पान:निवडक अंतर्नाद.pdf/३६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कामात आनंद मिळतो, म्हणून काम करतो आहे हा आनंद जोपर्यंत वाटणार आहे, तोपर्यंत मी काम करणार आहे.” एखाद्या माणसाने दुसऱ्याकरिता करुणेपोटी काम करावे हे दोघांनाही घातक आहे, असे मी मानतो. मी जर का सुरुवातीलाच डोळ्यांतून अश्रुंचे चार थेंब गाळीत मांडणी केली असती, तर माझी खात्री आहे, मी आत्तापर्यंत 'महात्मा' पदवीला पोहोचलो असतो ! पण हे मी जाणीवपूर्वक यळत आलो. मी शेतकरीजीवनाचे उदात्तीकरण करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. काय ते खेड्यातले जीवन, काय ती हिरवी हिरवी झाडे, काय ती स्वच्छ हवा, कसे ते झुळझुळ झुळझुळ वाहणारे पाणी, शेतावर असणे म्हणजेच परमेश्वराच्या सन्निध असणे वगैरे सांगण्याचा वाह्यातपणा मी काही केला नाही. शेतकरी असणे ही एक जीवनपद्धती आहे. इतिहासाच्या एका ठरावीक काळामध्ये तिचे महत्त्व होते. पण पुढे, जितकी माणसे शेतीतून निघून बिगरशेती व्यवसायाकडे वळतील, तितका त्या समाजाचा विकास आहे. शेतकऱ्यांनी उत्पन्न केलेले वरकड मूल्य लुटून नेणारे, शेतकऱ्यांची संपदा लुटून नेतात आणि शेतकऱ्याला मागे ठेवतात. स्वातंत्र्याच्या साठएक वर्षांतील महत्वाची आकडेवारी कोणती? शेतीवरील लोकसंख्या जवळजवळ कायम - ७४ ऐवजी ६६ टक्के - आहे; आणि शेतीचा राष्ट्रीय उत्पादनातील हिस्सा मात्र ६४ टक्क्यांवरून आज २३ टक्क्यांवर आला आहे. शेतीतील मालमत्ता बाहेर घेऊन जायची आणि माणसे तिथेच ठेवायची, हे होऊ नये, हे इतिहासाच्याविरुद्ध आहे, हे निसर्गाच्या विकासाच्या सिद्धांताच्याही विरुद्ध आहे अशी मांडणी आम्ही करत आलो. सर्व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये एक डॉन क्विझोटे * लपलेला असतो, एक स्वप्नरंजन असते, प्रत्यक्षात न जमलेले भव्य दिव्य असे काहीतरी आपण करत असतो, अशी छुपी आत्मवंचना असते. वेळोवेळी असे अनेक डॉन क्विझोटे माझ्या स्वतःच्या मनामध्येही निर्माण झालेले आहेत. कधीकधी मी स्वत:ला सॉमरसेट मॉमच्या The Moon and Six Pence या कादंबरीतील स्टॉकब्रोकर नायकाच्या जागी कल्पिलेले आहे. तर कधीकधी मी शरदबाबूंच्या 'सव्यसाची' मधील डॉक्टर बनलो आहे. कधीकधी मी स्वतःला एखाद्या आध्यात्मिक प्रेषिताच्या जागी कल्पिलेले आहे. या सगळ्या अनुभवांतून मी स्वतः गेलेलो असल्याकारणाने स्वयंस्फूर्त क्षेत्रातील कार्यकर्त्यांमधला डॉन विवझोटे मला लगेच ओळखू येतो. मला वाटते, समाजाची खरी प्रगती अगदी वेगवेगळ्या कारणांतून होत असते. इतिहास भिंती पाडत पाडत पुढे जातो, परंतु समाज मान्यता देतो ती मात्र भिंती उभारणाऱ्यांना - मग ती भिंत राष्ट्राची असो, धर्माची असो, जातीची असो की भाषेची, तैमूरलंग, चेंगीझखान, औरंगजेब, नादीर शाह यांना आपण क्रूरकर्मी ठरवले आहे पण त्यांनी जगभर केलेल्या स्वाऱ्यांमुळे भिंती पाडण्याच्या या ऐतिहासिक विकासप्रक्रियेला फार मोठी चालना मिळाली. कोलंबसने अमेरिका शोधली तीदेखील तिथल्या लोकांचा उद्धार करण्यासाठी नव्हे, तर व्यापारातून होणारा फायदा वाढावा म्हणून. Cupidity often brings greater benefits than greatness. (महानतेपेक्षा खूपदा स्वार्थातून माणसाचा जास्त फायदा होतो.)

