पान:निवडक अंतर्नाद.pdf/३८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

की करंट निर्माण होतो व मीटरमधला काय हलतो. पुढे काय ?" त्यावेळेला हा मुलगा आत्मविश्वासाने सांगू शकतो, "सर, एका नवजात अर्भकाचा असा काय उपयोग असतो?" आणि मग थांबून तो अर्थमंत्र्यांना एकदम म्हणतो, "काय सांगावं सर, उद्या कदाचित ह्या शोधामुळे तुम्हांला निरनिराळ्या प्रकारचे कर गोळा करता येतील!” आणि पुढे तसंच झालं. आजदेखील तुम्ही तुमच्या घरी येणारं MSEBचं बिल उघडून बघा, त्याच्यात कितीतरी अधिभार आणि कितीतरी कर आकारलेले तुम्हांला दिसतील! सांगायची गोष्ट अशी, की समाजातल्या सर्वांत तळातल्या स्तरामधला हा मुलगा, भाषेचं कुठलंही बंधन नसल्यामुळेच एका श्रेष्ठ शास्त्रज्ञाची भाषणं लिहू शकतो; शोध लावू शकतो; ते जाहीररीत्या मांडू शकतो; नुसतंच बुक बाइंडिंग करत बसत नाही. आमच्या समाजात जर असा एखादा मायकेल फॅरेडे जन्माला आला असता, तर तो सुरुवातीला बुकबाइंडर असता आणि शेवटी बुकबाइंडर म्हणूनच रिटायर झाला असता! याचं कारण त्या शास्त्रज्ञाची भाषा आणि या बाइंडरची भाषा यांचा काही मेळच नाही, संबंधच नाही. त्यामुळे वैज्ञानिक व्यवहारात ज्ञानाच्या पातळीवर बहुजनांनी सहभागी होण्याचा प्रश्नच नाही. भारतातील वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये आजही हेच चित्र कायम आहे. हे असं होण्याची कारणं जर आपण भारताच्या इतिहासामध्ये बघितली, तर आपल्या असं लक्षात येतं, की आमची राजभाषा ही नेहमी लोकभाषेपेक्षा वेगळी राहिलेली आहे. आमची राजभाषा एकेकाळी संस्कृत होती, त्याच्यानंतर ती पर्शियन झाली आणि त्याच्यानंतर ती इंग्लिश झाली. मग इंग्रज गेले तरी आमची राजभाषा मात्र इंग्लिशच राहिली! राजभाषा एक आणि लोकभाषा वेगळी हा प्रकार भारतात घडला. त्यामुळे भारतामध्ये तुम्ही अभिजन आहात ही तुमची ओळख, ही तुम्हांला किती ज्ञान आहे, तुम्ही किती सुसंस्कृत आहात, यावरून ठरत नाही, तर तुम्ही अभिजन आहात याची ओळख, ही तुम्ही सफाईदार इंग्रजीत बोलता की नाही यावर ठरते. आम्ही बहुजनांच्या मनांमध्ये एक प्रकारची अशी भावना आणि रुखरुख निर्माण केली की, 'तुम्ही नॉन एलिट आहात, कारण तुम्ही स्वभाषेमध्ये व्यवहार करता. तुम्हांला इंग्रजीमध्ये व्यवहार करता येत नाहीत. आणि जर तुम्हांला अभिजन व्हायचं असेल, तर इंग्रजीच्या राजमार्गावरूनच तुम्हांला ते होता येईल.' हा लेख जरी तंत्रज्ञानाच्या संदर्भात असला, तरी त्यातील प्रश्न खरं म्हणजे आपल्या समाजाच्या अभिजनांच्या व्याख्येमध्ये दडलेला आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे मला जर आता अपवर्ड मोबिलिटी हवी असेल (वरच्या सामाजिक स्तरात संक्रमण करायचं असेल), तर मी एखाद्या विषयामध्ये, एखाद्या व्यवहारामध्ये, एखाद्या तंत्रामध्ये किंवा एखाद्या कौशल्यामध्ये पारंगत व्हायला पाहिजे असं नाही, तर मला सफाईदार इंग्रजी यायला पाहिजे, असा दृढ समज आम्ही निर्माण केला. ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील प्रवेशांचं सातत्यानं वाढणारं प्रमाण आमच्या अभिजनांच्या उफराट्या व्याख्येची परिणती आहे. म्हणून हा झगडा हा इंग्रजी विरुद्ध मराठीचा नाही, हा झगडा बहुजनांना मुख्य प्रवाहात आणायचं की नाही, असा आहे चुकून त्याला भाषिक स्वरूप दिलं जातं, ते त्याचं अतिशय मिथ्या असं स्वरूप आहे जर आमचे वैज्ञानिक, तंत्रवैज्ञानिक, राजकीय, आर्थिक, प्रशासकीय व्यवहार लोकभाषेतून झाले, तर समाजातल्या सर्वांत तळातल्या माणसालासुद्धा ही शिडी फार चटकन चढता येईल. पण हे आम्हांला करायचंय का, हा खरा कळीचा प्रश्न आहे! आता आपण तंत्रज्ञानाकडे येऊ या. माहिती तंत्रज्ञानाची दिशा काय आहे? त्याची दिशा अशी आहे, की एकाच वेळी ती कोट्यवधींना स्पर्श करू शकते. म्हणूनच मोबाइल फोन सगळ्यांच्या खिशात आला - त्यांना इंग्रजी येवो वा न येवो. भारतामध्ये ८० कोटी लोकांच्या खिशामध्ये मोबाइल फोन आला. त्यांना समजेल अशा स्वभाषेत त्यांना तो बोलण्याऐकण्यासाठी वापरता येतो. तसेच, मराठी भाषा आणि देवनागरी लिपी आता संगणकावर सहज वापरण्यासाठी उपलब्ध आहे माहिती तंत्रज्ञान उद्योगानं असाच विचार केला, की जगातल्या पंधराव्या नंबरचे हे लोक आहेत; त्यांना कम्प्यूटरवर मराठीचा वापर करता आला नाही तर आमचं तंत्रज्ञान त्या बाजारपेठेत खपणारच नाही. म्हणून युनिकोडवर मराठी आणली गेली. मग त्याप्रमाणे सर्व संगणक-उत्पादकांनी ते प्रमाण म्हणून स्वीकारलं. त्याच्यामुळेच जागतिक बाजारातला कुठलाही संगणक हा आज मराठी भाषेत सहज वापरण्यासाठी सिद्ध आहे. म्हणजे तंत्रज्ञान हे तुम्हांला एक प्रकारचं व्यासपीठ देतं आहे, प्रश्न आमच्या मानसिकतेचा आहे. तंत्रज्ञानाचं मराठीवर आक्रमण होतंय इत्यादी गळेकाढू वल्गना दिशाभूल करणाऱ्या आहेत. दुसरी गोष्ट – तंत्रज्ञान स्वस्त झालेलं आहे. सर्वदूर त्याची उपलब्धता वाढते आहे त्याला लागणारी विद्युतऊर्जा कमी कमी होत चाललेली आहे. पण ते देत असलेली कंप्यूटिंग पॉवर मात्र वाढत चाललीय. त्याच्यामुळे तुमच्याकडे लोडशेडिंग असलं, तरी तुम्हांला ते दीर्घकाळ बॅटरीवर वापरता येईल अशी सुविधा आज आहे त्याचबरोबर ते तुमच्या भाषेमधून तुम्हांला वापरता येतंय. त्यामुळे भावनिकदृष्ट्या खोलवरचा असा एक व्यक्तिगत अनुभव तुम्हांला त्याच्यामध्ये घेता येऊ शकतो, तुम्ही त्याच्यातून तुमचे ब्लॉग्ज लिहू शकता, इ-बुक्स प्रकाशित करू शकता, तुमच्या भावनांचं, विचारांचं अभिसरण करू शकता. सर्वसामान्य गरीब मराठी लोकांच्या दृष्टीने तंत्रज्ञानाने दिलेली ही फार मोठी गोष्ट आहे ज्ञानाचे स्रोत जर मराठीत असतील तर तंत्रज्ञान ते बहुजनांपर्यंत पोहोचवायला सज्ज आहे. इजिप्तमधल्या स्त्रिया ज्यावेळी घरोघरी अरेबिकमध्ये कम्प्यूटर वापरू लागल्या आणि फेसबुकवर एकमेकीला भेटू लागल्या, त्यावेळेला त्या बायकांनी आपल्या नवऱ्यांना रस्त्यावर ढकललं. त्यांच्या मागोमाग त्याही आल्या आणि इजिप्तमध्ये सत्तांतर होणं अपरिहार्य झालं. म्हणजे एक तंत्रज्ञान किती वेगळी परिमाणं हुकूमशाहीनं दडपलेल्या समाजाला देऊ शकतं, हे इजिप्तने आम्हाला दाखवलं. 'संघटनेशिवाय संघटन (Organizing without organization) हा एक नवा चमत्कार तिथे तंत्रज्ञानामुळे घडला. जे सर्वसामान्य लोक कैरोच्या तेहरीर चौकामध्ये आले होते, त्यांची २१व्या शतकातली एक अतिशय अभिनव फॉर्म असलेली अदृश्य संघटना त्यापूर्वीच फेसबुकवर निवडक अंतर्नाद ३८१