पान:निवडक अंतर्नाद.pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'खाणे' : एक भाषिक व्यवहार नीलिमा गुंडी मराठी भाषा परिषदेच्या सहकार्याने २००० सालात अंतर्नादमधून संसार भाषेचा हे सदर प्रकाशित झाले. मॅक्सिन बर्नसन, नीलिमा गुंडी, आशा मुंडले, विद्युल्लेखा अकलूजकर, तारा भवाळकर, मृणालिनी शहा, शरदिनी डहाणूकर, विजया देव आणि अशोक केळकर यांचे लेख त्यातून प्रकाशित झाले. त्या सदराची ही एक झलक. एखाद्या भाषेचा स्वभाव जाणण्यासाठी व्यवहारात शब्द झोकून देण्याची तिची रीत लक्षात घ्यावी लागते. त्यासाठी तिच्यात नाम, विशेषणे, क्रियापदे यांच्याशी निगडित असे किती शब्दप्रयोग आणि वाक्प्रचार आहेत याचा शोध घेणे मनोरंजक ठरते. उदाहरणार्थ, आपल्या मराठी भाषेत 'खाणे' या एकाच क्रियापदाशी निगडित असलेले शब्दप्रयोग आणि वाक्प्रचार यांचा येथे विचार करू या. त्याआधी हेही लक्षात ठेवायला हवे की वाक्प्रचार हा जसाच्या तसाच वापरावा लागतो. जर एखाद्यावर खार खाणे (म्हणजे एखाद्याचा रागराग करणे) ह्य वाक्प्रचार 'एखाद्याने खार खाणे' असा वापरला, तर त्यातील अर्थ भुईसपाट होईल! 'खाणे' शी निगडित आणखी काही मासलेवाईक शब्दप्रयोग असे आहेत : (१) वारा खाणे, (२) खस्ता खाणे, (३) पैसे / लाच खाणे, (४) मार खाणे, (५) दात-ओठ खाणे, (६) दम खाणे, (७) डोके खाणे, (८) शेण खाणे, (९) ठेचा / ठोकर खाणे, (१०) गोते / गटांगळ्या खाणे, (११) धक्के खाणे, (१२) शब्द खाणे, (१३) एखाद्याचे शब्द खाणे, (१४) भाव खाणे, (१५) वेळ खाणे, (१६) जीव खाणे, (१७) कच खाणे, (१८) टक्केटोणपे खाणे, (१९) हार खाणे, (२०) डुलक्या खाणे, (२१) एखाद्याचे मन त्याला खाणे, (२२) हाय खाणे. ही यादी आणखीही वाढवता येईल. (तसा 'डबा खाणे हाही आपल्या दैनंदिन वापरातील लाक्षणिक शब्दप्रयोग आपल्या ओळखीचा आहेच!) भाषेतून समाजाचे अंतरंग कळते, असे म्हणतात. मराठी माणसाच्या आगळ्यावेगळ्या आहारक्षमतेचा हा पुरावा तर नव्हे ? यातून मराठी माणसाच्या प्रवृत्तीवर काय भाष्य करणार? मराठी माणूस खादाड मानायचा की बुभुक्षित ? की त्याच्या रांगडेपणाचे प्रतिबिंब या भाषिक व्यवहारात प्रतिबिंबित झाले आहे असे म्हणायचे? अर्थात हे सहज विनोदाचे बोलणे झाले. थोडे खोलात जाऊन आपल्याला भाषेतील अंगभूत अशी सुप्त अलंकरणशक्ती शोधता येईल. अमूर्तापासून मूर्तापर्यंत सर्व काही खाऊन पचवण्याची अजब अशी जिवट शक्ती सुचवण्याचा हा मार्ग तर नव्हे ? 'खाणे' म्हणजे केवळ 'मुखाद्वारे पदार्थ भक्षण करण्याची क्रिया' असा वाच्यार्थ येथे उरत नाही. त्याव्यतिरिक्त २८४ निवडक अंतर्नाद इतर अनेक अर्थ यातून सूचित होतात. कधी 'खाणे' म्हणजे 'वगळणे' - उदा. तो लिहिताना अधलेमधले शब्द खातो, कधी 'खाणे' म्हणजे 'वर्चस्व गाजविणे. उदा. अमुक एका चित्रपटातील खलनायकच चित्रपट खाऊन टाकतो. कधी 'खाणे' म्हणजे 'छळणे'. उदा. जीव खाणे, डोके खाणे, कधी 'खाणे' म्हणजे 'इंद्रियांच्याद्वारे' अनुभवणे.' उदा. मार खाणे, धक्के खाणे, तर कधी 'खाणे' म्हणजे 'मनाने अनुभवणे. उदा. हाय खाणे, या 'खाणे' गटातील मनाने अनुभवण्याच्या भावभावनांमध्ये किती विविधता आहे! राग व्यक्त करताना 'दात-ओठ खाणे' आणि पश्चात्ताप व्यक्त करताना 'एखाद्याचे मन त्याला खाणे' किंवा 'जिवाला खाणे', एकंदरीत, अगदी टोकाच्या भावभावनांची आंदोलनेही 'खाणे' शीच निगडित व्हावीत ना? सगळे रंग एकाच पांढऱ्या रंगात मिसळावेत तसे! अशावेळी 'खाणे' ही भाषिक क्रिया एकप्रकारे जगण्याच्या सारसर्वस्वाचीच प्रतिमा वाटू लागते. अत्र ही माणसाची सर्वांत पहिली मूलभूत गरज. त्यामुळे 'खाणे' ही क्रिया जैविक पातळीवरील सर्वांत महत्त्वाची कृती ठरते. तसेच सुसंस्कृत मानव बनण्याच्या प्रक्रियेतीलही ती पहिली पायरी ठरते. कारण मनुष्य हा एकप्रकारे प्राणी असला तरी त्याने काय खावे नि काय खाऊ नये (उदा. दुसऱ्याचे चोरून खाऊ नये, समोर इतर लोक उपाशी असताना खाऊ नये इ.) अशा नियमांचे पालन करीतकरीतच मानवी संस्कृतीची पायाभरणी झाली. त्यामुळेच 'पैसे खाणे, शेण खाणे' यांसारखे शब्दप्रयोग 'खाऊ नये ते खाल्ले जात आहे हे सुचवून सुसंस्कृतपणाची सरहद्द ओलांडल्याबद्दलचा निषेधच एकप्रकारे नोंदवून टाकतात! भाषिक व्यवहार हा शेवटी जीवनव्यवहाराचे एक अंगच असतो. त्यामुळे 'खाणे' शी संलग्न शब्दप्रयोगांतून आपली शारीरिक व मानसिक रगच कसाला लागत असावी! म्हणच आहे – चणे खावे लोखंडाचे, तेव्हा ब्रह्मपदी नाचे !' एकंदरीत, 'काहीही खाल तरच टिकून राहाल' असा जीवनव्यवहारासाठीचा मंत्रच या भाषिक व्यवहारातून जणू सुचवला जात आहे! ( फेब्रुवारी २००० )