पान:निवडक अंतर्नाद.pdf/३२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तीन ट्रेन जातात तिकडे. म्हटलं तर फेस्टिवलसोबत पर्यटनही करता यावं, असा रंगबिरंगी, ऐतिहासिक वास्तूंनी सजलेला प्रदेश. एक आठवडा सुट्टी काढून जेएलएफला जाणं तसं कठीण नव्हे. विद्यार्थ्यांनी तर इथे यावंच, पण आपण मोठ्यांनीही यावं, समोर चाललेलं सगळं कळलं नाही, अगदी १० टक्के डोक्यात गेलं तरी खूप आहे. अनेक विषय कळतात, पुस्तकांची / लेखकांची नावं कळतात. त्यावरून काय वाचायला हवं, ते समजतं. आपुल्याच जातीचे इतुके जन भेटतात एकाच वेळी. हेच सगळं खरंतर मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीतही म्हणता आलं असतं तर? आयोजनापासून सुरुवात करू, जेएलएफ सुरू झाल्यापासून नमिता गोखले व विल्यम डॅलरिम्पल त्याचे संचालक आहेत आणि संजय रॉय निर्माते. यंदा डेव्हिड गॉडविन, उर्वशी बुटालिया वगैरे सात-आठ जण सल्लागार होते तर शेवली सेठी कार्यकारी निर्माती होती. टीमवर्क या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे संपूर्ण आयोजनाची व्यवस्था होती. म्हणजे आयोजन व्यावसायिक पातळीवर होते. टीमवर्कतर्फे जयपूरमधल्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांचीही निवड करून त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. ही कंपनीच प्रसिद्धी चंदेखील काम पाहाते. सलग काही वर्षं एकच कार्यक्रम आयोजित केल्याने मिळणारा अनुभव फार मोठा असतो, आणि अनुभवाने माणूस शहाणा होतो, हे जेएलएफमध्ये दिसून येतं. मराठी साहित्य संमेलन दरवर्षी वेगळ्या ठिकाणची स्वागत समिती आयोजित करते, त्यामुळे मागच्या चुकांवरून शिकण्याची संधीच त्यांना मिळत नाही. त्यामुळेच दरवर्षी चुकांची/ गोंधळाची पुनरावृत्ती होतेच. वर नवनवीन ढिसाळपणाही करायला वाव मिळतो! मराठी साहित्य संमेलन तसं पाहिलं तर दीड ते दोन दिवसच होतं. ग्रंथदिंडी वगळता त्यात सगळी मिळून वीसएक सत्रं होत असतील. कविसंमेलन वगळून किती कार्यक्रम, अगदी उद्घाटनासह, वेळेवर सुरू होतात आणि किती नियोजित वेळेच्या नंतरही सुरूच राहतात? आपल्या संमेलनात सर्वांत जास्त गर्दी होते कविसंमेलन आणि पुस्तकप्रदर्शनाला पुस्तकांवर किती टक्के सूट आहे, हा महत्वाचा मुद्दा ठरतो. यंदा घुमानला तर प्रकाशक जाणार की नाही पुस्तकं घेऊन, हेदेखील ठरायचंय. सासवडच्या २०१४च्या संमेलनात पुस्तक प्रदर्शनात गर्दी होती, पण ती त्रासदायक होती कारण जागा अपुरी होती, स्टॉल्सचं नियोजन योग्य नव्हतं. सुरक्षा हा विषय तर विचारात घेतलाच नसावा, असं वाटत होतं. मी रविवारी सकाळी प्रदर्शनात गेले, तेव्हा संपूर्ण न पाहताच बाहेर पडल्याचं आठवतंय. कारण भीती. काही झालं, तर आपल्याला इकडून बाहेर पडताच येणार नाही, याची खात्री वाटल्यानेच मी तिथे फार काळ भटकले नाही. धूळ तर इतकी होती, की काही फुटांवरचं दिसत नव्हतं. लहान गावांमध्ये पुस्तकं मिळत नाहीत त्यामुळे संमेलन ही पुस्तकखरेदीची मोठी संधी असते, पुस्तकांसाठी वाचक संमेलनाला येतात, हे ठाऊक आहे; तर तो अनुभव सुखकर का नाही होत ? प्रकाशकांनाही या सगळ्या गैरसौयीचा त्रासच होतो, पण