पान:निवडक अंतर्नाद.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेक्सपीअरची महानता के. रं. शिरवाडकर* “शेक्सपीअरच्या कल्पनाशक्तीची अपूर्व किमया कशी शक्य झाली आणि कशी साध्य झाली हे कुणाला नीटसे कळले नाही आणि कळेलसे वाटत नाही. एवढे विपुल साहित्य लिहिणा-या या महाकवीने स्वतःच्या लिखाणाबद्दल एक शब्दही लिहू नये हे मोठेच आश्चर्य! नटाने रंगमंचावर घातलेली वेषभूषा जितक्या सहजपणे उतरून टाकावी तितक्या सहजपणे शेक्सपीअरने साहित्यभरणे दूर केली. आपल्या साहित्याबद्दल अथवा नाट्यानुभवाबद्दल तो कधीही बोलला नाही; अथवा त्याने त्याबद्दल कुठे लिहिले नाही.” शेक्सपीअरचे मोठेपण वादातीत आहे ह्यात शंकाच नाही, पण त्याने आपल्याला नेमके काय दिले? तत्त्वज्ञान? नीती? संदेश ? रंजन ? प्रबोधन ? खरे तर ह्यांपैकी एकच एक असे काहीच नाही. तसे थोडेफार सगळेच दिले असेल पण ह्यांपैकी एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी शेक्सपीअर वाचा असे आपण कोणाला सांगणार नाही. शेक्सपीअरने जे दिले ते ह्यापेक्षा वेगळे आणि ह्या सर्वांपेक्षा फार मोलाचे आहे. पण ते काय आहे ते निश्चितपणे सांगता येत नाही आणि कुणाला कधी समाधानकारपणे सांगता येईल असे वाटत नाही. शेक्सपीअरने दिले आहे ते जीवन; त्यातल्या विविधतेसह आणि सधनतेसह त्याच्या साहित्यातील जीवनाचा हा महासागर आपल्या उदरातील प्रचंड सृष्टी घेऊन आपल्याकडे येतो आणि आपण तो पाहून स्तिमित होतो. टेनिसनचा युलिसेस म्हणतो, I cannot rest from travel, I will drink Life to the lees, All times, I have enjoy'd Greatly, have suffered greatly, both with those That loved me, and alone.... I have become a name For always roaming with a hungry heart Much I have seen and known, cities of men And manners, climates, councils, governments I am part of all that I have met शेक्सपीअरची प्रतिभा असेच स्वगत म्हणत असेल; निदान या काव्यपंक्ती शेक्सपीअरच्या मुखातून स्वतःच्या साहित्यसर्जनाची प्रेरणा म्हणून शोभून दिसतात. युलिसेस अव्याहत फिरत होता भौगोलिक सागरावर, तर शेक्सपीअर मानव जीवनाच्या महासागरावर, शेक्सपीअर वाचताना अनुभवांच्या राशी आपल्यासमोर उभ्या राहतात, 'तिळा उघड' म्हणून आपण ह्या गुहेत प्रवेश करतो आणि ज्या वेळी परततो त्या वेळी समृद्ध मनाने पण भयचकित होऊन! ह्या गुहेत रत्ने पाहिलीत, कोळसे पाहिलीत, सर्प पाहिलेत, देवदूत भेटलेत, सैतानाला सामोरे गेलोत, कोकिळा ऐकल्यात, कावळे उडताना दिसलेत, किडे-कीटक होते तसे दिनोसारही होते, येथे मांगल्य आणि मलीनता, दुष्टता आणि सुष्टता, धैर्य आणि भेकडपणा, विश्वास आणि विश्वासघात, पाप आणि पुण्य ह्या साऱ्यांचीच जाण आली, तेही एकमेकांत गुंतलेले अडकलेले आणि कधीकधी एकामुळे दुसरे निर्माण झालेले. शेक्सपीअरच्या कल्पनाशक्तीची अपूर्व किमया कशी शक्य झाली आणि कशी साध्य झाली हे कुणाला नीटसे कळले नाही आणि कळेलसे वाटत नाही. एवढे विपुल साहित्य लिहिणाऱ्या ह्या महाकवीने स्वतःच्या लिखाणाबद्दल एक शब्दही लिहू नये हे मोठेच आश्चर्य! नटाने रंगमंचावर घातलेली वेषभूषा जितक्या सहजपणे उतरून टाकावी तितक्या सहजपणे शेक्सपीअरने साहित्यभरणे दूर केली. आपल्या साहित्याबद्दल अथवा नाट्यानुभवाबद्दल तो कधीही बोलला नाही; अथवा त्याने त्याबद्दल कुठे लिहिले नाही. एवढेच नव्हे तर गजबजलेल्या रंगभूमीचे मध्यवर्ती केंद्र असूनही आणि तीवर नाटककारांचे कडाडून वाद चालू असतानाही त्याने दुसऱ्या कुणाबद्दल अवाक्षरही काढले नाही, ह्याचा अर्थ असा होतो का की शेक्सपीअरने आपले लिखाण अगदी अलिप्ततेने केले? शेक्सपीअरच्या जीवनात एक विलक्षण अलिप्तता होती हे जितके खरे तितकेच त्याच्या साहित्यात विलक्षण सामीलकी होती हेही खरे तो स्वतःला दुरावला आणि जीवनात मिसळून गेला; जीवनाशी एकरूप झाला. हातात लेखणी घेतली तेव्हा तो स्वतःचा उरला नाही आणि लेखणी ठेवली तेव्हा तो साहित्याचा उरला नाही. शेक्सपीअरच्या नाट्याने रंग काळानुसार बदलत गेले. त्याच्या अभिव्यक्तीवरही बदलत्या काळाच्या छटा उमटत गेल्या. तात्यासाहेब शिरवाडकरांचे बंधू प्रा. के. रं. शिरवाडकर हे नांदेड येथील पीपल्स कॉलेजचे प्राचार्य व नंतर पुणे विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक होते. २६६ निवडक अंतर्नाद