पान:निवडक अंतर्नाद.pdf/३२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विशेष असणाऱ्या प्राचीन भाषा दोन, ग्रीक आणि संस्कृत, कालांतराने अभिजात संस्कृतात स्वराघात लोप पावला; तो फक्त वैदिक संस्कृतमध्ये शिल्लक राहिला. मात्र या दोन विशेषांमुळे संस्कृतच्या प्रथमश्रवणी भाषारसिक तिच्या प्रेमात पडतो, मग ते श्रवण वेदमंत्रांचे असो, किंवा जयदेवाच्या गीतगोविंदाचे, सुमारे पंधरा वर्षांपूर्वी संस्कृत बोलण्याच्या वेडाने झपाटलेल्या स्पेनमधल्या काही विद्यार्थ्यांनी माझ्याकडून बोली संस्कृतचे धडे घेतले. गेल्या वर्षी याच कामगिरीवर माझी मैत्रीण डॉ. आशा गुर्जर नॉर्वेमध्ये गेली होती. फिल्योझा या फ्रेंच विद्वानाने आपल्या संस्कृतविषयक पुस्तकात म्हटले आहे की जगात दीर्घायुषी भाषा दोन, संस्कृत आणि चिनी, चिनी भाषा काळाच्या ओघात बदलत गेली, संस्कृत मात्र चिरतरुण राहिली आहे. इ. पूर्व ५व्या शतकाच्या आसपास पाणिनी या वैयाकरणाने तिला सर्वांगी कोरून, तासून तिला शिल्पाचे चिरंतन रूप दिले. तेव्हापासून ती 'संस्कृत' - घडवलेली, अधिक सुंदर बनवलेली झाली. तिच्या अभिव्यक्तीत नेमकेपणा आला. तिच्या पदन्यासात लयबद्धता आली. मात्र बोलीचा सळसळता उत्स्फूर्तपणा जराही कमी झाला नाही. बोलीची सहजता आणि कृत्रिम भाषेचा नेटकेपणा एकाच ठायी असणारी संस्कृत ही एकमेव भाषा आहे, असे भाषाशास्त्रज्ञ म्हणतात. वाङ्मय या संस्कृतच्या दुसऱ्या अंगाची प्रमुख तीन वैशिष्ट्ये, वैपुल्य, वैविध्य आणि वैलक्षण्य या तिन्ही विशेषांच्या बाबतीत संस्कृत वाङ्मय जगातल्या कोणत्याही भाषेतल्या समृद्ध वाड्मयाच्या तोडीचे आहे. आजवर प्रकाशित झालेल्या संस्कृत ग्रंथांची संख्या काही लाखांवर असेल. राष्ट्रीय पांडुलिपी मिशन (National Mission for Manuscripts ) या केंद्रशासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत केलेल्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्व संग्रहालयांत आणि अन्य ठिकाणी संग्रहित असलेल्या हस्तलिखितांची संख्या कच्च्या गणनेनुसार सुमारे पन्नास लाखांच्या आसपास आहे. एकट्या पुणे शहरातील विविध संस्थांमधील उपलब्ध हस्तलिखितांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे. संस्कृत वाङ्मयाच्या या अफाट विस्ताराबद्दल एक पाश्चात्त्य अभ्यासक आपल्या लेखात म्हणतो की, प्रकाशित संस्कृत वाड्मय म्हणजे हिमनगाचा समुद्राच्या पृष्ठभागावर दिसणारा भाग!' या वाड्मयाचे विषयही वैविध्यपूर्ण आहेत. सर्वसामान्यांना धार्मिक आणि ललित संस्कृत वाङ्मय थोडेफार माहीत असते. याखेरीज संस्कृतने तत्त्वज्ञान, भाषाशास्त्र, गणित, खगोलविज्ञान, तर्कशास्त्र, कृषिविज्ञान, वैद्यकशास्त्र, राज्यशास्त्र, नाट्यशास्त्र, संगीत, वास्तुविद्या, रसायनशास्त्र, इतकेच नव्हे तर धनुर्विद्या आणि पाकशास्त्र यांसारख्या अनेक विद्याशाखांची दालने समृद्ध केली आहेत. संस्कृत हस्तलिखितांच्या प्रकाशित झालेल्या सूचींवरून एक नजर टाकली तरी या वैविध्याची व्याप्ती केवढी आहे याची कल्पना येते. डेव्हिड पिंगरी या अमेरिकन विद्वानाने Sensus of Exact Sciences in India या शीर्षकाच्या पाच खंडांच्या ग्रंथात भारतीय खगोलविज्ञान आणि गणित या विषयांवरच्या