पान:निवडक अंतर्नाद.pdf/४०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मित्रमंडळी आमच्या घरी आल्यावर आमची मुले सहजशुद्ध मराठीत वार्तालाप करताना पाहून त्यांना साश्चर्य कौतुक वाटायचे व ते ती बोलून दाखवायची; पण हा प्रयोग आपल्या मुलांच्या बाबतीत करावा असे त्यांना कधी वाटले नाही! महाविद्यालयात मराठी हा गौण विषय निवडणारे विद्यार्थी न मिळण्याचे मुख्य कारण पालकांच्या या अनास्थेमुळे शालेय जीवनात मुले मराठीपासून दूर राहणे हेच आहे, याच शंका नाही. दिल्लीमध्ये मराठी मंडळींनी काढलेल्या एका शाळेशी मुलांचा पालक म्हणून आणि नंतर संचालक मंडळाचा सदस्य म्हणून बरीच वर्षे माझा संबंध आला. तिथे आठवीपर्यंत मराठी हा विषय अनिवार्य म्हणून ठेवलेला आहे, पण त्यात उत्तीर्ण होणे अनिवार्य नाही. नववी ते बारावी या वर्गांत मराठी विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या मुष्किलीने तीन ते पाच या दरम्यान असायची. पालक आपल्या मुलांना मराठी विषय घ्यायला मनाई करायचे! दुसऱ्या एका शाळेच्या नावातच 'मराठी' हा शब्द आहे; पण तेथेही मराठी या विषयाचे अध्यापन (कोणी तो विषय घेईना म्हणून) बंद करावे लागले. बारावीलाच मराठी हा विषय घेतला नाही, तर बी. ए.ला (गौण झाला तरी) तो कोण घेणार? डॉ. ललिता मिरजकर दिल्ली विद्यापीठातून २००५ मध्ये निवृत्त झाल्या. मला विद्यापीठाने तीन वर्षांची मुदतवाढ दिल्यामुळे मी २००७ मध्ये निवृत्त झालो. तथापि एम. फिल. आणि उच्च पदविका या वर्गांना शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत अध्यापन करीत राहण्याची विनंती मला विद्यापीठाने केल्यामुळे एप्रिल २००८ पर्यंत मी दिल्ली विद्यापीठाच्या सेवेत होतो. मला निवृत्त होऊन आता दहा वर्षे झाली, तरी अजूनही दिल्ली विद्यापीठाने मराठीच्या प्राध्यापकाची नेमणूक केलेली नाही. आमची दोघांचीही पदे रिक्त पडलेली आहेत. दोन्ही पदांसाठी वृत्तपत्रांत व विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पुन: पुन्हा तीन वेळा जाहिरात आली होती. मी एकदा विद्यापीठात चौकशी केली तेव्हा "पुरेसे अर्ज आले नाहीत म्हणून आम्ही मुलाखती घेऊ शकलो नाही", असे कारण सांगितले गेले. ते खरे असेल असे वाटत नाही. फक्त मराठीचीच पदे रिक्त पडलेली आहेत, असे नाही. मल्याळमची दोन पदे, गुजरातीचे एक पद, मणिपुरीचे एक पद, बांग्लाची दोन पदे, तमिळची दोन पदे एवढी पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिकामी पडलेली आहेत. व्यवहाराच्या भाषेत बोलायचे, तर दिल्ली विद्यापीठातील आमचा 'आधुनिक भारतीय भाषा व साहित्याभ्यास विभाग' हे काही 'क्रॅश क्रॉप' नाही. तेव्हा तुटपुंजी विद्यार्थिसंख्या आणि प्राध्यापकांचे वाढलेले गलेलठ्ठ पगार यांचे आतबट्ट्याचे त्रैराशिक जमवण्यापेक्षा विभागातील प्राध्यापक जसजसे निवृत्त होतील, तसतशी ती रिक्तपदे भरूच नयेत, म्हणजे आपोआपच काही वर्षात हा विभागच बंद करता येईल, अशी कुटिल नीती या परिस्थितीच्या मागे आहे की काय, अशी दुष्ट शंका भेडसावू लागते. या कुटिल नीतीमागील तर्कशास्त्र बरोबर नाही. दिल्ली ही भारताची राजधानी आहे. विविध भाषिक संस्कृतींनी समृद्ध असलेल्या