पान:निवडक अंतर्नाद.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यानंतरही ह्या विषयावर कुणाला तरी विचारावं, निदान भावंडांमधे तरी बोलावं असा धीर मला झाला नाही. पण ते प्रश्न माझ्या मनात खोल कुठेतरी रेंगाळत राहिलेच असावेत. ताईमुळे मनोरमाबाईंचं आणि त्यांच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं ह्या विचाराची टोचणी मला कित्येकदा अस्वस्थ करीत असे. आप्पा आमच्यावर जिवापाड प्रेम करत. मग त्यांनी आपल्या त्या मुलांना वाऱ्यावर कसं सोडलं असेल, हाही विचार मला खुपत राहायचा, पण ती कोंडी फुटत नव्हती. काही कोडी सुटतच नव्हती. १९७७ मधे आप्पा उच्च रक्तदाबाच्या झटक्याने कोमात गेले. मी पंजाबात होते, रोहिणी देवळालीला. आम्ही पुण्याला धाव घेतली. आप्पा निजूनच होते. डोळे बंद होते. कानाशी बोललेलं त्यांना समजत होतं. बोलणं बरळल्यासारखं पण सुसंबद्ध होतं, ते आता ह्या अवस्थेतून बाहेर येतील का आणि आले तर कुठल्या अवस्थेत असतील ह्याबद्दल डॉक्टरही सांगू शकत नव्हते. ताई सावलीसारखी त्यांच्यापाशी होती. आवका बेळगावहून धाव घेऊन आली होती. सगळेच चिंतेत होते. अशात एके दिवशी दुपारी दारावरची बेल वाजली. मी दार उघडलं तर समोर लीलाताई उभ्या होत्या. ह्याआधी मी त्यांना कधी पाहिलं नव्हतं. पण त्या खूपच आप्पांसारख्या दिसल्या. लगेच ओळखलं मी त्यांना त्यांना आत बसायला सांगून मी ताईला बोलवायला गेले. ताईंनं स्वतः त्यांना आप्पांकडे नेले. आप्पांच्या कानाशी सांगितलं, "आप्पा तुम्हाला भेटायला लीला आली आहे." आप्पांना आधार देऊन बसवलं, पाठीशी उशी लावली. लीलाताई त्यांच्या पायांशी बसल्या. आप्पांचे डोळे मिटलेलेच होते. पण अस्पष्ट आवाजात आप्पा म्हणाले, "लीला, मला माफ केलंत ना तुम्ही? मला माफ करा आता." ते वारंवार हेच शब्द उच्चारत राहिले. त्यांच्या मिटलेल्या डोळ्यांमधून पाणी झरत होतं. लीलाताईंचे डोळे ओले होते. ताईंच्या डोळ्यांमधून आसवं गळत होती. तो क्षणच फार पवित्र होता. बाप-लेकीच्या भेटीचा तो प्रसंग पाहिल्यावर माझ्या मनातली कोडी सुटत गेली. आयुष्यात कधी असे प्रसंग उभे राहतात, की कुठलाही निर्णय घेतला तरी कोणी तरी दुखावलं जातंच. अशा कचाट्यात माझे वडील सापडले असणार आणि कोणाच्याही मते चुकीचा असला, तरी त्यावेळी त्यांना योग्य वाटला तो निर्णय त्यांनी घेतला असणार, पण ह्याचा अर्थ असा नाही, की पहिल्या पत्नीला किंवा मुलांना दुखावण्यात त्यांना काही वाटलं नव्हतं किंवा त्यांना कुणाची पर्वा नव्हती. इतकी वर्षं, त्या वेळेस घेतलेल्या कठोर निर्णयाची अपराधी जाणीव, त्यांनी मनात खोल कुठे तरी बाळगलीच होती. अर्धबेशुद्धीच्या त्या अवस्थेतही लीलाताईंना त्यांनी ओळखलं होतं आणि मनोरमाबाईंना आणि लीलाताईंना झालेल्या मनस्तापाबद्दल ते माफी मागत होते. लीलाताईंसाठीसुद्धा वडिलांबद्दलचं प्रेमच त्यांना आप्पांना भेटायला घेऊन आलं होतं... मानवी भावना किती अनपेक्षित रंग घेऊ शकतात ! ह्या प्रसंगानंतर नाती का विस्कटतात आणि नवी नाती का आणि कशी निर्माण होतात ह्याचा विचार माझं मन करू लागलं. वयानुसार अनुभवाचे