पान:निवडक अंतर्नाद.pdf/३९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वडील याच भट्टीवर कामाला होते. तेव्हा मोठे कुटुंबच तयार झाले होते. हळूहळू मायाचे आजी, आजोबा, आई, वडील यांच्या कुटुंबाचे प्रश्न लक्षात आले. त्यांना रेशन कार्ड, जातीचे दाखले मिळवून देणे गरजेचे आहे हे लक्षात आले... त्यादृष्टीने काम सुरू केले कागदपत्रे जमवली. तहसिलदारकचेरीत जमा केली. खूप पाठपुरावा केला आणि एक दिवस तहसिल कार्यालयात कळले, की ती सगळी कागदपत्रे हरवली होती. माझे तर अवसानच गळाले, तहसिलदारांशी खूप भांडलो. पेपरला बातम्या दिल्या तक्रार केली. दोन दिवसांत तलाठ्याने सर्व कागदपत्रे गोळा करून रेशनकार्ड व जातीचे दाखले भट्टीवर आणून पोहोचते केले होते. मला आश्चर्यही वाटले आणि विषादही. पेपरला बातम्या आणि तक्रारी केल्यावर इतक्या वेगाने पळणारी ही यंत्रणा या माणसांना एकटे गेल्यावर दारात तरी उभी करील का? कसेतरी दाखले मिळाले. रेशन मिळायला लागले. मुलांना जून महिन्यात शाळेत दाखल केले. माया शाळेत जाऊ लागली. मला वाटले, चला प्रश्न मार्गी लागला, पुढे काही दिवसांनी एकदा भट्टीवर गेलो तर भट्टीवर शांतता. मालकाला विचारले, मंडळी कुठे गेली? मालक म्हणाला, 'त्यांना कोण मालक? तेच त्यांच्या मनाचे राजे! गेले असतील कुणीकडे' अनेक महिन्यांनी शोध लागला की ते जवळच्या भट्टीवर आहेत. तिथे गेलो. खूप बोललो. मायाची शाळा सुटलेली. पुन्हा जवळच्या शाळेत दाखल. असे शाळा बदलणे, भट्टी बदलणे काही थांबेना. एकावर्षी जून महिन्यातच घरी गेलो. भट्टीवर मायाची आई, बाप, आजी बसलेले. काय करायचे? सरळ मायासह चार मुलींना घेतले आणि आश्रमशाळेत नेले. मायाच्या आईला एकदम चार पोरींची शिक्षणाची सोय झाल्यापेक्षासुद्धा चार पोरींच्या जेवणाची सोय झाल्याचा जास्त आनंद झाला... भार कमी झाल्याचा आनंद चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. माया आश्रमशाळेत बंद केल्यावर आता चिंता मिटली असे वाटले... पण तिच्या आजीला भलतेच सुचले. तिने सुट्टी काढून मायाला नवस फेडायला आणले. नवस होता खंडोबाशी लग्न लावायचा, माया लहानपणी आजारी होती. खंडोबाला नवस केला, तेव्हा पोरगी वाचली, तुझ्याशी लग्न लावेन असा नवस आजी बोलली होती. झाले! लग्न ठरले. भट्टीवर लग्नाचा कार्यक्रम, मला निमंत्रण आले. गेलो. सीन असा सगळीकडे भंडारा उधळून पिवळेधम्मक झालेले. लहानशी माया नटलेली. तिला साडी नेसवलेली मायाला काहीच समजत नव्हते. खंडोबा नवरा म्हणजे काय हे काहीच कळेना. बिचारी खाली मान घालून बसलेली, मला बघितल्यावर तर अधिकच लाजली. लग्न लागले. वऱ्हाड जेवून पांगापांग झाली. आजीला बाजूला घेतले. म्हटले, 'हा काय वेडेपणा आहे...' आजी माझ्यावरच उचकली. म्हणाली, 'सर, तुमचा नसंल भरवसा पण आमचं लेकरू खंडोबानं वाचवलंय. त्यानं वाचवलंय. त्याच्याच स्वाधीन तिचं जगणं. ' मला एकदम यल्लमादेवी आणि तिथल्या बायकांची परवड आठवली... सर्रकन काटा आला... म्हटले.... 