पान:निवडक अंतर्नाद.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुपेंच्या म्हणण्याप्रमाणे "तिथे माझं सगळं लक्ष सतत वाजणाऱ्या साहेबांच्या घंटीकडे आणि फाईलचं ओझं आणणं आणि नेणं, याकडेच असतं!” "मग?" मी विचारलं, "मग काय, लिहायचं तर होतंच. मी आणि माझ्या सौभाग्यवतींनी यावर तोडगा काढला. संध्याकाळी साडेसहा वाजता माझं जेवण तयार असतं. ऑफिसातून आल्याबरोबर मी कपडे बदलतो. हात, पाय धुऊन लगेच जेवण घेतो. जेवणानंतर लगेच साडेसातलाच झोपतो. ऑफिसच्या थकव्यामुळे मला चांगली गाढ झोप येते. आणि त्यानंतर मी रात्री बरोबर अकरा वाजता उठतो. या वेळेस आमच्या झोपडपट्टीभागातदेखील शांतता असते! रात्री अकरा ते पहाटे चारपर्यंत मी सलग आपलं लेखन करतो आणि चारच्या नंतर पुन्हा सहा वाजेपर्यंत दोन तास चांगली झोप घेतो.” "... माझ्याजवळ अनुभवांचा साठा असल्याकारणाने माझं पेन भराभर चालतं. एकदा लिहिलं की ते माझं शेवटचंच लेखन असतं. (या विधानाला रीडर्स डायजेस्टवाल्यांनी अर्थातच खूप आक्षेप घेतले. सततचं पुनर्लेखन हे रीडर्स डायजेस्टच्या यशाचं एक मोठं रहस्य आहे. अशा प्रकारच्या पुनर्लेखनाशिवाय लेखनामध्ये परीपूर्णता येत नाही, यावर त्यांची अविचल श्रद्धा आहे. ) मी माझ्या ग्रामीण बोलीभाषेत लिहितो. सकाळी सहाला उठून स्नान, नाश्ता आटपतो आणि जेवणाचा डबा घेऊन नऊ वाजता ऑफिस गाठतो. " अशाप्रकारे तुपेंचं लेखन चालतं. या बाबतीत जिजाबाईंशीसुद्धा माझं बोलणं झालं आणि तुपेंच्या लेखक होण्यातील त्यांच्या सहभागाची मला पुरेपूर कल्पना आली. Behind every successful man there is a woman! तुपे स्वतः तिचा वाटा लगेच कबूल करतात. रीडर्स डायजेस्टच्या प्रश्नांमध्ये एक महत्वाचा प्रश्न असाही होता की, "लिखाणामुळे तुपेंच्या स्वतःच्या जीवनात, त्यांच्या स्वतःच्या वागण्यात किंवा लेखक म्हणून प्रसिद्ध झाल्यावरही चपरासी म्हणून काम करीत असताना लोकांच्या त्यांच्याकडे बघण्यात किंवा त्यांच्याशी वागण्यात काही फरक झाला काय ?” "नक्कीच !” तुपे म्हणाले, "मी माझ्या स्वत: मध्ये थोडं थोडं परिवर्तन किंवा सुधारणा नेहमीच करू इच्छितो. आज जो थोडाबहुत फरक मला जाणवतो त्याचा परिणाम माझ्या कुटुंबियांवरही झाला आहे. आमच्या सगळ्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला आहे. आणि या उत्साहाचा माझ्या लेखनावरही चांगलाच परिणाम झालेला दिसतो,” तुपेंचे शुभचिंतक डॉ. आनंद यादव म्हणतात, "आपण एवढं निश्चितपणे मानलं पाहिजे की उत्तमसारखे अनेक अनघड कलावंत सध्याच्या सामाजिक संक्रमण अवस्था काळात घडण्यासाठी धडपडत असतात. त्यांना घडण्यासाठी संधी उपलब्ध झाली नाही तर, ते तसेच काळाच्या पडद्याआड जातील. तेव्हा त्यांना कमीत कमी संधी उपलब्ध करून देण्याचं कार्य कलावंत म्हणून रसिक म्हणून, जाणकार म्हणून आपल्यावर पडतं!" तुपेंच्या पुणे पुरालेखागार कार्यालयात काम करणारे एक सहकारी - English Complier श्री. मुन्नवर रियासत खान म्हणतात : "मैं, उत्तम तुपे को करीबन २० सालसे जानता हूँ. ये काफी अच्छा लिखते है यहाँ ऑफिस में इनका लिटरेचर करीबन सभी लोग पढ़ते हैं, प्यून होने के बावजूद ऑफिस के लोग इन्हें अच्छी रिसपेक्ट देते है आगे भी इनका लिखाई का काम अच्छा चलता रहेगा, क्योंकि इनमें एक तडफ है. ऑफिस के लोगों के साथ अच्छा रुख है, क्योंकि इतना कम education होने के बावजूद ये इतने बड़े लेखक बन गये है. ये महज उनकी कोशीश की वजह से बन पाये तुपे परिवारात जे परिवर्तन घडत होतं, त्याचं थोडंसं चित्र मलाही दिसलं. आमचं संभाषण टेप करताना 'राणा' शेपटी हलवत मुकाटपणे कोपऱ्यात बसायचा, जराही भुंकायचा नाही! दोन्ही मुलं आणि सौ. तुपे अगत्याने माझी विचारपूस करीत. कधीही गेलं तरी ट्रेमध्ये चहा, बिस्किटं आणि तुपेंबद्दलच्या कात्रणांची फाईल माझ्यासमोर आणून ठेवत. झोपडपट्टीतील एका खोलीत बिऱ्हाड असूनसुद्धा सगळी भांडीकुंडी चकचकीत व नीटनेटकी लावलेली दिसायची. खोलीच्या एका कोपऱ्यात Black & White टीव्ही ठेवला होता. दारासमोरून येणारे जाणारे ओळखीचे लोक आदराने नमस्कार करीत असत. तुपेंकडे येणाऱ्या पत्रांची फाईलसुद्धा पाहायला मिळाली. त्यातली काही पत्रं मी Xerox करून घेतली. डायजेस्टकडे पाठविण्यासाठी. त्यांच्यात सामाजिक समरसता मंच, ३०९ शनिवार पेठ, पुणे यांचं ११-११-१९९३चं एक पत्र होतं. “आपले साहित्य व कला क्षेत्रातील योगदान सामाजिक समरसतेस मोठी चालना देणारे ठरले आहे. आपले कादंबरी, आत्मकथन, नाटक, कथा आदी स्वरूपांतील लिखाण जागृती निर्माण करणारे आहे. आम्हास कळविण्यास आनंद वाटतो की मंचाद्वारे नियुक्त केलेल्या समितीने या वर्षी रु.५,०००/- सन्मानपूर्वक समरसता पुरस्कार म्हणून आपणास देण्याचा निर्णय घेतला आहे. "आपणाकडून स्वीकृती मिळाल्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम निश्चित करण्याचा मानस आहे.” याचबरोबर तुपेंना आलेलं एक दुसरं पत्र होतं महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, यांचं १६ नोव्हेंबर १९९३चं. विषय होता मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतील पुस्तकांच्या हस्तलिखितांवर अभिप्राय देण्यास उत्तम बंडू तुपेंची संमती. " ही सगळी माहिती गोळा करून मी रीडर्स डायजेस्टच्या १२ प्रश्नांच्या उत्तरांबरोबर पुन्हा नवा सुधारित आठ पानी टाईप्ड लेख ८ डिसेंबरला पाठविला. सुटकेचा नि:श्वास सोडला. निवडक अंतर्नाद २६३