पान:निवडक अंतर्नाद.pdf/४०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गफारखान यांना भेटत होते, ती भेट कशी काय होते कुणास ठाऊक? शिवाय इथली नवीन राजवट आपल्या सरकारचे गफारखान यांच्याबद्दलचे धोरण अनिश्चित. त्या वेळी गफारखान यांनी औषधोपचारासाठी दिल्लीला जावे, की मॉस्कोला जावे याची चर्चा सरकारी पातळीवर होत होती. सरकारी नोकराच्या पत्नीने अशा वेळी गफारखान यांना भेटणे याचा अर्थ कोण कसा लावील... अशीच बरीच चर्चा झाली. शेवटी जोशी आणि गडकरी दोघेच गेले जलालाबादला पाठोपाठ अॅम्बॅसॅडर एस. के. सिंग यांचा फोन आलाच, 'कैसी है आप भाभीजी ?' म्हणून उगाचच इकडचे तिकडचे बोलले. खरे म्हणजे त्यांना खात्री करून घ्यायची होती की मी गेले नाही ना याची ! जोशी, गडकरी जाऊन दोन दिवस झाले, त्या दिवशी सकाळी मी घरातला केर काढीत होते. सकाळचे दहा-साडेदहा वाजले होते. आणि अचानक गडकरी धावतच घराच्या फाटकातून आत शिरले. जोशी, गडकरींच्या बरोबरच गफारखान काबूलला आले होते. त्या दोघांना आमच्या घरी सोडून मग गफारखान स्वतःच्या निवासस्थानी परत जाणार होते. म्हणजे त्या वेळी बादशहाखान माझ्या घरासमोरच गाडीमध्ये होते. तेच सांगायला गडकरी घाईघाईने घरात आले होते. मीही मग ह्यतातला झाडू कपाटाखाली ढकलला आणि धावतच बाहेर गेले. बादशहाखान यांना नमस्कार केला, त्यांना उर्दू-हिंदी चांगलेच यायचे. त्यांना म्हटले, "आपण तीन-साडेतीन तासांच्या प्रवासाने दमला असाल. पण पाच मिनिटं माझ्या घरी आलात तर मला फारच बरं वाटेल, येणार का?' हे विचारतानाच मनात आले होते, एवढ्या मोठ्या माणसाला मी इतक्या सहजासहजी माझ्या घरी या, असे आमंत्रण देऊ शकते का? बरे दिसेल का ते? आगाऊपणाच नव्हे का हा? पण तेवढ्यात हरिभाऊ जोशी गफारखानांना म्हणाले, "या मुलीने माझ्या स्वतःच्या मुलीसारखी माझी काळजी घेतली आहे. तिला तुम्हाला पाहायची अतिशय तळमळ होती. जलालाबादलाच येणार होती ती, पण तुम्हाला न विचारता येणं बरं दिसलं नसतं म्हणून ती आली नाही. पण आता तुम्ही सहजच तिच्या घरासमोर आला आहात. पाच मिनिटं घरी आलात तर तिला फार बरं वाटेल." आणि हरिभाऊंच्या म्हणण्याला मान देऊन बादशहाखान माझ्या घरी आले! एवढा मोठा माणूस सहजपणाने माझ्या घरी आला. खादीचा पांढराशुभ्र, धुवट कुडता पायजमा, गोल उंच टोपी, सव्वासहा फूट उंची, गोरापान रंग, एखाद्या अतिशय देखण्या माणसाचे कुणा सिद्धहस्त कार्टुनिस्टने चित्र काढावे तसा चेहरा, म्हणजे भले मोठे नाक, जाडजाड विस्कटलेल्या भुवयांखालचे मायाळू डोळे. ब्रिटिशांच्या डोक्याला तापदायक झालेले, बॅ. जिनांनी ज्यांना शत्रू मानले होते ते, एकेकाळचे हिंदुस्थानचे राजकारण गाजवलेले असे हे ९० वर्षांचे बादशहाखान माझ्या घरी आल्यावर मला म्हणाले, “घर छान आहे हं तुमचं!” जगातल्या कुठल्याही गृहिणीला जिंकून घेणारे वाक्य! मी त्यांना म्हटले, "आपल्यासारखा एवढा मोठा माणूस माझ्या घरी आला, केवढं भाग्य माझं! जन्मभर आठवणीत राहील ही आपली भेट " ४०४ निवडक अंतर्नाद "मी कुणी मोठा माणूस नाही. मी खुदाई खिदमतगार ( परमेश्वराचा सेवक) आहे. आम्हांला पश्तुनिस्तान स्वतंत्र हवं आहे. ते परमेश्वराचं काम आहे असं समजून मी ते करतो आहे. तुमच्यासारख्या लोकांनी मदत केली तर हे काम होईल, नाही तर होणार नाही. (मी लेखिका आहे, अफगाणिस्तानवर लिहीत असते, असे जोशींनी त्यांना सांगितले होते, म्हणून ते तसे म्हणाले.) राजकारण करणारे सगळेजण एवढे गुंतून पडले आहेत पश्तुनिस्तानसारख्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही, इच्छाही नाही, पण हे काम झालंच पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे. माझ्या आयुष्याचं ध्येय तेच आहे.” आता की आपापल्यातच थोडेसे थांबून मग ते म्हणाले, "खरं म्हणजे आम्हांला हिंदुस्थानातच राह्ययचं होतं. गांधींनी तसं वचन मला दिलं होतं, पण नंतर त्यांनी आमचा विश्वासघात केला. गांधी-नेहरूंनी स्वतःचं स्वातंत्र्य तर मिळवलं, पण आम्हांला मात्र या कुत्र्यांसमोर (पाकिस्तान) यकलं त्यांनी, हे दुःख मी कधीही विसरणार नाही. गांधी-नेहरूने हमे धोखा दिया." बादशहाखान विषण्णपणाने म्हणाले. बादशहाखानांचा एक मुद्दा मात्र मला राहून राहून आठवतो. ते म्हणाले होते, "तुम्ही तर अफगाणिस्तानचा सगळा इतिहास वाचला आहे. तुम्हांला माहीतच आहे, पूर्वी इथे हिंदू राजांचं राज्य होतं. मग कनिष्क राजाचं केवढं तरी बलाढ्य साम्राज्य होतं. तेव्हा आम्ही सगळेच बुद्धधर्मीय होतो. मग नंतर मुस्लिम इथं आले आणि आम्ही मुसलमान झालो. इस्लाममुळे जगातल्या इतर ज्ञानाचे सगळे दरवाजे आम्हांला बंद झाले. म्हणून आम्ही असे मागासलेले राहिलो आहोत.... • आता हे डाव्या विचारांचे लोक सत्तेवर आलेत. बघूया त्यांच्या हातून तरी आमची सुटका होते का ते." त्यांचे उद्गार ऐकून मी थक्क झाले होते. एका मुस्लिम माणसाकडून अशा तऱ्हेची कबुली येणे ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि तेवढीच विरळा, पण अलीकडे जगातल्या सर्वच मुसलमानांना, विशेषतः जिथे इस्लामपूर्व प्रगत संस्कृती अशा देशांतील मुसलमानांना 'आम्ही खरे कोण?' हा प्रश्न सतावतो आहे. ही इराणमधील इस्लामपूर्व आर्य संस्कृती, सायरस राजाचे साम्राज्य, ससानिअन संस्कृती यांबद्दल इराणी लोकांना केवढा अभिमान ! इंडोनेशिया, थायलंड इथेही इस्लामपूर्व काळात अस्तित्वात असलेल्या रामायण-महाभारताबद्दल त्यांना केवढे कौतुक! तेवढे कौतुक तर भारतामध्येही नाही. अफगाणिस्तानातही बौद्धधर्मीय राजांचे केवढे तरी बलिष्ठ आणि प्रगत साम्राज्य होते. त्या संस्कृतीबद्दल अभिमान वाटावा असे अवशेष आजही अफगाणिस्तानामधील बामीयान, हड्डा (जलालाबाद), फंदुकिस्तान, सुर्खकोटल वगैरे ठिकाणी विखुरलेले आहेत. कुणालाही आपल्या राष्ट्रीय अस्मितेची पाळेमुळे खोलवर रुजलेली हवी असतात, पण मग इस्लामपूर्व संस्कृतीच्या वारशाबद्दल अभिमान बाळगला तर इस्लामशी प्रतारणा केल्यासारखी होते आणि मग 'हे की तें' अशी द्विधा अवस्था होते.