थोडाफार तरी धंदा होतो, म्हणून स्टॉल लावतात बिचारे, सत्रांची मांडणी करताना जेएलएफमध्ये बाजारात नवीन ३२४ निवडक अंतर्नाद आलेलं पुस्तक ही मध्यवर्ती कल्पना असते. वर उल्लेखलेल्या राजदीप सरदेसाई, शशी थरूर, तरुण खन्ना, सुधा मूर्ती आदींच्या सत्रांवरून हे लक्षात येईल. यात सुधा मूर्ती वगळल्या तर इतर पुस्तकं नॉन-फिक्शन प्रकारातली आहेत, अशी पुस्तकं मराठीत येत नाहीत का? कमी प्रमाणात असतील, पण येतात नक्की, पण आपल्याकडे नॉन-फिक्शनला साहित्यच समजलं जात नाही! खेरीज, असाही विचार तर होत नसावा, याच्या पुस्तकावर सत्र करायचं म्हणजे त्याची जाहिरात होणार आपण का करावी त्याची जाहिरात ?' जेएलएफमध्ये जयपूरमधल्या मोठ्या हिंदी व इंग्रजी वृत्तपत्रांनी प्रायोजित केलेली अनेक सत्रं असतात, मराठी वृत्तपत्रं असं करू शकणार नाहीत का? प्रत्येक सत्राच्या प्रारंभी व शेवटी प्रायोजकाचा उल्लेख होतो. बस्स. त्यात काय वाईट आहे? आता बाब भाषेच्या विद्यार्थ्यांनी संमेलनाला भेट देण्याची. सासवडच्या संमेलनात शेकडो महाविद्यालयीन तरुणतरुणी होते. पुणे ते सासवड वा जवळच्या निमशहरी भागातले. पुण्यातून आलेले फारच कमी विद्यार्थी तिथे दिसले असतील. असं का? जयपूरला जाणं परवडत नाही, वेळ नाही, हे मान्य. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात तरी विद्यार्थ्यांनी जावं ना. राज्यात सगळीकडे एसटी जाते. अनेक ठिकाणी ट्रेन जाते. दोन दिवस राहायची सोय कमी पैशात होऊ शकते. आपले नातलग, मित्रमंडळी अशा वेळी नाही उपयोगात येणार तर कधी, त्यांच्या घरी एक वस्ती करायला काय हरकत आहे? मराठीचे विद्यार्थी असणाऱ्यांनी जावं असं म्हणताना, त्यांच्या शिक्षकांची आठवण झाल्याशिवाय कशी राहील? पण साहित्य संमेलनातून आपल्याला काही मिळू शकतं, भले परीक्षेत त्याविषयी प्रश्न नसेल, पण मला काही तरी शिकायला मिळेल. मी श्रीमंत होऊन परत येईन, हा विश्वास त्यांना द्यायला आपलं संमेलन कमी पडतं हे निर्विवाद, यंदा जेएलएफला दोन लाख पंचेचाळीस हजार लोकांनी भेट दिली. ही संख्या दर वर्षी वाढतेच आहे. आता असेच फेस्टिवल चेन्नई, बंगळुरू, कोलकाता, दिल्ली, पुणे, मुंबईतही होतात, परंतु जयपूरची रंगत त्यात नाही, कारण, तो जयपूरचा माहोलच असा असतो, की तो एकदा पाहिलाय, आता पुढच्या वर्षी नाही आलं तरी चालेल, असं अजिबात वाटत नाही. उलट यंदा काय राहिलं ऐकायचं, पुढच्या वर्षी कोण असेल, काय पाहायला मिळेल, याची उत्सुकता खूप असते. पुन्हा पुन्हा जात राहावं, असं वाटायला लावणारं, श्रीमंत करून टाकणारं वातावरण असतं ते. म्हणूनच वाट पाहातेय सप्टेंबरची, तारखा जाहीर होण्याची. (जयपूर फेस्टिवलची सर्व माहिती http:// jaipurliteraturefestival.org/ या वेबसाइटर उपलब्ध असते. तिथे माध्यम प्रतिनिधी वा सर्वसामान्य प्रतिनिधी म्हणून नोंदणी करता येते. माध्यम प्रतिनिधींना आपापल्या संस्थेचं प्रमाणपत्र सादर करावं लागतं. कारण, मागे लिहिल्याप्रमाणे इथले साहित्यिक कार्यक्रम सर्वांनाच निःशुल्क उपलब्ध असले तरी पत्रकारांना तिथे भोजन व संगीताचे कार्यक्रम हेदेखील मोफत उपलब्ध असतात.) (जुलै २०१५)