पान:निवडक अंतर्नाद.pdf/३८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इराणचा किंवा तुर्कस्तानचा इतिहास बघितला, तर तुमच्या असं लक्षात येईल, की सर्वसामान्य लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी स्वभाषेमधून केवळ शिक्षण देणं एवढंच नव्हे, तर विज्ञान, तंत्रज्ञान, आर्थिक व्यवहार, राजकीय व्यवहार, प्रशासन ह्या सगळ्या गोष्टी एका स्वकीय अशा सोप्या, लोकप्रयुक्त पण प्रमाणित केलेल्या भाषेमधून देण्याचा करण्याचा मोठा खटाटोप या देशांनी जिद्दीने दीर्घकाळ चालवला. सर्वसामान्यांच्या विकासासाठी स्वभाषेचा चहूबाजूंनी विकास करण्याची ही विलक्षण रणनीती पाहून आपण थक्क होतो. मी एकदा कोरियातल्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये आयटीतल्या प्रगत शिक्षणासाठी आणण्याचा एक प्रकल्प तयार केला आणि त्यासाठी सन २००० मध्ये मी कोरियामध्ये गेलो. मला तर काही कोरियन भाषा येत नव्हती. कोरियामध्ये गेल्यानंतर एक साधी युक्ती तिथल्या यजमानांनी केली. ती अशी, की त्यांनी मला एका खोलीमध्ये नेलं आणि तिथे खाद्यपदार्थांसंबंधी कोरियन शब्द मला अवगत होतील अशी पूर्ण व्यवस्था केली. मी म्हटलं, की "मला तर भूक लागली आहे आणि मी वेळेत जर जेवलो नाही तर माझं डोकं दुखतं, " तर ते लोक म्हणाले, "काहीच हरकत नाही, पण तुमचा जेवणाचा मार्ग याच खोलीतून जातो. तुम्ही प्रथम हे शब्द अवगत करा.” त्याच्यानंतर त्यांनी मला एका कॅन्टीनमध्ये नेलं. तिथे मॅक्डोनल्डच्या दुकानात दिसतात तशी पदार्थांची रंगीत छायाचित्रं नव्हती, की ज्यांच्याकडे बोट दाखवून मी ऑर्डर देऊ शकेन, तिथल्या कुठल्याही वेटरला कोरियन भाषेशिवाय दुसरी कुठलीही भाषा येत नव्हती आणि कुठलेही पदार्थ बुफेसारखे समोर मांडलेले नव्हते. त्या टेबलावर बसल्यानंतर माझे जे कोरियन यजमान होते, ते निघून गेले. मी एकटय उरलो! आणि आता तुम्हांला जर जिवंत राहायचं असेल तर कोरियन भाषेमध्येच ऑर्डर प्लेस केली पाहिजे, अशी परिस्थिती त्यांनी सहजगत्या निर्माण केली! माझी जी काही आकलनाची मर्यादा होती आणि भुकेल्या पोटाने जेवढी काही शब्दसंपदा मी आत्मसात केलेली होती, तिचा पुरेपूर उपयोग करून मी माझी जेवणाची ऑर्डर दिली आणि कोरियन भाषेतले काही पोटापुरते महत्वाचे शब्द आपण शिकलो आहोत या जाणिवेने सुखावलो. मग मी त्या यजमानांना असं विचारलं, (ते चांगले निष्णात प्रोफेसर होते ) “काय हो तुमचा हा प्रकार ?" तर ते म्हणाले, "सर, तुम्हांला सांगतो की परकी भाषा डोक्याने शिकता येत नाही, ती पोटातून शिकावी लागते.” परकीय लोकांमध्ये आपली भाषा रुजवण्याची त्यांची जी पद्धत आहे, त्यामागचा मनोवैज्ञानिक अभ्यास बघून मी चकित झालो. मग मला उमजलं, की या देशातल्या अगदी सर्वसामान्य लोकांनी ज्ञानाच्या क्षेत्रात एवढी मोठी मजल कशी मारली ते साठसत्तर वर्षांपूर्वी अप्रगत असलेले हे देश आज तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये स्वभाषेतून कार्यरत होणाऱ्या 'स्मार्ट सिटीज' उभारतात आणि आम्हांला त्यांच्या जवळपास पासंगाला पुरता येत