पान:निवडक अंतर्नाद.pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देण्यात सरवटे आणि फडणीस यांचा फार मोठा वाटा आहे. वर उल्लेखिलेल्या चित्रकारांच्या अगोदरपासून दीनानाथ दलाल, ढ, ग, गोडसे, रघुवीर मुळगावकर असे काही ज्येष्ठ चित्रकार प्रकाशनक्षेत्रात काम करत होतेच. परंतु दलालांनी 'स्व-गत' (जयवंत दळवी), 'माहीमची खाडी' ( मधु मंगेश कर्णिक) असे काही उत्तम अपवाद वगळता अर्थपूर्ण लक्षात राहण्याजोगी कामं क्वचितच केली. बॉम्बे आर्ट सोसायटीचं सुवर्णपदक मिळवणाऱ्या दलालांनी प्रकाशनक्षेत्रातल्या कामाला 'कमर्शियल' समजूनच काम केलं. तजेलदार, उत्कृष्ट रंगयोजना हे त्यांचं बलस्थान पुस्तकाच्या आशयाशी फारसं सुसंवादी ठरू शकलं नाही. अर्थात त्या काळाचा विचार करता ते साहजिक होतं. दलालांच्या बरोबरीनं द. ग. गोडश्यांनी केलेली 'माणदेशी माणसं तली (व्यंकटेश माडगूळकर) चित्रं त्या-त्या व्यक्तिरेखा जिवंत करणारी होती. पण गोडसे यांचं 'व्यक्ती आणि वल्ली'चं (पु. ल.) मुखपृष्ठ पूर्णपणे विसंगत, निरर्थकच होतं. मुळगावकरांविषयी तर बोलायलाच नको. त्यांनी कॅलेंडर आणि पुस्तकाचं मुखपृष्ठ यांत फरक मानलाच नाही. त्यांचे सर्वच चेहरे एकसारखे, डोळ्यांत 'जाई काजळ' घातलेले असायचे. प्रभाकर गोरे यांनी पुढच्या पिढीतल्या चित्रकारांना जी निर्भयता प्राप्त करून दिली त्याचा आणखीन पुढे जाऊन पुरेपूर उपयोग करून घेतला तो सुभाष अवचटांनी प्रकाशनक्षेत्रातला एक कालखंडच त्यांनी त्यांच्या निरनिराळ्या प्रयोगांनी गाजवला. माझ्या पिढीतल्या जवळजवळ सर्वच चित्रकारांवर सुरुवातीला त्यांचा प्रभाव होता हे मान्यच करावं लागेल. वाचकाला दचकवून टाकणारी, पूर्वसंस्कारांना धक्के देणारी त्यांची बेधडक शैली जवळजवळ सर्वच प्रकाशकांनी स्वीकारली. सहज हस्ताक्षरात लिहावी तशी त्यांची पुस्तकावरची शीर्षकं, पूर्वीच्या कोरीव, फिनिश्ड लेटरिंग्जना साफ धुडकावून टकणारी अशी होती. अंगठ्याचे ठसे वापरून टेक्सचर निर्माण करण्याचं त्यांचं तंत्र अद्भुत होतं. ('आजकालचे साहित्यिक गंगाधर गाडगीळ - या पुस्तकावर मात्र त्यांनी तीन अंगठे उठवून गाडगीळांना अभिप्रेत असलेल्या साहित्यिकांवर अकारण हल्ला केला होता, त्यांना पार मोडीत काढलं होतं.) चित्रात ले-आऊटला सोयीस्कर अशा ठिकाणी उतरलेले कावळेही यायचे, रंगाचे, रेषेचे, मासचे, त्याकाळी मिळणाऱ्या निरनिराळ्या स्क्रीनपेपरचे त्यांनी अनेक प्रयोग केले. 'गर्द' (अनिल अवचट) मधली डोळ्यांच्या ठिकाणी नुसत्या खोबण्या दाखवणारी खप्पड चेहऱ्याची पोरं मनावर चरे उमटवणारी होती, 'उत्तररात्र' (रॉय किणीकर) मधले अनेक विभ्रमांतले कवी रॉय किणीकर जाड पेन्सिलच्या रेषांमधून त्यांनी त्यांच्या भणंगपणासह अचूक टिपले होते. 