टक्केटोणपे खाल्ल्यावर माझ्यातही परिपक्वता आली आणि बऱ्याच गोष्टींभोवतालचं धुकं वितळून मला स्वच्छ दिसू लागलं. आप्पांचा पहिला विवाह १९१६ साली झाला. तेव्हा ते २२ वर्षांचे होते. मुलं झाली, चारचौघांसारखा संसार झाला आणि वयाच्या ४२व्या वर्षी कमल दीक्षित ह्या १९ वर्षांच्या स्वप्नाळू डोळ्यांच्या, सुंदर, बुद्धिमान विद्यार्थिनीच्या ते प्रेमात पडले. तिच्याहून मोठी त्यांची मुलं होती. सुरळीत चाललेला संसार होता. तरीही दोघांची मनं एकमेकात गुंतली. ही कदाचित चूकच झाली त्यांची. ह्या रेशीम गाठी सोडवणं त्यांना जमलं नाही. एक गोष्ट मला तीव्रतेनं जाणवली, त्यांच्यासारख्या प्रेमाच्या त्रिकोणात अडकलेल्या काही नामवंतांनी आपल्या कृतीची जबाबदारी घ्यायचं टाळलं होतं. तसं करणं आप्पांना अधिक सोयीचं ठरलं असतं. विश्वासानं ह्यतात हात देणाऱ्या प्रेयसीला वाऱ्यावर सोडून स्वतःच्या सुरक्षित संसाराकडे परत जाता आलं असतं, आप्पा- ताईंवर गलिच्छ टीका करणाऱ्या काही नामांकित लेखकांनी तो प्रकार केलाही होता, असा भ्याडपणा माझ्या वडिलांनी केला नाही. त्यांनी नेहमीच आयुष्यात जे काही केलं ते उघडपणे केलं, त्याची जबाबदारी पत्करली आणि त्यासाठी समाजाचा रोषही सहन केला. पहिल्या पत्नीचा त्याग केल्याचा दोष त्यांनी स्वीकारला, पण ताईला त्यांनी एकटं सोडलं नाही. ताईनंही खूप सहन केलं. तिच्यावर समाजानं बहिष्कार घातला, महिला मंडळांनी निषेधसभा घेतल्या, परंतु आप्पांवरचा तिचा विश्वास आणि प्रेम तसूभरही कमी झालं नाही, 'एप्रिल-डिसेंबर' लग्न काय टिकणार अशी कुचेष्टा त्यांच्या वयातल्या बावीस वर्षांच्या अंतराला उद्देशून केली गेली. ही तरुण मुलगी ह्या वयस्कर माणसाला लवकरच सोडून देईल अशी भाकितं केली गेली. पण आयुष्याच्या शेवटपर्यंत दोघांचं प्रेम गडदच होत गेलं असं असलं तरीही आप्पांच्या स्वभावाच्या काही बाजू, काही कंगोरे जे आम्हांला ज्ञात नव्हते ते त्यांच्या पहिल्या कुटुंबाला अतिशय बोचले, अतिशय त्रासदायक वाटले ही सत्यस्थिती आहे एक पती आणि पिता म्हणून ते त्यांच्या पहिल्या संसारात अयशस्वीच ठरले. त्यांचा पहिला विवाह का मोडला ह्याची कारणं आप्पांना आणि मनोरमाबाईंनाच माहीत असणार, पण त्यांचं वैवाहिक जीवन पाहिलं तर आपण अंदाज मात्र करू शकतो. आप्पांचा आणि मनोरमाबाईंचा विवाह झाला, तेव्हा ते पुण्याला आईवडिलांबरोबर राहात होते. न्यू पूना कॉलेज (सध्याचे एस. पी. कॉलेज ) मधे प्राध्यापक होते. लग्नानंतर चारच वर्षांनी गांधीजींच्या असहकार चळवळीत भाग घेऊन त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर सहा-सात वर्षं दिल्ली, सिंध, हैद्राबाद, मुंबई, नागपूर अशा विविध ठिकाणी अस्थिर जिप्सीचं आयुष्य ते जगत होते. मनोरमाबाई सासू-सासऱ्यांची आणि मुलांची देखभाल पुण्याला राहून करीत होत्या. सासूच्या शिस्तीत रांधा वाढा- उष्टी काढा असंच त्यांचं आयुष्य असावं. आप्पा मात्र कादंबरीकार, व्याख्याता आणि प्राध्यापक म्हणून प्रसिद्धीच्या झोतात जगत होते. कोल्हापूरला राजाराम कॉलेजात नोकरी मिळाल्यावर आप्पांनी निवडक अंतर्नाद २३७