पान:निवडक अंतर्नाद.pdf/४०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुरुवात कोणी केली, का केली, केव्हा केली? त्याबद्दल आम्ही विचारच करत नाही. आमची माणसं मारली गेली याचंच दुःख होतं आम्हाला.' लहान मुलांनादेखील मारल्याचे काही सैनिकांनी सांगितले, एकाने म्हटलेय, 'धडकी भरणं, भीतिग्रस्त होणंच माणसाचा पशू बनवतो, आम्हाला सांगितलं होतं, अफगाणिस्तान आपल्या सगळ्यांना बंधुभाव शिकवतो! ते सांगणं म्हणजे खोटेपणाची कमाल होती. अफगाणांनी हजारो रशियनांना मारलं होतं, मेलेल्यांच्या अंगावरचे पैसे, शस्त्रंच काय कपडे, बूटदेखील काढून घ्यायचे. आमचे लष्करी टॅक्स, रणगाडे, जीप्स, हेलीकॉप्टर्स उद्ध्वस्त करायचे. एवढेच नाही तर एकटा-दुकटा रशियन त्यांच्या ताब्यात सापडला की त्याच्या संपूर्ण शरीराची कातडी सोलून त्याला झाडाला टांगून ठेवायचे!' त्या सैनिकाचे हे सांगणे खरेच होते. एकदा ही घटना माझे पती फिरोझ रानडे यांच्या ऑफिसातील गुहा या इंजिनिअरने पाहिली होती. गुहा काबूलहून गझनीला जात होते. तेव्हा एका लहानशा गावातून जाताना एका गोऱ्या माणसाला सोलून काढून झाडाला टांगून ठेवलेले त्यांनी पाहिले होते. गुहा तिथूनच काबूलला परतले आणि त्यांनी आपल्या राजदूताकडे मागणी केली की मला भारतात परत पाठवा. अफगाणांच्या क्रौर्याला तर सीमाच नाहीत. एका रशियन सैनिकाने स्वेटलानाला सांगितले, 'एखादा रशियन सैनिक हाती लागला तर त्याला त्याच्या गळ्यापर्यंत जमिनीत पुरून, जमिनीवरच्या त्याच्या मस्तकाभोवती जागा मोकळी करायचे आणि मग त्याच्या मस्तकावर गावातले पुरुष, मुलगे लघवी करीत राहायचे, एखादे वेळेस तो रशियन सैनिक मरून जायचा, तो मेला नाही, तर त्याला खड्यातून बाहेर काढून त्याला पिस्तुलाने मारून टाकायचे. ' अशाच एका घटनेबद्दल ब्रिटनचे एकेकाळचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनीदेखील त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलेय. त्यांच्या अगदी तरुण वयात १८९७ साली ते वायव्य प्रांतातील पश्तून लोकांच्या एका गावात राहात होते. तेव्हा ते ब्रिटिश सैन्यात रुजू झाले होते. त्याचवेळी ते वार्ताहर म्हणूनही बातम्या पाठवायचे. 'माय अर्ली लाइफ' या पुस्तकात त्यांनी अशाच एका घटनेचा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्याशिवाय असेही नोंदवले आहे की एकदा ब्रिटिश सैन्यातील ३६ हिंदुस्थानी आणि ब्रिटिशांना अफगाणांनी मारल्यानंतर, ब्रिटिशांनी त्यांचे त्याच भागात दफन केले आणि ते माघारी निघून गेले. त्यानंतर ती जागा अफगाण्यांना सापडली. त्यांनी त्यांना जमिनीतून बाहेर काढले आणि त्यांच्या प्रेतांना गोळ्या घातल्या! अफगाणिस्तातून परत आलेल्या एका सैनिकाच्या आईने म्हटलेय, 'आमच्या मुलांना सरकारने तिकडे पाठवले. तिथूनच मग त्या सैनिकांच्याच कितीतरी शवपेट्या येऊ लागल्या. कधी शवपेट्या मुलांच्या आईवडिलांच्या घरी पोचवल्या जायच्या, तर मॉस्कोपासून दूरवरच्या गावातल्या