या देशातील सर्व भाषा व त्यांतील साहित्य शिकण्याची सोय राजधानीच्या या शहरात करणे हे तेथील विद्यापीठाचे व पर्यायाने शासनाचे कर्तव्य आहे. विद्यार्थिसंख्या आणि आर्थिक ४०० निवडक अंतर्नाद ताळेबंद हे प्रश्न तेथे विचारात घेता कामा नयेत. सध्या दिल्ली विद्यापीठात मराठीचे अध्यापन पूर्णतया बंद आहे - भाषेचेही आणि साहित्याचेही. मध्यंतरी वृत्तपत्रांत बातमी वाचली, की महाविद्यालयांमध्ये बी. ए. साठी मराठी, मल्याळम् आणि ओडिया हे विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेतून ५८ गुण कमी करावेत, असा फतवा शासनाने काढला आहे. हे जर खरे असेल तर ती फारच चिंताजनक बाब आहे, असे म्हणावे लागले. 'मराठी साहित्य महामंडळ' आणि 'महाराष्ट्र सहित्य परिषद' यांनी याच्या विरोधात पत्रे लिहिली आहेत. पण त्यासंबंधात पुढे काय झाले, हे माहीत नाही, मी निवृत्त झाल्यानंतर जे प्राध्यापक विभागप्रमुख झाले, त्यांना 'तौलनिक भारतीय साहित्या'पेक्षा 'लोकसाहित्य' या विषयात रुची असल्यामुळे त्यांनी त्या दृष्टीने विभागाची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला गेली जवळजवळ चाळीसेक वर्षे चाललेली साप्ताहिक चर्चासत्रे बंद केली. बांग्लाचे एक प्राध्यापक आणि माझे विद्यार्थी राहि व सध्या एका महाविद्यालयात इंग्लिशचे प्राध्यापक असलेल्या एका मणिपुरी प्राध्यपकांनी विभागामध्ये 'तौलनिक भारतीय साहित्या' ची मदार समाहित प्राध्यापक म्हणून कशीबशी सांभाळली आहे. दिल्ली विद्यापीठामध्ये मला परदेशी विद्यार्थ्यांना शिकवण्याचा जो अनुभव मिळाला, तो इतरत्र कोठेही मिळाला नसता इरीना लेबेदेवा ही रशियन विद्यार्थिनी पहिल्यांदा मराठी शिकण्यासाठी आली. ती येणार असल्याचे विभागप्रमुखांनी मला आधीच सांगून ठेवले होते आणि माझ्या खोलीत मी तिची वाट पाहत बसलो होतो. बरोबर ठरलेल्या वेळी ती आली आणि तिला समोर बसवून मी इंग्लिशमध्ये तिची • प्राथमिक चौकशी करू लागलो. तेव्हा ती माझ्याकडे पाहून छान हसली आणि चक्क मराठीत म्हणाली, "आपण मराठीत बोलू या. मला मराठी येतं.” मी चाटच पडलो. ती यापूर्वी एकदा पुण्यात विजया चिटणीस यांच्या घरी राहून मराठी शिकून गेलेली होती. मॉस्को आकाशवाणीवर मराठी बातमीपत्रात ती वृत्तनिवेदिका म्हणून काम करत होती. वृत्तनिवेदनाच्या दृष्टीने मराठीचा वापर अधिक चांगल्या प्रकारे कसा करावा, याचे शिक्षण तिला हवे होते. दहा महिन्यांकरिता मॉस्को आकाशवाणीने तिला यासाठी दिल्ली विद्यापीठात पाठवले होते. मग तिच्याकरिता त्या प्रकारचा एक खास अभ्यासक्रम आम्ही तयार केला. त्या अभ्यासक्रमात रोजच्या मराठी वृत्तपत्रांचे वाचन, त्यातील बातम्यांच्या सादरीकरणावर चर्चा वगैरे अभिप्रेत होते. मराठी वृत्तपत्रांमध्ये सरकारी ध्येयधोरणांवर आणि प्रशासनावर येणारी टीका पाहून इरीनाला प्रचंड आश्चर्य वाटायचे. "हे असं लिहिलं तर चालतं? परवानगी असते?” ती अगदी निरागसपणे विचारायची, तिचा अभ्यासक्रम संपल्यावर ती मुद्दाम पुण्या-मुंबईस जाऊन विजय तेंडुलकर, सतीश आळेकर वगैरेंना भेटली होती. दुसऱ्याच वर्षी म्युजेल स्खेलकोवा नावाची दुसरी एक रशियन विद्यार्थिनी दहा महिन्यांसाठी मराठी शिकायला आली.