पान:निवडक अंतर्नाद.pdf/३४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राष्ट्रीय गाणं स. ह. देशपांडे पण एकही गाणं असं नव्हतं की जे अखिल भारतातल्या लोकांच्या तोंडी बसलेलं होतं. इंडोनेशियात जकार्ता इथं शेती- अर्थशास्त्रज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद होती, जगातल्या विकसित आणि विकासमान अशा देशांतील सुमारे सहाशे प्रतिनिधी परिषदेला उपस्थित होते. पाच दिवस परिषद चालली होती, परिषदेच्या कामकाजाव्यतिरिक्तच्या वेळात सहली, जेवणं इत्यादी कार्यक्रम असत. एका संध्याकाळी इंडोनेशियाच्या कृषिमंत्र्यांनी एका हॉटेलच्या भव्य भोजनगृह्यत सर्व प्रतिनिधींना शाही खाना दिला. विविध प्रकारच्या स्वादिष्ट अन्नांचे आणि काही परिचित आणि काही अपरिचित अशा फळांचे डोंगरच रचल्यासारखे होते. प्रत्येक देशातले प्रतिनिधी निरनिराळ्या टेबलांभोवती आपापले गट करून बसले होते. आम्ही भारतीय एकूण पंचवीस-तीसजण होतो. त्यात बहुतेक सर्व राज्यांमधून आलेली मंडळी होती. जेवण सुरू करण्यापूर्वी करमणुकीचा कार्यक्रम होता. एका विस्तीर्ण मंचावर एक हुशार सूत्रसंचालक (मास्टर ऑफ सेरेमनीज) सूत्रसंचालन करीत होता. त्याचं बोलणं मोठं खुसखुशीत होतं आणि त्याच्या निवेदनावरच टाळ्या पडत होत्या. नेहमीचे बाली- नृत्य, इंडोनेशियन वाद्यवृंद, इंडोनेशियन संगीत इत्यादी कार्यक्रम झाले आणि एकाएकी सूत्रसंचालकानं एका कोपऱ्यात बसलेल्या गटाकडं बोट दाखवून जाहीर केलं, "आता फ्रेंच गट एक गाणं म्हणेल." फ्रेंच गटात जरासा गोंधळ उडालेला दिसला कारण त्यांना ही घोषणा अनपेक्षित होती. पण काही क्षणांतच त्यांची आपापसात मसलत झाली आणि पंचवीस-तीस फ्रेंच स्त्री-पुरुष मंचाच्या रोखानं सरसावले. तिथं येऊन त्यांनी नीटसपणानं एक फ्रेंच गाणं सादर केलं. हे संपेपर्यंत कल्पना अशी होती की यानंतर दुसरे कार्यक्रम सुरू होतील. पण फ्रेंच गट सोडून गेल्यावर संचालकानं दुसऱ्या दिशेला बोट केलं आणि म्हणाला, "जपान!” जपानी आले आणि त्यांनी गाणं सादर केलं. इकडं आम्हा भारतीयांच्या पोटात भीतीचा गोळा उठला. हे चक्र असंच चालू राहिलं आणि आपल्यावर पाळी आली तर काय करायचं? सगळ्या देशाला येणारं गाणं कुठाय? राष्ट्रगीत म्हणायची ही जागा नव्हे - आणि ते तरी सर्व भारतीयांना नीट म्हणता येतं असं थोडंच आहे? आमची शोधाशोध सुरू झाली. एकही गाणं डोळ्यापुढं येत नव्हतं. सिनेमातलंही चाललं असतं; पण एकही गाणं असं नव्हतं की जे अखिल भारतातल्या लोकांच्या तोंडी बसलेलं होतं. "इस मिट्टी को तिलक करेंगे धरती है बलिदान की" ह्या गाण्याच्याही सगळ्या ओळी, निदान चार- पाच, येणारा एकही नव्हता. शिवाय हिंदी न येणारे आमच्या गटात अनेक होते. आम्ही अगढ़ी केविलवाणे झालो. संचालकाचं बोट आपणाकडे वळू नये अशी मनोमन प्रार्थना करू लागलो. भारताला जगात फार मोठा मान आहे अशातली गोष्ट नाही. पण भारत कुठंही दुर्लक्षिला जात नाही. एका बाजूला एक मोठं वैभव आहे जगातला सर्वांत मोठा आणि (त्या वेळी) पंचवीस वर्षं लोकशाही जपून ठेवलेला देश. त्याची पुरातन संस्कृती विशेषतः या इंडोनेशियाला जवळची. दुसऱ्या बाजूला, जगावर कुठल्याच बाबतीत छान न टाकलेला, एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा पण दुबळा आणि खिळखिळा झालेला आपला देश. पण विरोधांमुळंच की काय भारताबद्दल जगात अमाप कुतूहल असतं. त्याची कुठल्याही समूहात दखल घेतली जाते. आताही तसंच झालं. मंचावरून घोषणा झाली, "इंडिया!” शेवटी झालं काय तर आम्ही 'जनगणमन' च म्हणालो. त्यातल्या त्यात सगळ्यांना येणारं एवढंच गाणं. ते आमचं राष्ट्रगीत आहे हे फारसं कुणाला माहीत नसणार ही त्यातल्या त्यात सांभाळून घेणारी गोष्ट. गाणं म्हणताना एका आवाजात म्हटलं जात नव्हतं. शब्दोच्चार सर्वांचे सारखे नव्हते आणि अशुद्धही होते. कुणीकुणी उगाचाच मधेमधे मुठी आवळून हात हवेत फेकीत होते. एकूण, एका जागतिक रंगभूमीवर आम्ही आमच्या हाडीमाशी खिळलेल्या विस्कळितपणाचं ओंगळवाणं प्रदर्शन केलं. • औपचारिक टाळ्या झडल्या त्यांवर आम्ही समाधान मानून घेतलं. (उर्वरित मजकूर पान ३४४ वर) निवडक अंतर्नाद ३३९