पान:निवडक अंतर्नाद.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आईवडील, पत्नी आणि मुलांना कोल्हापूरला नेलं. कोल्हापूरच्या त्यांच्या कौटुंबिक जीवनाचं वर्णन लीलाताईंनी लिहिलेल्या 'केंजाळ' ह्या लेखात आहे. 'आईला कधी आजीला विचारल्याशिवाय रोजचा स्वयंपाक रांधताना, आप्पांबरोबर कुठे जाताना किंवा साधं मनमुराद हसताना पाहिलेलं आठवत नाही. असं त्या लिहितात, 'ओलांडताना' ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लीलाताई लिहितात, 'साचेबंद स्त्रीत्वामुळे आईला बसणाऱ्या चटक्यांमुळे माझ्या स्वातंत्र्याला तिनं अडसर घातले नसतील का?' आपल्या घरातल्या वरच्या माडीवरचं आप्पांचं जग आणि अंधाऱ्या माजघरातलं आईचं जग अशा दोन भिन्न जगांचं वर्णन लीलाताईंनी केलं आहे. आप्पांची चांदीची सिगरेट केस, चांदीच्या मुठीचा केस विंचरण्याचा ब्रश, सुगंधी अत्तराचा फवारा मारणारी काचेची कुपी, कागद कापायची हस्तिदंती सुरी, त्यांच्या खोलीतला मऊ रेशमी गालिचा, येणारे जाणारे लोक, सुबक सुंदर खोलीतलं सामान आणि ह्याच्या अगदी विरुद्ध असं अंधाऱ्या माजघरातलं आईचं 'बाईचं' जग. त्या माजघरातली आईची ओबडधोबड लाकडी वेणीफणीची पेटी, पितळेच्या झारीतलं एवढंसं तेल हातावर घेऊन लहानशा आरशाच्या भिंगात गडबडीनं पाहात अंबाडा वळणाऱ्या आणि कुंकवाचं बोट कपाळावर टेकवणाऱ्या आईला पाहून मी म्हणे, 'तू का ठेवीत नाहीस आप्पांसारखा ब्रश, पोमेड आणि तसला मोठा आरसा ?' आणि लीलाताईंना त्यांची आई म्हणे, 'पुरुषांच्या त्या वस्तू बायकांना काय करायच्यात?' हे सर्व अत्यंत हृदयस्पर्शी आहे. मी माझ्या लहानपणी पाहिलेलं माझ्या आईवडिलांचं सहजीवन मात्र फार वेगळं होतं. रात्रीच्या अंधारात आप्पा-ताईंच्या कुशीत मी झोपी जात असे. मधेच अचानक झोप उलगडली तर बेडलॅपच्या ऊबदार वर्तुळात दोघंही इंग्रजी मासिकं किंवा नव्या जुन्या मराठी इंग्रजी पुस्तकांचं वाचन करताना दिसत घरी आलेल्या पाहुण्यांना 'आज ताई भेटणार नाही. कारण तिची कथा पूर्ण होईपर्यंत ती खोलीत बंद आहे.' असं सांगणारे आप्पा मी पाहिले आहेत. रोज संध्याकाळी एकत्र फिरायला जाणारे, नाटकासिनेमांचा एकत्र आस्वाद घेणारे, रात्री झोपाळ्यावर बसून दिवसभराच्या राहिलेल्या गप्पा मारणारे आप्पा-ताई मी पाहिले आहेत. त्यांनी दोघांनी मिळून खूप प्रवास केला. त्यावर 'त्रिवेंद्रमची यात्रा' आणि 'उटकमंडची सफर' ही दोन अत्यंत वाचनीय प्रवासवर्णनं ताईनं लिहिली. ताई लग्नानंतर नृत्य शिकली. तिनं नाटकात कामं केली. आप्पांच्या दोन घरांतल्या भिन्न वातावरणाचं कारण काय असावं? एकच वडील असलेल्या आम्हां भावंडांना इतकं वेगळं वातावरण का मिळावं? दोन चित्रं, दोन्ही तेवढीच खरी, कधी कधी • वाटतं लग्नबंधनात असलेल्या स्त्रीला स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्त्व वाढवता आलं नाही, परिस्थितीमुळे आणि जबाबदाऱ्यांमुळे ती अडकून राहिली आणि तिचा नवरा मात्र पुढे जात राहिला तर किती दुःख निर्माण होतं आणि कशी अंतरं वाढतच जातात.... त्यात दोष कुणाचाच नसतो. किंवा त्रिकोणाच्या तिन्ही कोनांचा असतो. ह्या प्रश्नाशी निगडित तिन्ही माणसं हयात नसताना उत्तर शोधणं योग्य २३८ निवडक अंतर्नाद ठरणार नाही. तसा प्रयत्नही मला करायचा नाही. 