पान:निवडक अंतर्नाद.pdf/३८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फार पुढची ही झेप आहे. ज्या संशोधनासाठी आत्ता मोठ्या प्रमाणात रिसर्च फंडिंग होतं, त्या गोष्टींचे दहा-वीस वर्षांत तंत्रज्ञानात मेगाट्रेंड ( महाप्रवाह) होतात. तुमच्या खिशात आज जो मोबाइल फोन आहे, त्याच्या तंत्रज्ञान विकासासाठी १९८० च्या दशकामध्ये फार मोठ्या प्रमाणात रिसर्च फंडिंग दिलं गेलं होतं. म्हणून तुमच्या खिशात आज प्रगत तंत्रज्ञानावर चालणारे मोबाइल फोन आहेत. मग आज कशाला रिसर्च फंडिंग दिलं जातंय? तर या ऑनलाइन भाषांतर तंत्रज्ञानाच्या संशोधनाला कारण आम्हांला आमच्या टेलीकॉम कंपनीतर्फे आमच्या ग्राहकांना ही एक अभिनव सेवा द्यायची आहे, कारण आमचं मार्केट ग्लोबल करायचं आहे. आणि आम्हांला तर हे माहिती आहे, की आमचे जे मराठी बांधव आहेत, किंवा अनेक देशांतले अनेक स्थानिक भाषा बोलणारे जे बांधव आहेत, त्यांतले १०% पेक्षा अधिक लोक इंग्लिश शिकू शकणार नाहीत. तंत्रज्ञानातल्या लोकांना याची पूर्ण खात्री आहे. मराठी भाषेचं काय होणार, ती जगणार की नाही, कुठेतरी अस्तंगत होईल की काय, सगळेच इंग्रजीत बोलू लागतील की काय अशी काल्पनिक भीती निष्क्रिय विद्वान व्यक्त करत असतात. तंत्रज्ञानातल्या लोकांचे मार्केट सर्व्हे मात्र खूप स्ट्राँग असतात. त्यांना माहितीये, की ही मराठी भाषा कदाचित थोडीशी मिश्र होईल, पण ती अस्तित्वात राहणार आहे आणि कोट्यवधी मराठी माणसं तिचा वापर दैनंदिन जीवनात करणार आहेत. आणि तसं सगळ्याच भाषांचं होणार आहे. तर मग तंत्रज्ञान कुठली दिशा घेतंय? फारच इन्टरेस्टिंग दिशा आहे. समजा, एक मराठी माणूस आहे, एक जॅपनीज माणूस आहे, एक रशियन आहे, एक कोरियन आहे, एक चायनीज आहे, एक इंग्लिश आहे, एक स्पॅनिश आहे असे लोक, ज्यांना एकमेकांची भाषा येत नाही. पण आता एका कुठल्यातरी ग्लोबल अशा व्यवहारामध्ये ते परस्परांशी मोबाइल फोनवर कॉन्फरन्सद्वारे संभाषण करत आहेत. अशा वेळेला आमची टेलीकॉम कंपनी त्यांना असं म्हणणार आहे, की "तुम्ही सर्व जण ही कॉन्फरन्स तुमच्या मोबाइलवरून करा. तुम्ही सर्व जण तुमच्या- तुमच्या मातृभाषांमधूनच बोलत राहा. तुम्ही ज्यांच्याशी कॉन्फरन्स करता आहात त्यांना त्यांच्या त्यांच्या मातृभाषांमध्ये रन-टाइम ट्रान्सलेशन, म्हणजेच तत्क्षणी भाषांतर, उपलब्ध होत राहील ! काही सेकंदांची कदाचित गॅप असेलही, पण ती तुम्हांला कळणार नाही.” सुरुवातीला ती भाषांतरं अगदी अचूक व परिपूर्ण नसतील, पण हळूहळू होत जातील आणि त्यामुळेच तर परस्परांच्या भाषा अवगत नसूनही हे लोक जागतिक व्यवहारात सहजतेनं पुढे जातील. कारण त्यासाठी तयार होत असलेलं सॉफ्टवेअर सेल्फ- इम्प्रूव्हिंग व सेल्फ-करेक्टिंग (स्वतःच स्वत:मध्ये आपोआप सुधारणा करणारं व चुकांची दुरुस्ती करणारं ) असणार आहे, नॅनो टेक्नॉलॉजीमुळे ते अतिशय वेगवान अशा संगणकांवर व मोबाइल फोन्सवर चालेल व रिअल टाइम इफेक्ट आपल्याला बोली भाषांतराच्या स्वरूपात मिळेल. सेल्फ-इम्प्रूव्हिंग आणि सेल्फ-करेक्टिंग सॉफ्टवेअरच्या निर्मितीची पाट झालेली आहे. आता त्याच्या छोट्या छोट्या