पान:निवडक अंतर्नाद.pdf/३५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

समाजसेवेची दुकानदारी नको! शरद जोशी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचा हा महत्त्वाचा लेख 'बस करा हे समाजसेवेचे ढोंग!' या शीर्षकासह अंतर्नादच्या १९९९ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता. तो खूपच वादग्रस्त ठरला. त्यानंतर लेखकाने त्यात थोडेफार बदल केले. नंतरचा तो सुधारित लेख इथे थोडा संक्षिप्त करून प्रसिद्ध करत आहोत. लेखकाची मते सर्वांना पटतील असे नाही, पण लेखकाने उपस्थित केलेले अनेक मुद्दे एका वेगळ्या दिशेने विचार करायला आपल्याला प्रवृत्त करतात. लेखकाची एकूण जीवनविषयक दृष्टीही प्रस्तुत लेखात, बहुधा प्रथमच, प्रकट झाली आहे आणि तीही वाचकाला अंतर्मुख करणारी आहे. अंतर्नादच्या १९९९च्या दिवाळी अंकासाठी 'स्वयंस्फूर्त कार्याचे समाजजीवनातील स्थान या विषयावर मी लिहावे, अशी विनंती भानू काळे यांनी मला त्याआधी तीन-एक महिन्यांपूर्वी केली होती. माझी प्रकृती, निवडणुकीची धामधूम, वेगवेगळे दौरे यांमुळे हे लेखन मागे पडत गेले. पण नंतर अंक छपाईला द्यायची वेळ आली असल्याकारणाने हे काम मला हाती घ्यावेच लागले. खरे सांगायचे तर, हे काम मागे पडायचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे या विषयावरील माझी मते इतकी धक्कादायक आहेत, की अंतर्नादच्या संपादकांना, तसेच ह्या अंकाच्या वाचकांनाही ती कितपत मानवतील याविषयी मी साशंक होतो. असो. "स्वयंस्फूर्त कार्य याचा अर्थ या अंकापुरता सामाजिक कार्य किंवा सेवाकार्य असा घ्यावा, इंग्रजीतील voluntary work या अर्थाने येथे स्वयंस्फूर्त कार्य हा शब्दप्रयोग योजलेला आहे.” असा खुलासा संपादकांनी केलेला आहे. अशा अर्थाने केल्या जाणाऱ्या स्वयंस्फूर्त कार्याची समाजाला काहीही आवश्यकता नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. अशा प्रकारच्या सर्व स्वयंस्फूर्त कार्यामागील दृष्टिकोन महाभारतातील पुढील श्लोकात व्यक्त केला गेला आहे. न त्वहं कामये राज्यम् न स्वर्गम् नापुनर्भवम् कामये दु:खतप्तानां प्राणिनाम् आर्तिनाशनम् ॥ (मला राज्य, स्वर्ग, मोक्ष हे काही नको. दुःखाने तप्त अशा प्राणिमात्रांचे आर्त म्हणजे संकट वा दुःख दूर करणे एवढीच माझी कामना आहे ) या दृष्टिकोनातून काही कार्य करणे हे मला अजिबात न पटणारे आहे. त्यामुळे या सर्व स्वयंस्फूर्त कार्याला माझा तत्त्वत:च विरोध आहे. परंतु त्यापूर्वी समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चालू असलेल्या स्वयंस्फूर्त कार्याचा आपण जरा थोडक्यात आढावा घेऊ. ३५२ निवडक अंतर्नाद बरेच स्वयंस्फूर्त कार्य आज पर्यावरणाच्या क्षेत्रात चालू आहे सामान्यतः या मंडळींचा मोठी धरणे बांधायला विरोध असतो. अनेक बडी बडी मंडळी या प्रश्नावर आपला आवाज उठवताना दिसतात. त्यांची मूळ भूमिकाच मला चुकीची वाटते. या देशातील शेतीचे प्रश्न मिटायचे असतील, अगदी प्यायच्या पाण्याचा प्रश्नही मिटायचा असेल, तर त्यासाठी अशी मोठी धरणे बांधणे अपरिहार्य आहे. असे असतानासुद्धा दोन-चार व्यक्ती केवळ आपले नाव दुमदुमत राहावे, आपला लौकिक वाढावा या एकमेव भूमिकेतून या आंदोलनामध्ये अग्रभागी असलेल्या दिसतात. सर्व प्रसारमाध्यमांमधून या मंडळींना, त्यांच्यामागे फारसा जनाधार नसतानासुद्धा अवास्तव प्रसिद्धी दिली जाते. १९९९ सालच्या सुरुवातीला मी नुकताच तीन आठवडे गुजरातेत राहून आलो होतो. तिथल्या, विशेषतः सौराष्ट्रातील जनतेचे पाण्याविना चाललेले हाल मी स्वतः पाहिले होते. पण राज्यातल्या तमाम जनतेकडे दुर्लक्ष करून काही संधिसाधू समाजकार्यकर्ते धरणविरोधी भूमिका घेत होते. मूठभर माणसांनी सगळ्या समाजाला वेठीस धरण्यातला हा प्रकार होता. या मंडळींच्या हुशारीचे तसे कौतुक करावेसे वाटते ! स्वत:ला महत्वाचे स्थान मिळावे म्हणून आंदोलन छेडताना, आपल्याला केवळ देशातच नव्हे तर देशाबाहेरही भरपूर प्रसिद्धी मिळेल, असेच क्षेत्र त्यांनी आंदोलनासाठी निवडले. धरणांना विरोध करणारी एक मोठी लॉबी आज जगभर कार्यरत आहे. या आंदोलकांना या लॉबीचा पुरेपूर फायदा मिळालेला आहे. स्वयंस्फूर्त कार्याचे दुसरे क्षेत्र म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन, अंधश्रद्धा ही नेहमीच भोवतालच्या वास्तवाशी निगडित असते. अनिश्चितता आणि अज्ञान यांतून ती जन्माला येते. हे वास्तव बदलल्याशिवाय, केवळ आंदोलन करून ती दूर होईल असे समजणे, हीच मोठी अंधश्रद्धा आहे. नुसत्या शिक्षणाचा प्रसारही यासाठी पुरेसा नाही. तसे असते तर देशातील असंख्य बाबा- महाराजांसमोर आज जी उद्योजकांची, शास्त्रज्ञांची, पदवीधरांची गर्दी दिसते ती दिसली नसती. देशातील बहुसंख्य समाज हा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याच्या सर्व श्रद्धा शेतीच्या परिस्थितीवर अवलंबून आहेत.