पण बावरले होते, असं द्वंद्व यापूर्वी कधी खेळले नव्हते. एका क्षणी दोघंही थांबलो. ताणलेली शांतता दोघांच्यात थरथरत होती. घरी जाताना मी गप्प गप्प! रामदास म्हणाले, "काळजी करू नकोस, ते तुझ्या सूचनांचा नक्की विचार करतील.” झालंही तसंच. सुधारित हस्तलिखित वाचताना त्यांनी बदल केले आहेत, ही गोष्ट माझ्या लक्षात आली. इतकंच नव्हे तर, पुस्तक पूर्ण झाल्यावर मला पत्र पाठवून त्यांनी कळवलं, "तुमच्या लक्षात आलं असेलच, की तुमच्या सूचनांनुसार मी बदल केले आहेत." असं आवर्जून कळवणं हा त्यांचा दिलदारपणा होता. पहिल्या वादळी भेटीनंतर बेडेकरांच्या व बाळूताईंच्या अनेक भेटी झाल्या. दोघांच्याही वागण्यातील साधेपणा, घरगुतीपणा आणि आतिथ्यशीलता यांमुळे परकेपणा लौकरच लोप पावला. संध्याकाळी फिरत फिरत, नवरा व मुलगा यांच्यासकट सहजपणे त्यांच्या घरी डोकवावं, इतका अनौपचारिकपणा निर्माण झाला. कामानिमित्त बेडेकरांच्यात आणि माझ्यात पत्रव्यवहार होत असे. पत्र लहानशीच असत; पण छोट्या छोट्या पत्रांतून गच्च भरलेले त्यांचे शब्द डाळिंबाच्या दाण्यांसारखे रसाळ असत, ते वेचताना मन रंगीत होई. बेडेकर बरेच वृद्ध असूनही बोलताना मला अहो- जाहो करत, मला ते विचित्र वाटे, मी तसं त्यांना कोणत्यातरी एका पत्रात म्हटलंदेखील. त्यावर त्यांचं उत्तर आलं, "तरुण स्त्रियांच्या बाबतीत आदरार्थी बहुवचन मी वापरतो. याचे एक कारण मी मूळचा अर्धवट हिंदी मुलखातला आणि दुसरे, जडजवाहीर सांभाळतात ते मखमली डबीतून किंवा पेटीतून, हे मी पाहत आलो आहे." 'एक झाड...'च्या निर्मितीचं पर्व हे मंत्रमुग्ध करणारं पर्व होतं. बड़ा ख्याल संथपणे रंगत जावा, तशी त्या ग्रंथांची निर्मिती झाली. बैठका बेडेकरांच्या घरातच होत. पोचखानवाला रस्त्यावरचं दिनात कोर्ट हे त्यांचं घर त्यांच्यासारखंच थोराड अंगापिंडाचं, प्रशस्त आणि उंच, मोठ्या खिडक्यांचा ऐसपैस दिवाणखाना त्यात गुबगुबीत कोच, भारतीय बैठक, डायनिंग टेबल आणि लेखनाचं मेज, दुपारी साडेतीननंतर मी आणि रामदास त्यांच्या घरी जायचो. चित्रकार द. ग. गोडसे मुखपृष्ठ आणि पुस्तकाची मांडणी करत होते. ते बहुधा आमच्या आधीच येऊन बसलेले असत, घरात शिरताना ह्यस्याच्या लकेरी कानावर पडत, गालिच्यावर आरामात मांडा ठोकून बैठक जमे. गोडसे बेडेकरांचे जुने मित्र. त्या दोघांची 'सस्नेह जुगलबंदी' चाले. एकमेकांना कोपरखळ्या मारत, रेशमी चिमटे घेत गप्पा रंगत. त्या वेळच्या साऱ्याच आठवणींना एक खळाळता, मुक्त, आनंददायी नाद आहे तो आजही मला ऐकू येतो. सारांश, पॉप्युलरमधील वातावरण माझ्या चित्तवृत्तींना पोषक होतं. ते ऑफिस नसून कॉलेज वाटे सुमन, मंगल, विशाखा, शुभांगी, नीलिमा या बरोबरीच्या मैत्रिणी होत्या. आम्ही सकाळी साडेनऊपर्यंत यायचो. रामदास, शिराली, गोकर्ण हे 'बिग बॉस दह्यपर्यंत येत. त्यामुळे सुरुवातीचा अर्धा तास हा आमचा हक्काचा, टिवल्याबावल्या करायचा वेळ असे. माझं कॉलेजजीवन नुकतंच संपलं होतं. त्यामुळे माझ्यात अजूनही एक नटखट कॉलेजकन्या जिवंत होती. मला नकला करायची सवय होती. मृदुला जोशी, गोकर्ण, रामदास, इतकंच नव्हे तर, रामदासांच्या पत्नी लैलाबाई