणाले, 'मला ईश्वरानेच सांगितलं, जा तिकडे, म्हणून मी आलोय परत. इथं आम्ही लढलो. कितीतरी लोकांना मारलं. मग परत गेलो. आता वाटतंय आपले अखेरचे दिवस इथेच काढावेत, मरण यावं ते इथेच. म्हणून आलो इथे, ' जी गोष्ट अमेरिकन सैनिकांची तीच गोष्ट रशियन सैनिकांची फरक असा की कोणीही रशियन सैनिक आपणहून अपराधीपणाच्या भावनेची भरपाई म्हणून अफगाणिस्तानात आले नाहीत. तर काही रशियन सैनिक शहरांपासून दूरवरच्या डोंगरदऱ्यांमध्ये, तर कधी खेडेगावांत जखमी होऊन, बेशुद्ध होऊन पडले होते. क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या अफगाणांची दुसरी बाजू अशा परिस्थितीत बघायला मिळते. जखमी, बेशुद्ध होऊन पडलेल्या माणसांची दया येऊन काही अफगाणांनी त्यांना आपल्या घरी नेले, दवापाणी दिले, खाणेपिणे सांभाळले. त्यांची प्रकृती सुधारली, पण त्या सैनिकाना परत आपल्या सैनिकी ठाण्याकडे जायची इच्छाच झाली नाही. रशियाला जाणे तर दूरच, ते तिथेच राहू लागले. काहींच्या मनात कुठेतरी अपराधाची भावना होतीच. या निरपराध अफगाणांना आपण काय म्हणून मारतच निघालो होतो, त्याबद्दलची. युद्धानंतर २५-३० वर्षांनंतर अशा अनेक रशियन सैनिकांचा ठावठिकाणा उजेडात आला. बचेरत्झिन चकीमॉव्ह, खाकीमॉव्ह अशा काहींच्या मुलाखती घेतल्या गेल्या, जखमी झाले होते तेव्हा अफगाणांनी त्यांना संभाळले होते. प्रकृती सुधारल्यानंतर ते त्याच ठिकाणी राहू लागले. अफगाण मुलींशी विवाह केले दोघांनी त्यांना आपल्या घरी जायची इच्छा आहेच, नातेवाइकांना मित्र मंडळींना भेटायची इच्छा आहे, पण त्यांची इच्छा असेल तरच आपण अफगाणिस्तानात जी काय कामगिरी केली त्याबद्दल आपल्याच लोकांच्या मनात नाराजी, संताप आहे हे त्यांना कळले होते. म्हणूनही त्यांना घरी परतायचा धीर झाला नव्हता. शिवाय अफगाणांनी त्यांना नीटपणाने सांभाळलेच होते. जेनेडी निखम्मन हा युक्रेनचा वीस-बावीस वर्षांचा पायलट त्याच्या तळावर मुजाहिदींनी हल्ला केला, तोडफोड केली आणि जेनेडीला घेऊनच ते पळून गेले. त्याला आपल्या ताब्यातच ठेवून घेतले. रशियाला वाटले जेनेडी मुजाहिदींना सामील झाला आहे हे कळल्यावर परत जायची त्याची हिंमतच नाही झाली. तो तिथेच राहू लागला. त्याने मुजाहिदींना मदत नाही केली, पण तिथेच राहावे लागणार म्हणून इस्लामचा स्वीकार केला. अफगाणांचे कपडे घालू लागला, फारसी उत्तम बोलू लागला. अफगाण मुलीशी लग्न केले. दोन मुलगे, दोन मुली झाल्या. काठी घेऊनच चालू लागला. आपल्या कुटुंबाला सांभाळायचे म्हणून मिळेल ती कष्टाची कामे करू लागला, निवडक अंतर्नाद ४११