पान:निवडक अंतर्नाद.pdf/३५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नेत्यांचा अहंकार! मीपण ज्यांचे पक्व फळापरी, सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो... ज्यांचा 'मी'पणा गळतो त्यांनाच 'जीवन कळतं असे म्हणतात, पण सार्वजनिक जीवनातल्या नेत्यांच्या बाबतीत असे 'जीवन कळलेल्या व्यक्तींची संख्या दुर्मिळच म्हणायला हवी. व्यासपीठावर कोण, कसा आणि कुठे बसणार इथपासून ते संस्था-संघटनांच्या अहवालात आपले नाव कोणत्या क्रमांकावर आहे, इथपर्यंत वरवर अगदी किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी वरिष्ठांचे अहंकार दुखावून जातात नि त्याची किंमत मोजावी लागते ती कार्यकर्त्याला, अध्यात्माच्या क्षेत्रातील बाबांना आणि महाराजांनाही नसेल एवढी, 'चरणस्पर्श' करून कार्यकर्ते आपल्याला सन्मान देतात या गोष्टीची कित्येक राजकीय नेत्यांना एक प्रकारची नशाच चढते. “असू आम्ही सुखाने, पत्थर पायातील मंदिर उभविणे, हेच आमुचे शील हे गीत कळसावर बसलेल्यांना इतरांकडून ऐकायला खूपच आवडते!” ही एका कार्यकर्त्याची प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे साध्या राहणीचा संदर्भ कुठेतरी गरिबीशी, दारिद्र्याशी जोडला जाऊ लागला आहे. फिल्डमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाही हे जाणवते. साहजिकच साधेपणातून आपल्या गरिबीबद्दलचे गैरसमज पसरणे व त्याची परिणती आपण कुणाच्या तरी व्यक्त अव्यक्त अनुकपेचा विषय बनणे, हे त्याला अस्वस्थ करते. त्यातच आजूबाजूच्या वातावरणाच्या चंगळवादी कोलाहलात प्रसंगी 'साधेपणा' या मूल्याबद्दलची त्याची निष्ठाही मग पातळ होते, प्रसंगी उरतच नाही. "मीच काय पाप केलंय?" ही मानसिकता मग उसळी मारून वर येते. वैचारिक कोलाहलामुळे ठिसूळ झालेल्या सैद्धान्तिक बैठका, स्पर्धात्मकता आणि व्यावसायिकता यांमुळे सामाजिक कार्यातल्या 'मिशन भावनेला लागलेली आहोटी आणि व्यक्तिगत जीवनातही वेळेच्या व्यवधानाच्या संदर्भात 'डिमांडिंग' झालेले घर-संसार यात बावचळून गेलेला कार्यकर्ता सतत मार्गदर्शक मित्राच्या शोधात असतो, हे सनातन सत्य आहे. ज्ञानाच्या क्षेत्रात जसा गुरू लागतो तसाच सार्वजनिक जीवनात प्रत्येकालाच एक 'मेंटर' लागतो. कुणीतरी आपला हात धरून स्वीकृत क्षेत्रातल्या अवघड वाटा दाखवाव्यात, कुणीतरी पाठीवरून हात फिरवावा, कुणीतरी चुका समजावून सांगाव्यात, कुणीतरी आपले पालकत्व स्वीकारावे, काही यश मिळाले तर डोळ्यांच्या भाषेनीच का होईना पण कुणीतरी शाबासकी द्यावी असे प्रत्येक कार्यकर्त्यालाच वाटत असते. स्त्री असो की पुरूष, उजवा असो की डावा, ग्रामीण असो की शहरी, 'मेंटर' ची गरज कोणाला चुकलेली नाही. राजकारण, समाजकारण, संस्थाकारण, स्वयंसेवी कार्य, सर्वदूर काम करणाऱ्या तळातल्या कार्यकर्त्यांची ही 'किमान समान' गरज आहे. सभोवती सिनिसिझमचा अंधार काठोकाठ भरू पाहत असताना आणि मूल्ये, निष्ठा, व्रत वगैरे शब्दावली बाद होत असताना, "मीच का म्हणून चांगलं वागायचं?” या प्रश्नाचा फणा काढलेला नाग कार्यकर्त्यांच्या मनात घर करून बसला नसेल, तरच नवल सापडलेल्या वा न सापडलेल्या 'मेंटर' कडून कार्यकर्त्याला या प्रश्नाचे प्रामाणिक, पटणारे आणि पेलता येणारे उत्तर हवे आहे. त्याला नुसता उपदेशाचे डोस पाजणारा 'मार्गदर्शक नकोय. दुविधांमधून चतुराईने पण तरीही प्रामाणिकपणे मार्ग काढायला शिकविणारा मेंटरवजा मित्र त्याला हवाय, त्याग, परिश्रम, सेवाभाव, प्रामाणिकता, निष्ठा या पारंपरिक आणि पराकोटीचे महत्त्व असलेल्या मूल्यव्यवस्थेला म्हणजेच कार्यक्षमता, उत्पादकता, कुशलता, व्यवस्थापनदृष्टी, इ. आधुनिक मूल्यांची जोड का आणि कशी द्यायला हवी हे सांगणारा 'मेंटर' त्याला हवाय. सेवाभाव आणि कार्यनिष्ठा असेल तर कार्यक्षमता उत्पन्न होतेच हे खरे नाही आणि कौशल्य असणाऱ्यांकडे निष्ठा आणि प्रामाणिकता असणारच हेही खरे नाही, हे नीट समजावून सांगणारा 'सखा आणि सहकारी' हा कार्यकर्ता शोधतोय! नव्या जागोजागच्या आणि विविध क्षेत्रांमधल्या 'मावळत्या' पिढीने ही 'मेंटरशीप' केली नाही ही आजच्या कार्यकर्त्यांची सार्वत्रिक तक्रार असेल असे मानण्यास बरीच जागा आहे. कबिराने लिहिलेल्या आणि आबिदा परवीनने गायलेल्या एका भजनात आबिदा विलक्षण आर्ततेने सांगते, कहत कबीर सुनो भई साधो साहब मिले सबूरी में, मन लागो आज फकीरी में... ध्येयाच्या आणि आदर्शवादाच्या मागे लागून 'फकीर' व्हायला तयार असलेला तरुण कार्यकर्तावर्ग आजही जागोजाग आहेच. प्रश्न आहे, त्याची उमेद वाढविणाऱ्या 'साहबा' चा. सबुरीत, शांततेत, सहजपणे, अनौपचारिकपणे, हा 'साहब' त्याला 'भेटणं' अंमळ अवघडच. तो निदान 'सापडला' तरी खूप! (ऑगस्ट २००६) निवडक अंतर्नाद ३५१