'पॅरलल लाईव्हज्' ह्या पुस्तकाचं सुनीताबाई देशपांडे ह्यांनी केलेलं 'समांतर जीवन' हे पुस्तक माझ्या वाचण्यात आलं आणि प्रतिभावंत नवऱ्याच्याबरोबर आयुष्य काढताना बाईची कशी फरफट होऊ शकते ते समजलं आणि त्रिकोणाचा तिसरा कोन का निर्माण होतो हेही समजलं. १९४२ साली आप्पा ताईंचा विवाह झाला, तेव्हा उठलेल्या सामाजिक प्रक्षोभाची कल्पना करून घ्यायची असली, तर डॉ. स्वाती कर्वे ह्यांनी संपादित केलेलं 'स्त्रियांची शतपत्रे' हे पुस्तक पाहावं. १८५० ते १९५० ह्या कालखंडात स्त्रियांनी लिहलेली १०० पत्र त्यात आहेत. त्यात दोन पत्र आप्पा-ताईंच्या विवाहाबद्दल आहेत. ती वाचली की ह्या तिन्ही व्यक्ती आणि अर्थात आप्पांच्या मुलांना कुठल्या अग्निदिव्यातून जावं लागलं, हे लक्षात येईल. त्याकाळी रविवार सकाळमध्ये स्त्रियांच्या पत्रव्यवहाराचं खास सदर असायचं आणि सुधामावशी ह्या काल्पनिक मावशी त्या पत्रांना उत्तरं द्यायच्या. २१ फेब्रुवारी १९४३चं हे पत्र आहे त्यातला काही भाग असा - 'फडक्यांसारख्या ख्यातनाम साहित्यिकाला व मानसशास्त्रज्ञाला तरी प्रथम पत्नीच्या सुखाचा विचार करायला नको का? त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या मनावर याचा काय परिणाम होईल ह्याचा विचार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर नाही काय?' ह्या पत्राचं उत्तर देताना दुसऱ्या लग्नात वयातील अंतरामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या समस्यांचा उल्लेख करून सुधामावशींनी लिहिलेली दोन वाक्यं फार बोलकी आहेत. 'व्यक्तिशः प्रो. फडक्यांच्या बाबतीत यापैकी काही घडणे शक्य नाही. हे जरी खरे असले, तरी सामाजिकदृष्ट्या विचार करता या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. कारण प्रो. फडके ह्यांची सांपत्तिक स्थिती, त्यांची बौद्धिक व सांस्कृतिक उंची, सौ. कमल फडक्यांची त्यांच्यावरील प्रीती व भक्ती या गोष्टी इतक्या प्रकर्षाने समाजात सापडणार नाहीत. " आप्पा-ताईंच्या आयुष्यातील ह्या अध्यायाबद्दल इतक्या विस्तारानं लिहिलं, कारण ह्या कालखंडाबद्दल माझ्या मनात संभ्रम होता, तोपर्यंत आप्पांना समजून घेण्यात मी असमर्थ होते. जेव्हा आप्पा-ताईंच्या आयुष्यातला हा भाग कुणालाही लहान किंवा मोठं, चूक किंवा बरोबर हे न ठरवता जसा घडला तसा मी स्वीकारला, तेव्हाच माझा संभ्रम नाहीसा झाला. आपल्या सगळ्यांचेच पाय (किंवा ग्रामीण भाषेत कुल्ले) मातीचे असतात हे सनातन सत्य स्वीकारलं आणि आपल्या प्राणप्रिय व्यक्तीलाही 'पेडस्टल'वर न चढवता, एक माणूस म्हणून त्याच्यातल्या गुणदोषांसकट आपलं म्हटलं, की नाती सशक्त होतात हे मी ताईकडूनच शिकले. त्यानंतर माझ्यातलं आणि आप्पांमधलं नातं, ते नसतानादेखील, आजही अगदी तेव्हा होतं तसंच राहिलं आहे. आपण प्रेम करतो त्या व्यक्तीला आपल्या प्रेमातून मुक्त करणं - टु लेट गो - किती आवश्यक आहे हे मी आप्पांकडून शिकले. त्यांनी आम्हांला कधीच बांधून ठेवलं नाही. म्हणूनच आम्ही सतत त्यांच्याजवळच राहिलो. (उर्वरित मजकूर पान २४५ वर)