पान:निवडक अंतर्नाद.pdf/३२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषेत नसलेले, कोणताही आशय व्यक्त करण्याचे तिचे सामर्थ्य जाणवल्यामुळे सत्ताधीशांनी आपली कीर्ती चिरंतन करण्यासाठी या सुंदर भाषेची निवड केली. इथे एक आनुषंगिक मुद्दा नोंदवावासा वाटतो; तो म्हणजे भारतातही अनेक प्राकृत भाषांचा समांतर विकास होत असताना काव्य, शास्त्र, तसेच शिष्टाचाराच्या अभिव्यक्तीसाठी संस्कृतची निवड केली गेली, याचे कारण ती उच्चवर्णीयांची शिष्ट व्यवहारांची भाषा म्हणून आधीच प्रतिष्ठित झाली होती हे नसून तिची आंतरिक गुणवत्ता हे आहे. इसवी सनाच्या आरंभीच्या काही शतकांत नव्यन्याय या शास्त्राने शास्त्रीय लेखनाची एक परिष्कृत परिभाषा तयार केली तिचा सर्व संस्कृत शास्त्रलेखकांनी स्वीकार केला. या परिभाषेमुळे वैचारिक अभिव्यक्तीमध्ये आकारिकता (formalism) आली. पाणिनीय व्याकरणाच्या जोडीला नव्यन्यायशास्त्राने संस्कृत भाषेला आशयाच्या अभिव्यक्तीच्या बाबतीत अधिक प्रमाणबद्ध, सौष्ठवपूर्ण आणि बांधेसूद रूप दिले. डॉ. कपिला वात्स्यायन या विदुषींनी संस्कृत भाषेच्या ठायी असलेल्या उपजत विलक्षण प्रतिभेचा (genius) उल्लेख करून शास्त्रकर्त्यांनी तिचा स्वीकार करण्यामागे या विलक्षण प्रतिभेबरोबरच एकाच शब्दातून अनेक अर्थ व्यक्त करण्याचे तिचे असाधारण सामर्थ्य, लवचिकता आणि शास्त्रीय लेखनासाठी आवश्यक असलेला काटेकोर नेमकेपणा, शिस्त हे गुणविशेष कारणीभूत आहेत असे म्हटले आहे. याखेरीज बहुभाषिक भारतातील वेगवेगळ्या समाजघटकांना, संपर्कभाषेचे (lingua franka) काम करीत एका सूत्रात बांधण्याचे कामही संस्कृतने केले. शिलालेखांप्रमाणेच वास्तुशिल्पे आणि कला यांच्या माध्यमांतूनही ही संस्कृती प्रकटली. कंपूचियामधले अंगकोरवट हे जगातले सर्वात मोठे हिंदू मंदिर मानले जाते. महाभारतकथा सांगणारी शिल्पे कोरलेला जगातला सर्वांत मोठा शिलापट्टही याच मंदिराच्या प्रांगणात आहे. थायलंडमधल्या एका भव्य बौद्ध विहाराच्या आतल्या भिंतींवर रामायणातल्या प्रसंगांची चित्रे रंगवलेली पाहून बौद्ध आणि हिंदू संस्कृतींच्या समन्वयाचा प्रत्यय येतो. इंडोनेशिया, जपान इत्यादी राष्ट्रांमधल्या काही नृत्यनाट्यप्रकारांत रामायण-महाभारतातील पात्रे व प्रसंग आजही रंगवले जातात. संस्कृतने घडवलेल्या संस्कृतीचा आणखी एक महत्वाचा आविष्कार म्हणजे जीवनदर्शन, आशियाखंडातल्या ज्या भूप्रदेशावर भारतीय संस्कृती विस्तारली त्या भूप्रदेशातील समाजजीवनातही ती पाझरली. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक, निकोप दृष्टिकोन, शांततामय सहजीवनाला अनुकूल असे आचरण, विविधतेत एकता, सत्य, अहिंसा यांसारख्या मूल्यांचे महत्त्व हे या संस्कृतीचे काही झिरपे या भूप्रदेशातील लोकांचे आचारविचार, शिष्टाचार यांत जी समानता आढळते तिच्या मुळाशी ही संस्कृती आहे. संस्कृतच्या तिन्ही अंगांची काही वैशिष्ट्ये संस्कृतचे यथार्थ रूप काही प्रमाणात स्पष्ट करावे या हेतूने सांगितली. ते सांगताना ३२८ निवडक अंतर्नाद संस्कृतने आशियाखंडावर कसे अधिराज्य केले हे स्पष्ट केले. नंतरच्या काळात