आपण सर्व 'युद्ध नको, युद्ध नको असे म्हणत असतो, पण या युद्धामुळेच विकासाला सर्वांत जास्त चालना मिळाली आहे, असे इतिहास सांगतो. सगळे जग जवळ आणणारे आजचे कम्प्यूटर, इंटरनेट किंवा अन्य सेटेलाइट कम्युनिकेशन, किंवा अगदी विमाने हीसुद्धा युद्धासाठी केलेल्या प्रयत्नांतूनच झालेली निर्मिती आहे. तुमच्यातील जे सर्वोत्कृष्ट असते ते युद्धप्रसंगी नेहमी उफाळून येते. War brings out the best in men. खूपदा माझ्याकडे अनेक तरुण मंडळी, “आम्हांला शेतकऱ्यांची सेवा करायची आहे,” असे म्हणत येतात. शेतीमालावर प्रक्रिया करण्याचे वगैरे उद्योगधंदे त्यांना सुरू करायचे असतात. "आम्हांला स्वत:ला याच्यातून काही नकोय", असा त्यांचा दावा असतो. पुन्हा एकदा तीच 'आर्तिनाशनम्' ची भाषा! मला अशा लोकांची खूप भीती वाटते. मी त्यांना म्हणतो, "तुम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी म्हणून काही करू नका, तुम्हांला जे काही करायचे असेल, ते स्वतःच्या भल्यासाठी करा.” दुसऱ्याचे भले करायला निघालेली मंडळी जवळ आली, की माझी आवडती लेखिका आयन रॅन्ड हिच्या शब्दांत सांगायचे तर, "Leper's bells start ringing" असे वाटते. या देशातील जे स्वयंस्फूर्त कार्य गेल्या वीस-पंचवीस वर्षांत मी बघितले, त्यावरून माझे अशा कार्याविषयीचे मत प्रतिकूल बनले आहे. कार्यकर्त्यांचा छुपा पण प्रखर अहंकार, त्यांची ढोंगबाजी, त्यांची नाटके, सेवेच्या बुरख्याखाली स्वतःची सोय पाहत राहणे, त्यांच्यातले हेवेदावे, त्यांच्यातील व्यासंगाचा अभाव, मूळ प्रश्न टाळून उगाचच काहीतरी छोटेसे पॅचवर्क स्वरूपाचे काम करीत राहण्याची आत्ममग्न प्रवृत्ती, हे सगळे विचारात घेता अशा स्वरूपाच्या कामाची समाजाला काहीही आवश्यकता नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. (दिवाळी १९९९ आणि फेब्रुवारी २००७) सर्वोटिस (Cervantes) या स्पॅनिश लेखकाने १६०५ साली लिहिलेल्या कादंबरीचे व तिच्या नायकाचे Don Quixote हे नाव. ही जगातील पहिली आधुनिक कादंबरी मानली जाते व सर्वश्रेष्ठ जागतिक कादंबऱ्याच्या यादीत तिचा बहुतेकदा समावेश केला जातो. प्रत्यक्षात अगदी सर्वसामान्य असलेला हा नायक कायम काल्पनिक जगात रमलेला असतो आणि आपल्या असामान्य शौर्याची स्वप्ने रंगवत असतो. संपादक निवडक अंतर्नाद ३६३