'राधेय' ( रणजित देसाई) वर काळ्या आणि लाल रंगात काढलेला वनवासी, राकट कर्ण मला दलालांच्या कर्णापेक्षा ( मृत्युंजय) जास्ती खरा वाटला होता, लेखक रणजित देसाई यांना हा कर्ण आवडला नसल्यामुळे पुढच्या आवृत्तीसाठी चित्र करायला माझ्याकडे आलं होतं. प्रकाशकांना मी २८८ निवडक अंतर्नाद आग्रहपूर्वक मूळचं चित्र का बदलू नये, ते समजावून सांगितल्यानं त्यांनी ते तसंच ठेवलं. नाहीतर एक चांगलं चित्र दृष्टीआड झालं असतं. प्रकाशनक्षेत्रावर मुखपृष्ठकार/सजावटकार म्हणून अमीट ठसा उमटवणारे हे काही मातब्बर चित्रकार, खरं तर प्रत्येकावर स्वतंत्र लेख लिहावा इतकं त्यांचं कर्तृत्व मोठं आहे. पंचविसाहून अधिक वर्षं मी या क्षेत्रात चित्रकार या नात्यानं काम करतो आहे साहित्यातल्या सर्वच प्रकारांसाठी मुखपृष्ठं, पुस्तकाची अंतर्गत मांडणी, एवढंच काय, काही पुस्तकांचे ब्लर्बही मी लिहिलेत. काही पुस्तकांना शीर्षकंही दिली आहेत. याचं कारण प्रकाशकांपेक्षाही अधिक गांभीर्याने मला वाचावं लागतं. सर्व प्रकारच्या माध्यमांत गरजेनुसार मी चित्रं केली आहेत. अगदी पेन्सिल, चारकोल, पेन, बॉलपेन ते ऑईलकलर्सपर्यंत सर्व माध्यमं त्या त्या पुस्त आवश्यक वाटली तेव्हा वापरली आहेत. काही चित्रं कोलाजचीही आहेत, तर काहींसाठी मी फोटोग्राफीही केली आहे वर्षानुवर्षं विशिष्ट माध्यमात, विशिष्ट शैलीत काम करणाऱ्या चित्रकारांबद्दल मला आदर आहे मला मात्र ते कंटाळवाणं वाटतं. विशेषतः प्रकाशनक्षेत्रासाठी एकच शैली निरनिराळ्या पुस्तकांना कशी चालू शकते, हे मला न सुटलेलं कोडं आहे. इतक्या वर्षाच्या प्रवासानंतर हल्ली एक प्रश्न मला सतत पडत असतो. प्रकाशनक्षेत्रात काम करणाऱ्या चित्रकाराला साहित्य किती कळावं? म्हणजे त्याला फक्त चित्रसजावटीपुरतंच कळणं (व्यावसायिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा) योग्य आहे की काय ? त्यानं जास्ती खोलात शिरूच नये का? पण तशी लक्ष्मणरेषा कशी आखता येईल? खुद्द लेखकानंही त्याच्या कृतीचा जो अपेक्षित परिणाम ठरवलेला नाही, तोही जर अधिकाधिक विचार केल्यामुळे चित्रकाराला दिसत असेल, तर काय करायचं? चित्रात जर तेच आलं तर ते लेखकाच्याही डोक्यावरून जाईल. म्हणजे नेमका कुठपर्यंत विचार करायचा? कधी कधी असंही होतं, की एक चित्र प्रत्यक्षात मी काढत असताना दुसऱ्याच चित्राची कल्पना मनात साकारू लागते. मग हातातलं चित्र कधी एकदा पूर्ण होतंय, इकडंच लक्ष लागून राहतं. हे होणं तसं बरं नव्हे; पण तसं होतं; हे मात्र खरं! असं व्हायचं कारण म्हणजे चालू असलेल्या चित्रापेक्षा, म्हणजे ज्या लेखनासाठी चित्र मी आत्ता करतोय त्यापेक्षा, मनात घोटाळणारी चित्रकल्पना ज्या दुसऱ्या लेखनावरून सुचलीय, ते जास्ती परिणामकारक असतं; जास्ती आव्हानात्मक असतं. साधारणपणे एखादं हस्तलिखित वाचलं, की त्यावरच विचार करायचा अशी माझी पद्धत आहे. परंतु होतं काय, की वाचलेलं स्क्रिप्ट मुळातच सुमार, भिकार असलं, की चित्र जाम सुचता सुचत नाही, म्हणून मग हाती असलेल्या दुसऱ्या हस्तलिखिताकडे मी वळतो. स्वतः लेखक आणि प्रकाशकही जेव्हा आपल्या पुस्तकावर बेहद्द खुश असतात तेव्हा त्यांची अपेक्षा, मुखपृष्ठकारानं