संस्कृतने पश्चिम गोलार्धही पादाक्रांत केला. संस्कृतचे वैश्विक स्वरूप कळण्यासाठी तिच्या पाश्चात्त्य जगाशी आलेल्या संपर्काबद्दलही थोडक्यात समजून घेणे उचित ठरेल. हाल्बफाससारखे काही विद्वान प्राचीन काळी पायथागोरससारख्या ग्रीक तत्त्वज्ञांवर प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडला होता असे मानतात. सिकंदरच्या स्वारीनंतर काही भारतीय तत्त्वज्ञ ग्रीसमध्ये गेले होते असेही मानले जाते. तथापि, त्यासंबंधी भरीव माहिती हाती लागत नाही. पाश्चात्त्य जगाचा संस्कृतशी खऱ्या अर्थाने संबंध आला तो १६ व्या शतकापासून ख्रिस्ती धर्मोपदेशक आणि नंतर भारतावर राज्य करण्यासाठी आलेले इंग्रज आपापले हेतू सफल करण्याच्या उद्देशाने संस्कृतकडे वळले. संस्कृत वाङ्मयाचा खजिना अवचित हाती लागल्यामुळे ते प्रभावित झाले. धर्मप्रसार किंवा शासन या हेतूंना जिज्ञासेची जोड मिळाल्यामुळे त्यांची संस्कृतीची ओढ अधिक तीव्र झाली. रॉबर्टो डी नोबिलीसारखे धर्मोपदेशक संस्कृत संभाषणकला आत्मसात करून संस्कृत पंडितांशी संवाद साधू लागले. काही धर्मोपदेशक मिळतील तेवढी हस्तलिखिते घेऊन स्वदेशी परतले. त्यात संस्कृत व्याकरणापासून महाभारतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवरचे ग्रंथ होते. या हस्तलिखितांच्या पावली संस्कृत युरोपातील जिज्ञासू अभ्यासकांपर्यंत पोचली. पूर्वेकडून आलेल्या या अद्भुत भाषेने आणि वाङ्मयाने त्यांचे डोळे दिपले. त्यांच्या कुतूहलाचे रूपांतर भारतवेडात ( Indomania) झाले. भारतवेडाची जर्मनीत आलेली लाट हा हा म्हणता युरोपभर पसरली. दरम्यान सर विल्यम जोन्सने युरोभारतीय गृहीतकाचा पाया ठरलेले, संस्कृत, ग्रीक व लॅटिन या भाषांमधल्या विलक्षण साम्यासंबंधी या लेखाच्या प्रारंभी उधृत केलेले विधान केले. या सर्वांचा परिपाक होऊन युरोपात भाषाशास्त्र आणि प्राच्यविद्या या दोन नव्या ज्ञानशाखा उदयाला आल्या. या दोन्ही ज्ञानशाखांचा विस्तार आज अमेरिका, ऑस्ट्रेलिया इ. अन्य खंडांतही झाला असून तौलनिक तसेच ऐतिहासिक भाषाशास्त्र, दैवतशास्त्र, मानववंशशास्त्र, सौंदर्यशास्त्र, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र आणि अलीकडेच, पाणिनीय व्याकरणाच्या अभ्यासातून जन्मलेले संगणकीय भाषाशास्त्र ( computational linguistics) इ. अनेक ज्ञानशाखांच्या अभ्यासक्रमात संस्कृतला स्थान मिळाले आहे काही प्रमाणात याचे श्रेय इंग्रज राज्यकर्त्यांनाही आहे त्यांनी भगवद्गीता, शाकुंतल यांसारख्या ग्रंथांचे इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध केल्यामुळे संस्कृत वाड्मयाचा दरवळ सर्वदूर पसरला. त्याने मोहित झालेला श्लेगेल हा जर्मन अभ्यासक एके ठिकाणी लिहितो, "इंग्रजांना भारतीय वाङ्मयाची मक्तेदारी हवी आहे काय ? फार उशीर झाला आहे. त्यांना फार तर भारतातील दालचिनीची मक्तेदारी मिळेल. भारताचा बौद्धिक खजिना मात्र सर्वांच्या मालकीचा आहे. " संस्कृतच्या वेडाने झपाटलेल्या युरोपियन उच्चभ्रू समाजाविषयी लिहिताना मॅक्सम्युलर या जर्मन विद्वानाने पुढील किस्सा सांगितला आहे: एका राज्याची डचेस आपल्या नियोजित