पाऊलखुणा आपल्याला दिसताहेत. डोकोमो कंपनीने आपल्या जपानी ग्राहकांना मोबाइलवरील संभाषणात जपानीतून इंग्रजीत व इंग्रजीतून जपानीत तत्काळ बोली भाषांतर सेवेची प्रायोगिक पातळीवर सुरुवात केली आहे व त्याचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. त्यामुळे आपली भाषा जपण्याची, ती वाढवण्याची एक खूप मोठी संधी निर्माण होणार आहे. इंग्रजी भाषेतील वाङ्मयाचा जरूर अभ्यास करावा. चार्ल्स डिकन्स वाचू नका असं कोण म्हणेल? पण आमच्या प्रगतीच्या मार्गातला इंग्रजी भाषा हा अडसर ठरता कामा नये. तंत्रज्ञान तशा दिशेने प्रगत होतंय. मग या तंत्रज्ञानाच्या संदर्भात आमची मराठी मानसिकता कशी बदलली पाहिजे? ती कशी कालानुरूप होऊ शकेल? त्यासाठी प्रथम आपण बाजारात किंवा उपाहारगृह्यमध्ये गेल्यानंतर मराठीत बोलणं, शाळेत, महाविद्यालयात कार्यालयात, कारखान्यात, न्यायालयात, सरकारी कार्यालयात, दवाखान्यात, इस्पितळात, रिक्षा-टॅक्सीमध्ये, बसमध्ये, आगगाडीमध्ये सर्वत्र मराठीत बोलणं, टेलिफोनवर, मोबाइल फोनवर मराठीत बोलणं, मराठीत चॅट करणं, एसेमेस, इमेल, ब्लॉग, ट्रिटरवर, whatsapp वर मराठीत व्यवहार करणं, आपलं ज्ञान सोप्या मराठीत व्यक्त करण्याचा प्रयत्न सातत्यानं करणं, आणि आपल्या मुलांशी घरात मराठीत बोलणं, मराठीत जे जे काही श्रेयस्कर आहे त्याचा मनापासून अभिमानाने अंगीकार करणं, आस्वाद घेणं आणि मराठीमध्ये स्वतःला व्यक्त करणं हे महत्त्वाचं आहे असा संदेश आपल्या प्रत्यक्ष कृतीतून इतरांना देणं; इतर भाषकांना प्रेमाने मराठी शिकवणं; मराठी शिकण्यासाठी ई- लर्निंग सुविधा तयार करणं, मराठीसाठी ऑटोमॅटिक रिअल टाइम भाषांतराचं तंत्रज्ञान उपलब्ध होण्यासाठी आग्रह धरणं आणि हाती आल्यावर ते सतत वापरणं, स्वतःहून शिकणाऱ्या स्वतःच्या चुका दुरुस्त करणाऱ्या व सुधारणा करत राहणाऱ्या अभिनव सॉफ्टवेअर प्रणालींवर ते अवलंबून आहे, हे लक्षात घेऊन आपण इतर भाषकांशी या तांत्रिक भाषांतर सेवेचा अधिकाधिक वापर करून, मराठीत जितकं जास्त बोलता येईल तितकं बोलून, आपल्या सामूहिक कृतीतून हे भाषांतर तंत्रज्ञान अधिकाधिक विश्वासार्ह बनवणं, त्यामुळे आपल्या मराठीचं भवितव्य आपण ती इतर मराठी भाषकांबरोबरील व्यवहारात किती वापरतो यावर जितकं अवलंबून आहे, तितकंच जगातल्या इतर भाषकांबरोबर तांत्रिक भाषांतर सेवेतून किती वापरतो यावरही अवलंबून असणार आहे आमचे ग्रामीण मराठी युवक व युवती नजिकच्या भविष्यकाळात त्यांच्या आयुष्याची १५ वर्षं इंग्रजी शिकण्यात वाया घालवूनही न्यूनगंडात राहण्यापेक्षा या तंत्रज्ञानामुळे स्वतःच्या मराठी भाषेत जागतिक बाजारपेठेत आत्मविश्वासाने व्यवहार करू शकतील. आजचं इंग्रजीचं जगाची संपर्क भाषा म्हणून असलेले स्थान आणि इंग्रजी माध्यमकेंद्री शिक्षण या दोन्ही गोष्टी कालबाह्य होण्याची घटिका समीप येत आहे ! जितक्या आत्मविश्वासाने आपल्या खेड्याच्या सीमांचं बंधन तोडून मोबाइल फोनवरून हे युवा आज आपल्या स्वभाषक गटात व्यवहार करतात, तितक्याच आत्मविश्वासानं ते स्वभाषेतूनच जगातल्या इतर भाषक गटांशीही त्याच्या विकासासाठी जोडले निवडक अंतर्नाद ३८३