यांचीही नक्कल मी करत असे. लैलाबाईंना पाहण्याआधी मी फोनवरून त्यांचा लाडिक आवाज ऐकला होता. माझी लैलाबाईंची नक्कल लोकप्रिय होती. एकदा गंमत झाली. "हॅलो, रामदास आहेत का? मी लैला बोलतेय, " हे वाक्य मी उच्चारायला आणि रामदास दारातून आत यायला एकच गाठ पडली. माझ्याभोवती जमलेल्यांची पळापळ झाली, मला कळेना तोंड कुठे लपवावं. रामदास मात्र आमच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून निघून गेले. तेवढा खिलाडूपणा त्यांच्यात होता. माझं नुकतंच लग्न झालं होतं. एकत्र कुटुंब, लहान मूल स्वयंपाकपाणी यांमुळे धावपळ व्हायची. मग दुपारी डबा खाल्ल्यावर डोळ्यांवर झापड येई. अशा वेळी रामदास तिथे आले व मला पेंगताना त्यांनी पाहिलं तर ते सुमनला सांगत. "अंजली उठली, की तिला आत बोलावलंय ते म्हणून सांग.” त्यांनी मला याचा कधी जाब विचारला नाही, मलाच चोरट्यासारखं होई. पॉप्युलरमधील पाच वर्षं म्हणजे खरोखरच मला मिळालेला कॉलेजजीवनाचा बोनस होता. आम्ही मुली एकमेकींचे वाढदिवस साजरे करायचो, जवळच्या रोझ कॉर्नरमध्ये खादाडी करायचो, वरळी सीफेसवर भटकायचो. ऑफिसात भेळ करायचो, विशाखा कीर्तिकर ऋषिपंचमीला सर्वांसाठी मोठा स्टीलचा डबा भरून ऋषीची भाजी करून आणायची, चार ऑगस्टला भटकल बुक्स इंटरनॅशनलचा वाढदिवस केक कापून साजरा व्हायचा, त्यादिवशी बॉम्बे बुक डेपोचे पांडुरंग कुमठा, मीराताई कुमठा, रामदासांचे मोठे बंधू सदानंद व त्यांच्या पत्नी निर्मलाताई आणि एकंदर तमाम भटकळ मंडळी येत. हर्ष आणि सत्यजित ही तेव्हा हाफ पँटीतील शाळकरी मुलं होती. ती मेणबत्त्या फुंकून केक कापत दर गुडफ्रायडेला आर्टिस्ट डीकुन्हा सर्वांना खमंग मावा केक वाटत. सदानंद भटकळ दर शनिवारी येत. सर्वांना ते फार आवडत. त्यांच्या वृत्तीत वात्सल्य होतं. आले की आम्हांला चॉकलेट्स देत. त्यांच्या मनात एखादी जंगी योजना घोळत असे. हा स्वप्न पाहणारा माणूस होता. अगदी शेवटपर्यंत त्यांची ही वृत्ती कायम होती, त्यांची एकसष्टी आम्ही पॉप्युलरच्या गच्चीवर साजरी केली. त्यावेळी प्रभुराम जोशींनी आपल्या भावपूर्ण आवाजात पंकज मलिकचं 'आयी बहार आज आयी बहार' हे गाणं म्हटलं, ते आम्हांला इतकं आवडलं, की पुढे अनेकदा आम्ही त्यांच्याकडून पंकज मलिकची गाणी म्हणून घेतली. त्यांचं नावच आम्ही पंकज मलिक ठेवलं होतं. पॉप्युलर सोडल्यानंतरही माझं व सदानंदचं नातं टिकून होतं. डॉ. आनंदीबाई जोशींचं मी लिहिलेलं चरित्र वाचून त्यांनी मला फोन केला. ते समाधानानं म्हणाले, "अंजली, पुस्तक उत्तम झालंय. मला तुझा अभिमान वाटतो. खूप लिही. माझा तुला आशीर्वाद आहे." पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेनं या चरित्राला शं. ना. जोशी पुरस्कार दिला. सदानंद तेव्हा पुण्यात होते. प्रकृती ठीक नसतानाही ते कौतुकानं समारंभाला हजर राहिले. प्रेक्षकांत त्यांना पाहून माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. हे सारं इतकं 'आहे मनोहर' असताना मी जेमतेम पाच वर्षांत पॉप्युलर का सोडलं? राजीनामा देण्याचा निर्णय का घेतला? निवडक अंतर्नाद ३०३
पान:निवडक अंतर्नाद.pdf/३०४
Appearance