मुलांच्या आईवडिलांना कळवले जायचे की मॉस्कोला येऊन तुमच्या मुलांची शवपेटी घेऊन जा. त्यावेळी त्या आईवडिलांच्या जिवाची जी काय घालमेल व्हायची, ती शवपेटी आपल्या गावी घेऊन जाताना त्यांची जी काय परवड व्हायची त्याची आपण कल्पनादेखील करू शकणार नाही,' अशी वर्णन आहेत स्वेटलानाच्या पुस्तकात, कोणी सैनिक धडधाकट, तर पुष्कळसे अपंग होऊनच परत आले की ती मुले आपल्या घरच्यांना, नातेवाइकांना • अफगाणिस्तानात चाललेल्या मरणातांडवाबद्दल सांगायची. पण त्यांच्या सांगण्यावर लोकांचा विश्वासच बसायचा नाही. कारण दूरचित्रवाणीवरून त्यांना सतत वेगळेच काही दाखवले जायचे. ते म्हणजे अफगाण माणसे रशियन सैनिकांचे मनापासून स्वागत करताहेत, त्यांना गळामिठ्या मारताहेत, त्यांच्या रणगाड्यांवर फुले उधळत आहेत. श्रीमंत जमीनदारांकडून त्यांची शेती सरकार काढून घ्यायचे, ती शेती गरीब शेतकऱ्यांना शेतमजुरांना देताना दाखवायचे. मग ते शेतकरी, मजूर, शेतजमिनीची माती कपाळाला लावताना दाखवले जायचे. पण प्रत्यक्षात अफगाण आणि आमची माणसं एकमेकांना मारतच सुटली होती. ' एका सैनिकाचा मात्र एक अगदी वेगळाच असा हा अनुभव. त्याला अफगाणांची भाषा येत होती. एका खेडेगावात तो पोचला, तो आपली मशिनगन घेऊनच तिथे पोचताच तो तिथल्या गरीब लोकांशी फारसी भाषेतच बोलू लागला. त्यांना आश्चर्यच वाटले. त्यांनी विचारले, 'तू मुसलमान आहेस का?" त्याने खोटेच सांगितले, 'हो, मी मुसलमानच.' 'तुला कलमा पढायला येतो का?' असे त्यांनी विचारल्यावर त्या सैनिकाने लगेचच, 'ला इलाही इल्लला...' हा मंत्र म्हणून दाखवला, तेव्हा मग त्या लोकांनी 'दोस्त... दोस्त....' म्हणून त्याला मिठ्याच मारल्या. 'मग आमच्यातली मैत्री वाढत गेली. दूरचित्रवाणी वरून मुल्लामौलवी यांचा कलमा पढून झाला की मग आमचे लोक त्यांना आमची बाजू समजावून सांगू लागायचे. आमचं सैन्य तिथे पोचण्याआधी तिथे झालेली सौरराज्य क्रांती याबद्दल सांगायचे, त्या राज्यक्रांतीमुळे तुमचा कसा फायदा झाला ते सांगायचे, आम्हीदेखील तुमच्या फायद्यासाठीच आलो आहोत असे सांगितले जायचे. ते सगळे फारसी भाषेतच, हे सगळं कधी संपणार, चित्रपट कधी सुरू होणार याचीच वाट पहात राहायचे लोक. बहुतेक वेळा त्यांना भारतीय चित्रपटच आम्ही दाखवीत होतो. कारण तेच त्यांना सर्वाधिक आवडतात. ' त्या सैनिकाने चित्रपटाबद्दलची हकिगत सांगितली ती खरीच, आमचा अनुभवदेखील तसाच होता. कुठेकुठे बंदुकीच्या फैरी झडू लागल्या, लष्करी विमानांच्या घिरट्या सुरू झाल्या, घातपाताची शक्यता अमुकतमुक वेळेला आहे, अशा बातम्या पसरल्या की त्या त्या वेळी राजकपूर, देवआनंद, धर्मेंद्र, हेमा मालिनी यांचे चित्रपट दाखवले जायचे. धर्मेंद्र हेमा मालिनी त्यांचे अत्यंत लाडके. दूरचित्रवाणीवर चित्रपट सुरू असला की त्यावेळी लोक घराबाहेर पडणार नाहीत व त्यामुळे त्यांचे बळी जाणे थांबेल, ही त्यामागची भावना होती. दूरवरच्या खेडेगावातून, शहरातून काबूलला परत निवडक अंतर्नाद ४०७