पान:निवडक अंतर्नाद.pdf/३१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाडगावकरांची शहाणपणाची कविता सुधीर रसाळ १० मार्च १९२९ हा ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्मदिन. पाडगावकरांना लोकप्रियता भरपूर मिळाली असली तरी त्यांच्या कवितेची गंभीर व दीर्घ अशी समीक्षा फारशी झालेली नाही. ही उणीव भरून काढण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न. निमित्त आहे बोलगाणी हा १९९० साली 'मौज' कडून प्रकाशित झालेला व त्यानंतर तब्बल बावीस आवृत्त्या निघालेला पाडगावकरांचा कवितासंग्रह. प्रस्तुत लेखात मंगेश पाडगावकरांच्या बोलगाणी या संग्रहातील कवितेचा विचार करायचा आहे मंगेश पाडगावकरांनी आपल्या काव्यलेखनात अनेक प्रयोग केले. मुळात रोमँटिक प्रवृत्तीची आणि वैणिक जातीची काव्यप्रतिभा असणाऱ्या या कवीने आपल्या काव्यलेखनप्रयोगात आपल्या कवितेची ही अंगभूत वैशिष्ट्ये मोडून टाकणारी कविताही लिहिली, परंतु असे प्रयोग करतानाही त्यांना आपल्या प्रतिभेचे रोमँटिकत्व आणि वैणिकत्व पूर्णपणे नष्ट करून यकता आले नाही. त्यांच्या 'वात्रटिका', 'सलाम', 'विदूषक', 'मोरू', 'बोलगाणी' इत्यादी अनेक संग्रहातल्या कवितांतही त्यांच्या प्रतिभेचे हे दोन्ही अंगभूत गुणधर्म अधूनमधून डोकावतातच, किंबहुना त्यांची या प्रकारची कविता ही रोमँटिक प्रवृत्ती आणि 'वैणिकत्व' या धर्मांचा व्यत्यास आहे असे म्हणता येईल. कारण त्यांच्या जाणिवांच्या तळाशी असलेले हे दोन्ही गुणधर्म गृहीत धरल्याशिवाय त्यांच्या या प्रकारच्या कवितांची अर्थपूर्णता प्रत्ययाला येत नाही. अलीकडे 'रोमँटिक' कविता लिहिणे हा जणू गुन्हा झाला आहे. म्हणूनच या प्रकारची कविता लिहिणे हे कमी दर्जाचे मानणारे समीक्षक पाडगावकरांच्या कवितेची दखल घेताना दिसत नाहीत. वस्तुत: मराठी कवितेची मुख्य प्रवृत्ती रोमँटिकच आहे. वारकरी संप्रदायाची मध्ययुगीन कविता ही प्रवृत्तीने रोमँटिक आहे. म्हणूनच, रोमँटिक प्रवृत्तीच्या वारकरी संतांनी विठ्ठलाला आपला 'स्वामी' आणि स्वतःला त्याचा 'दास' असे न मानता ते विठ्ठलाला 'सखा' मानत आले. त्यामुळेच ते त्याला आपल्या कवितेतून वेळप्रसंगी 'शिव्या' ही घालू शकले. अद्वैतवादी दार्शनिक भूमिका ही मुळात रोमँटिक प्रवृत्तीची आहे. स्वतःच्या आत्म्यात परमात्मा पाहणे आणि मोक्षप्राप्तीनंतर आपला आत्मा परमात्मरूप होणार असल्याचे मानणे, या श्रद्धेत मानव हा परमेश्वराइतकाच श्रेष्ठ मानला गेला आहे आधुनिक मराठी कवितेचा प्रारंभच मुळी पाश्चात्त्य रोमँटिसिझमच्या स्वीकारातून झाला आहे. मर्ढेकर, पु. शि. रेगे, दिलीप चित्रे, अरुण कोलटकर असे थोडे कवी सोडल्यास, एकूण मराठी कवी प्रवृत्तीने रोमँटिकच आहेत. असे असले तरी मंगेश पाडगावकरांच्या कवितेला काही समीक्षक मान्यता देत नाहीत. कारण त्यांची कविता ही 'व्याज रोमँटिक' असल्याचे मानण्याचा प्रघात आहे. परंतु असे म्हणत असताना 'व्याज रोमँटिक' कवितेची लक्षणे सांगून पाडगावकरांच्या कवितेचे व्याज रोमँटिक स्वरूप स्पष्ट केले जात नाही. रोमँटिसिझमची मूलभूत वैशिष्ट्ये सांभाळणारी पाडगावकरांची कविता अस्सल रोमँटिक कविता आहे पाडगावकरांनी बोलगाणी या संग्रहात समाविष्ट केलेल्या कवितेला 'बोलगाणी' म्हटलेले आहे. 'बोलगाणी' या शब्दात एक अंतर्विरोध आहे. 'बोल' हे भाषारूप गद्यप्रकाराचे असते आणि 'गाणी' ही काव्यरूप - किमान पद्यरूप असतात, तरीही हा अंतर्विरोधात्मक सामासिक शब्द पाडगावकरांनी अर्थपूर्ण बनवला आहे या सामासिक शब्दातील 'बोल' हा शब्द दोन अर्थ सुचवतो. एक म्हणजे हे श्रोत्याला उद्देशून 'बोलणे' आहे. येथे आविष्काराऐवजी संवादाला संप्रेषणाला महत्त्व आहे. दुसरा अर्थ : हे जरी गाणे असले तरी ते गायले जाणारे गाणे नसून ते बोलले जाणारे गाणे आहे. गाण्यातली शब्दरचना छंदोबद्ध असते. काटेकोरपणे सांभाळलेली पक्की लय गाण्यामध्ये असते. गाण्यातल्या शब्दांत स्वराकृती सामावून घेण्याचा अंगभूत गुणधर्म असतो. परंतु पाडगावकरांच्या बोलगाण्यात यापैकी काहीही नाही, गाणे हे श्रोत्यासमोर गायले जात असते. गाण्यात ऐकणारा - श्रोता • गृहीत धरलेला असतो. अनेकदा स्वतः गाणाराच गाण्याचा श्रोता असू शकतो. म्हणून गाणे हे मनातल्या मनात गायले जाऊ शकत नाही. कविता मात्र मनातल्या मनात म्हटली, वाचली जाऊ शकते. 'बोलगाणी' या संग्रहातली कविता एका कवीने वक्त्याच्या भूमिकेतून श्रोत्यांना उद्देशून केलेले संभाषण आहे. ही ऐकायची कविता आहे. म्हणून ते 'गाणे' आहे या संग्रहातील कविता हे बोललेले गाणे आहे. त्याला जरी स्वरसाज प्राप्त होऊ शकत नसला तरी गाण्यातला पायाभूत घटक - लयबद्धता येथेही सांभाळली गेली आहे. एखाद दुसऱ्या मात्रेचा फरक असलेल्या आणि सामान्यपणे विशिष्ट अक्षरसंख्या कायम ठेवलेल्या ओळी एकामागोमाग आणणे, मग अचानक वेगळी अक्षरसंख्या असलेली ओळ टाकून आधी प्रस्थापित झालेली लय निवडक अंतर्नाद ३११