नाही. आम्ही सुपरकॉम्प्युटिंगमध्ये खूप मोठं काम केलेलं असल्यामुळे अर्थातच मी एका आत्मविश्वासाने गेलो होतो, की या प्रगत देशामधील मुलांना मी भारतामध्ये प्रगत तंत्रज्ञान शिकवणार आहे. त्याप्रमाणे त्या मुलांना भारतात आणलंही. परंतु त्यांना आणण्यातला प्रवास मला त्या देशाने त्यांच्या भाषेतून करायला भाग पाडलं. आपल्या भाषेवर किती अविचल निष्ठा असावी, किती प्रेम असावं व तिच्या अपरिहार्यतेचा किती ध्यास घ्यावा याचं ते उत्कृष्ट उदाहरण आहे. सौदी अरेबियामध्येही आमचा अनुभव असाच आहे सौदी अरेबियामध्ये ज्यावेळी मी गेलो, त्यावेळी अर्थातच त्यांनी मला सांगितलं, "हे सगळे तुमचे तंत्रज्ञान शिक्षणाचे उपक्रम अरेबिकमध्येच व्हायला पाहिजेत.” मला असं वाटलं होतं, की आमचं सर्व शैक्षणिक इ-साहित्य अरेबिकमध्ये भाषांतरित करायचं म्हणजे आपल्याला फार मोठा त्रास आहे पण अरेबिक स्कॉलर्सनी काही दिवसांच्या आत आमचा संबंध इलर्निंग कन्टेन्ट त्यांच्या प्रमाणभाषेत भाषांतरित करून माझ्यासमोर हजर केला. ते म्हणाले, "आमची मुलं शिकतील तर अरेबिकमधूनच शिकतील.” डावीकडून उजवीकडे वाचणाऱ्या लिहिणाऱ्या आम्हांला उजवीकडून डावीकडे जाण्याची पाळी आली! वेबडिझाइन करतानासुद्धा सगळ्या लिंक्स आम्हांला उजवीकडून डावीकडे जाणाऱ्या कराव्या लागल्या, ते त्यावेळी फारसं सहजसाध्य नव्हतं, म्हणजे आपल्या लक्षात येईल, की सर्वसामान्य लोकांना नव्या ज्ञानाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी सुबोध व सुलभ अशा स्वभाषेच्या वापराची एक प्रकारची सर्वंकष रणनीती त्या देशांनी स्वीकारली, हे त्यांचं फार मोठं अनुकरणीय वैशिष्ट्य आहे MKCLच्या MS-CIT या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत महाराष्ट्रातील जवळ जवळ ८५ लक्ष जिज्ञासूंना आम्ही संगणक साक्षर करण्याचा प्रयत्न केला. गावोगावी शिकवलं. गडचिरोलीच्या दुर्गम भागातही आमची केंद्रं आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल, की या सगळ्या सुमारे ४५०० केंद्रांमध्ये ८५ लाख विद्यार्थ्यांपैकी ५० लाखांहून अधिक विद्यार्थी मराठी भाषेमधून संगणक वापरायला शिकले. त्यांना आधुनिक तंत्रज्ञान मराठी भाषेमधून शिकवलं गेलं. आमच्या अभ्यासक्रमाचा संबंध आशय जर जवळून बघितला, तर एक अतिशय सुबोध अशी मराठी भाषा आधुनिक माहिती तंत्रज्ञान शिकवण्यासाठी अत्यंत आकर्षक अशा पद्धतीने आपल्यासमोर येते आणि आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान वाटतो. इतकंच नव्हे तर MKCLच्या सर्व ४५०० केंद्रांमध्ये ज्यांना संगणक वापरता येतो, अशा सर्व व्यक्तींसाठी आयटीत मराठी ह्य दोन तासांचा उपयुक्त अभ्यासक्रम केवळ १०० रुपये शुल्कात उपलब्ध करण्यात आला आहे. सर्व आयटी टूल्समध्ये मराठी भाषा कशी वापरायची ते शिकण्याचा हा सुलभ अभ्यासक्रम आहे. पण बहुजनांना सुलभ अशा प्रमाण स्वभाषेतून आधुनिक ज्ञानाच्या उपासनेत रममाण करण्यासाठी जे मनापासून प्रयत्न व्हायला पाहिजेत, तसे MKCL सारखे सातत्यपूर्ण व व्यापक प्रयत्न कमी आणि क्षीण आहेत. निवडक अंतर्नाद ३७९