'म्हणजे तिला आता जेजुरीला पाठवणार ?'... हसल्या, म्हणाल्या, 'सर नाही हो... लेकरू इथंच तर राहणार. बघू पुढचं पुढं...' न जेवताच मागे फिरलो, अस्वस्थ झालो. लहानपणची पाण्यातून सूर मारून मासा काढून देणारी माया डोळ्यांपुढं आली... आज तीच मासा होऊन भलत्याच जाळ्यात सापडली होती. माया पुन्हा आश्रमशाळेत. पण हळूहळू रविवारी घरी यायची. कुठे जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमाला जायला लागली. आश्रमशाळेत गैरहजेरीच्या तक्रारी वाढल्या कार्यक्रमात ती हळूहळू नाचूही लागली. लहान मुरळी म्हणून कौतुक व्हायचे, पैसे मिळायचे आणि आजीला आनंद खंडोबाची सेवा करते म्हणून. मायाच्या हातात पैसा यायला लागला. आश्रमशाळेतून तक्रारी यायला लागल्या. ती जवळच्या दुकानातून गुटक्याच्या पुड्या खाते. इतर मुलींशी अचकट विचकट बोलते. फारच बिनधास्त वागते. सतत मेकअप करते. इतर मुली तिच्यासारख्या नटतात. असल्या अगम्य तक्रारी येऊ लागल्या. मायाही फारशी हजर राहत नव्हतीच. तिच्या इतर तीन बहिणी शिकवा, या तडजोडीवर माया पुन्हा घरी आणली. तिच्या वडिलांशी बोलायला जावे तर ते म्हणायचे, 'पाच पोरी माझ्या आहेत. त्यांचं काहीभीबी सांगा. पण माया माझी नाहीच, ती पहिल्या बापाची. मी काय करू ? तिचं मला काहीबी नका सांगू.' मी गप्प, पुन्हा काही दिवस कुटुंब तालुक्याबाहेर पळाले. सिन्नर तालुक्यात गेल्याचे कळले. अशीच दोन वर्षे गेली आणि एक दिवस मोठी झालेली माया मला दिसली. सगळ्यांचेच अवतार दोन वर्षात बदललेले. मला कुणी ओळख दाखवेना. गोडीत घेतल्यावर कळले, की माया तिकडे शाळेत गेलेली नव्हती. निरागसताच लोपून ती आता थोराड दिसू लागली होती. माझ्यासमोर मुद्दाम गळ्यातले मंगळसूत्र नाचवत बसली होती, मी परत फिरलो. आठ दिवसांनी मायाची आई आजी मला शोधत आल्या. घाबरलेल्या रात्रीची वेळ. मीही घाबरलो. मायाच्या बापाकडे एक सीमकार्ड सापडल्याने मोबाइल चोरीच्या गुन्ह्याखाली त्याला अटक झालेली. पोलिसांअगोदर गावातील माणसांनी बेदम मारलेले. तो बेकसूर असल्याचे त्या सांगत होत्या. त्याचा एक लांबचा नातेवाईक मुक्कामाला आला. त्याच्याकडेच ते सीमकार्ड होते वगैरे. पोलिसांनाही खरा आरोपी सापडला होता. एका पत्रकार मित्राच्या मदतीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दंडाधिकाऱ्याची समज देऊन सोडविले. भट्टीमालकाने वर त्याच्या डोक्यावर हात ठेवला. म्हणाला, 'बाबा तुला सोडवायला लई खर्च झालाय. आता कामातून फेड'... मालकाने पुन्हा उपकाराच्या ओझ्याखाली त्याला दाबला. आता कुटुंब पुन्हा माझ्याकडे भक्तिभावाने पाहू लागले आणि उपकाराची फेड म्हणून माया पुन्हा शाळेत जायला लागली... पण काही दिवसच जंगलात एके ठिकाणी त्यांची शेतजमीन होती. तिथे दूर निवडक अंतर्नाद ● ३९३