पान:निवडक अंतर्नाद.pdf/४०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिलाही मराठी येत होते, पण इरीनाइतके येत नव्हते, हिंदी उत्तम येत होते. किंबहुना ती मॉस्को विद्यापीठात हिंदीचे अध्यापन करत होती. नामदेवांच्या हिंदी काव्यरचनेवर तिने रशियनमध्ये प्रबंध लिहिला होता. आता तिला नामदेवांच्या मराठी अभंगांचे वाचन करायचे होते आणि त्यासाठी मराठी शिकायचे होते. तिच्या गरजेप्रमाणे आम्हांला तिच्यासाठी अभ्यासक्रम बनवावा लागला. एक वर्षी चार अमेरिकन विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत तीन महिने संस्कृत शिकवण्याचे काम माझ्याकडे आले. संस्कृत विभागातील कोणीही प्राध्यापक त्यावेळेस उपलब्ध नसल्यामुळे मला विचारणा करण्यात आली व मी तत्परतेने होकार दिला. तीन विद्यार्थिनी आणि एक विद्यार्थी चौघेही कॅलिफोर्नियातून आलेले होते. चौघांपैकी कुणीही एक दिवसही एक मिनिटभरदेखील उशिरा आले नाही. शिकण्याकडे सगळ्यांचे पूर्ण लक्ष असायचे. मधून-मधून अगढ़ी मार्मिक शंका विचारायचे. पूर्ण समाधान करून घेतल्याशिवाय पुढे जाऊ द्यायचे नाहीत. तीन महिन्यांच्या अभ्यासक्रमाच्या शेवटी, अकरावीला नेमलेले संस्कृतचे क्रमिक पुस्तक वाचून त्यातील उताऱ्यांचा अर्थ त्यांना सांगता येऊ लागला होता, रशियन विद्यार्थिनींपेक्षा या अमेरिकन विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव फार वेगळा होता. शिकण्याची खरी उत्कट इच्छा, त्यासाठी कष्ट करण्याची तयारी आणि पराकाष्ठेचा वक्तशीरपणा हे त्यांचे गुण आपल्या विद्यार्थ्यांनी घेण्यासारखे होते. अशाच दोन जपानी विद्यार्थ्यांना (एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी) आम्ही दोघांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत तीन महिने हिंदी शिकवले. त्यांना महाराष्ट्रात आणि उत्तर भारतात हिंडायचे होते; आणि त्यासाठी हिंदीतून संभाषण करता येणे आवश्यक वाटत होते. आम्ही शिकवलेली वाक्ये ते दोघे रिक्षावाल्याशी बोलताना आणि दुकानात खरेदी करताना वापरून बघायचे आणि त्या संभाषणात त्यांना उद्भवणाऱ्या शंका आणि येणाऱ्या अडचणी लिहून ठेवून दुसऱ्या दिवशी आम्हांला विचारायचे. जपानमध्ये चेरीच्या झाडांना बहर येतो, त्याला 'साकुरा' म्हणतात आणि जपानी लोक अगदी आत्मीयतेने या बहराचा उत्सव साजरा करतात, एवढी ऐकीव माहिती आम्हांला होती. त्या विद्यार्थ्यांशी बोलताना सहज 'साकुरा'चा विषय काढला, तर त्या विद्यार्थिनीने आपल्या मोबाइलमधले 'साकुरा'चे असंख्य फोटो अगदी कौतुकाने दाखवले. अमेरिकन विद्यार्थ्यांपेक्षा हे जपानी विद्यार्थी भावुक होते. अभ्यासक्रम संपल्यावर शेवटी 'सायोनारा' म्हणताना दोघांचेही डोळे पाणावले होते. या परदेशी विद्यार्थ्यांच्या तुलनेसाठी म्हणून नव्हे, पण एकंदर दिल्ली विद्यापीठात विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचे संबंध कसे असतात आणि विद्यार्थिवर्गात कोणत्या शक्ती कार्यरत असतात हे पाहणे इथे मनोरंजक ठरेल. दिल्ली, विद्यापीठात विद्यार्थिसंघाच्या (DUSU Delhi University Students' Union) निवडणुकांना फार महत्व असते. सगळ्या