सुमारे पाच हजार हस्तलिखितांची सूची प्रकाशित केली आहे यांपैकी मोजकीच हस्तलिखिते आजवर ३२६ • निवडक अंतर्नाद प्रकाशित झाली आहेत ( पुण्याच्या आनंदाश्रम संस्थेने पुण्यात उपलब्ध असलेल्या सुमारे ऐंशी हस्तलिखित सूचींमधून आयुर्वेद, वास्तुविद्या, संगीत, धर्मशास्त्र, कामशास्त्र इ. विषयांवरील हस्तलिखितांची विषयवार सूची तयार केली आहे; आर्थिक साहाय्याअभावी तिचे प्रकाशन रखडले आहे). संस्कृत वाङ्मयातील विषयांची वर दिलेली यादी स्थूल आहे काही विषयांची तपशीलवार विभागणी केली तर यादी खूप मोठी होईल. उदा. वैद्यकशास्त्र या विषयात मानव, घोडा, हत्ती, वृक्ष, पशुपक्षी यांच्या वैद्यकांवर वेगवेगळ्या ग्रंथांचा समावेश होतो. त्या त्या विषयांतले तज्ज्ञ आणि संस्कृतज्ञ यांनी एकत्र येऊन या प्राचीन विज्ञानाच्या महासागरात अवगाहन केले नाही तर काळाच्या ओघात हा महासागर जागच्या जागीच आटून जाईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. विषयवैविध्याने नटलेल्या या वाङ्मयसागरातून अभ्यासकांनी आजवर जी रत्ने वेचली त्यावरून हा सागर किती विलक्षण आहे याची कल्पना येते. जगातले सर्वात प्राचीन, तरीही परिपूर्ण असे पाणिनीचे संस्कृत व्याकरण हा मानवी बुद्धिमत्तेचा सर्वश्रेष्ठ आविष्कार (the greatest monument of human intelligence') आहे हा ब्लूमफील्ड या भाषाशास्त्रज्ञाचा उद्गार, या व्याकरणाची सांकेतिक परिभाषा, सूत्रांची बीजगणिती संरचना आणि संगणकीय आज्ञावली (computer programme) शी नाते सांगणारी विश्लेषण पद्धती पाहून थक्क झालेले काही पाश्चात्त्य वैज्ञानिक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ( artificial intelligence ) क्षेत्रात व्याकरणाचे उपयोजन करण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि या व्याकरणाचा तोंडावळा पाहूनच त्याचा धसका घेतलेले आमचे विद्यार्थी त्यापासून दूर पळू पाहताहेत. संस्कृत भाषेच्या कुशीत जन्मलेले आणखी एक विलक्षण अपत्य म्हणजे महाभारत, जगातले सर्वात मोठे आर्षकाव्य, होमरच्या इलियडच्या आठपट मोठे भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिरात त्याच्या चिकित्सित संपादनाचा प्रकल्प सुमारे पन्नास वर्षे चालला होता. १९६६ साली १९ खंडांत प्रकाशित झाल्यानंतर या चिकित्सित आवृत्तीचा समग्र अनुवाद फारच थोड्या भाषांमध्ये झाला आहे. मराठीमधे अजूनही नाही. भारताबाहेर समग्र अनुवाद प्रकाशित करण्याचा मान केवळ चीनने पटकावला आहे या काव्याची कथा, उपाख्याने, व्यक्तिचित्रे, ज्ञानविज्ञान आणि जीवनदर्शन आजही जगभरातल्या अभ्यासकांना, कलावंतांना आणि तत्त्वज्ञांना खुणावत आहेत. रामायण आणि महाभारत या आर्षकाव्यांनी अनेक रामायणमहाभारतांना जन्म दिला आहे. इतकेच नव्हे, तर भारतीय भाषांमधल्या वाङ्मयाच्या वैभवातही भर घातली आहे असाच एक विलक्षण ग्रंथ म्हणजे भरतमुनींचे नाट्यशास्त्र, नाट्याबरोबर संगीत, नृत्य, वाद्य, कलास्वाद इ. अनेक विषयांची सविस्तर मांडणी करणारा हा या विषयावरचा प्राचीनतम उपलब्ध ग्रंथराज, त्याचे नीट आकलन होण्यासाठी आवश्यक असणारी बुद्धिमत्ता आणि सखोल विचिकित्सा घेऊन त्याला भेटू इच्छिणाऱ्या प्रखर जिज्ञासूंच्या प्रतीक्षेत तो आजही आहे. आधुनिक