राजकीय पक्षांच्या विद्यार्थीसंघटना आपापल्या पक्षाच्या बॅनरखाली त्यामध्ये हिरीरीने भाग घेतात. किंबहुना ते भावी राजकारणप्रवेशाचे महाद्दार मानले जाते. केंद्रीय क्रीडामंत्री श्री. विजय गोयल हे त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात DUSUचे अध्यक्ष होते. विद्यार्थिसंघटनांची आंदोलने फार शक्तिशाली असतात. प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमाकरिता येणाऱ्या हजारो अर्जांना पायबंद घालण्याच्या हेतूने आणि बोगस विद्यार्थ्यांचे तण काढून टाकण्याच्या हेतूने, मी विभागप्रमुख आणि कलाशाखेचा अधिष्ठाता झाल्यावर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाकरिता असलेली 'बारावी उत्तीर्ण' ही पायाभूत पात्रता वाढवून ती 'पदवीपरीक्षा उत्तीर्ण अशी करून घेतली, तेव्हा चिडलेल्या विद्यार्थ्यांनी माझ्या कार्यालयावर हल्ला करून कपाटाच्या काचा फोडल्या होत्या आणि फायली फाडल्या होत्या. तिकडे तौलनिक भारतीय साहित्याच्या एम. फिल. च्या वर्गात मात्र वेगळी परिस्थिती होती. तिथे प्रवेश घेणारे बहुतेक विद्यार्थी हे इंग्लिशचे प्राध्यापक म्हणून कुठल्या ना कुठल्या महाविद्यालयात अध्यापन करत असायचे. त्यामुळे एकीकडून ते आमचे विद्यार्थी असले, तरी एकीकडून आमचे सहकारी असायचे. त्यामुळे ते वर्गात आमच्यासमोर विद्यार्थी म्हणून बसले, तरी एरवी बरोबरीच्या नात्याने वागायचे, आणखी एक चांगली पद्धत मी दिल्ली विद्यापीठात अनुभवली आपल्याला ज्यांच्याकडून काही शिकण्यासारखे वाटेल, त्या प्राध्यापकांच्या वर्गात आम्ही विद्यार्थ्यांच्याबरोबर बसत असू. उदाहरणार्थ, तौलनिक साहित्य या नव्याने समोर आलेल्या अभ्यासशाखेचा सैद्धांतिक पाया मजबूत होण्यासाठी आम्ही दोघेही, आमचे सहकारी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तौलनिक साहित्याचे विद्वान डॉ. शिशिरकुमार दास यांच्या 'तौलनिक साहित्य सिद्धांत व इतिहास' या विषयाच्या तासांना एम. फिल. च्या विद्यार्थ्यांबरोबर बसत असू. मी निवृत्त होण्याच्या आदल्या वर्षी, माझ्यानंतर 'भारतीय साहित्यसिद्धांत आणि पाश्चात्य काव्यशास्त्र यांचा तैलनिक अभ्यास हा विषय शिकवण्याची जबाबदारी घेणारे डॉ. अमिताव चक्रवर्ती हे वर्षभर एम. फिल. च्या विद्यार्थ्यांबरोबर माझ्या तासांना बसत असत. सिंधीचे प्राध्यापक डॉ. रवी टेकचंदानी यांना मराठी शिकायचे होते, तर ते माझ्या प्रमाणपत्र वर्गात विद्यार्थ्यांच्याबरोबर बसत इतके खुले ज्ञानग्रहण महाराष्ट्रात कुठेच आढळत नाही. दिल्ली विद्यापीठात अनुभवलेली आणि महाराष्ट्रात अत्यंत दुर्मिळ असलेली प्राध्यापकांच्या आंतरिक परस्परसंबंधांतली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तिथे प्राध्यापकांमधील आंतरिक मतभेद कितीही तीव्र असले, तरी ते वादाच्या टेबलापुरतेच सीमित असायचे. परस्परांच्या मैत्रीवर आणि विभागातील सहकार्यावर त्या मतभेदांचा परिणाम व्हायचा नाही. मी विभागप्रमुख झाल्यावर तौलनिक भारतीय साहित्याचा अभ्यासक्रम एम. ए. च्या पातळीवर सुरू करण्याचे ठरवले. (तोवर तो फक्त एम. फिल. आणि पीएच.डी.साठी होता.) निवडक अंतर्नाद ४०१