पान:निवडक अंतर्नाद.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अलंकरणासाठी वा बाह्य सजावटीसाठी येत नाहीत, अत्यंत तीव्र आणि तरल अशा इंद्रिय संवेदनांच्या द्वारा हा निसर्ग कवयित्रीच्या भाववृत्तींत भिनून गेला आणि आता अनंतात विलीन झालेला प्रियकर सर्वव्यापी होऊन या निसर्गप्रतिमांच्या द्वाराच कवयित्रीला पुन्ह्य वेगवेगळ्या स्वरूपांत दर्शन देऊ लागला. निसर्ग आणि अंतरीची विरलव्यथा यांचे झालेले हे अद्वैत केवळ विलक्षण आहे. इंदिराबाईंच्या कवितेत येणारा आणखी एक ठळक विशेष म्हणजे त्यांची अत्यंत उत्कट अशी रंगजाणीव त्यांच्या प्रतिमांत हे रंग वारंवार येतात आणि ते सर्व काव्यालाच एक वेगळे परिमाण देतात, अल्पाक्षरत्व, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमांची पखरण, दुःखभावनेचा विविध पैलूंतून झालेला आविष्कार हे इंदिराबाईंच्या काव्याचे आणखी काही ठळक विशेष आहेत. मुख्य म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात रविकिरण मंडळाचे संस्कार व्यक्त करणारी त्यांची कविता पुढे इतकी वेगळी झाली, इतकी त्यांची स्वतःची बनली की आज कवितेखाली 'इंदिरा' हे नाव नसले तरी ती कविता इंदिरेने लिहिलेली आहे, हे रसिकांना सहज कळते. इंदिराबाईंच्या कवितेची ओळ हीच जणू त्यांची सही असते! संजीवनी, पद्मा या ज्येष्ठ कवयित्रींच्या जोडीने इंदिराबाई कविता लिहू लागल्या. या दोन्ही कवयित्रींचे काव्यलेखन आता कालपरत्वे ओसरत गेले आहे. इंदिराबाईंची कविता मात्र आजही आपल्याला सातत्याने दर्शन देते. गेल्या चार तपांतला त्यांच्या कवितेचा विकास, विस्तार आणि वैपुल्य पाहिले म्हणजे मन विस्मयाने थक्क होते. शेला, मेंदी इथपासून तो गर्भरेशीम आणि अगदी अलिकडे प्रसिद्ध झालेले वंशकुसुम इथपर्यंत इंदिराबाई अव्याहत कविता लिहीत आहेत. वयपरत्वे कवितेचे स्वरूप बदलत गेले. दुःखाने त्यांना व्यक्तिगत पातळीवर उद्ध्वस्त केले खरे, पण हे दुःख हाच पुढे इंदिराबाईंचा जीवनाधार झाला. त्याच्या बळावरच त्यांनी जीवनातील विविध संघर्षांना धीराने तोंड दिले. कर्तव्यतत्पर गृहिणी होऊन मुलांचे संगोपन केले. मुख्य म्हणजे कवितेशी जोडलेले आपले नाते त्यांनी अगदी आजपर्यंत अतूट राखले आहे. जिवाभावाने सांभाळले आहे. आपल्या स्वतःच्या कवितेचे एका मुलाखतीत त्यांनी केलेले हे वर्णन अतिशय समर्पक पण तितकेच भेदक आहे इंदिराबाई म्हणतात, 'चाकूने किंवा सुरीच्या टोकाने मनगटावर घाव करावेत आणि त्या घावातून आलेल्या रक्ताच्या थेंबांकडे टक लावून बघत राहावं तशा या कविता आहेत. ' आपल्या कवितेचे असे वर्णन फक्त स्वतः कवयित्रीच करू शकते इंदिराबाईंनी गद्यलेखनही केलेले आहे. प्रारंभीच्या काळात त्यांनी कथा लिहिल्या. श्यामली, कदली, चैतू असे तीन कथासंग्रह त्यांच्या नावावर रुजू आहेत, पण एकंदरीने इंदिराबाईंची मराठी रसिकांच्या मनात जी प्रतिमा आहे, ती एका अभिजात प्रतिभासंपन्न कवयित्रीचीच आहे. या त्यांच्या काव्याचे रसिकांनी तर भरभरून कौतुक केलेच, पण साहित्य अकादमी पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा पुरस्कार, अनेक शासकीय पारितोषिकेही त्यांना लाभलेली आहेत. प्रारंभीच्या काळात इंदिराबाई आपल्या व्यक्तिगत दुःखात बुडालेल्या व त्यामुळे विलक्षण आत्ममग्न अशा होत्या. कालांतराने त्यातून त्या बाहेर आल्या आणि आपले गृहिणीपण सांभाळताना मुले-बाळे, भोवतालचे जीवन, त्यातले अनेक भावानुभव हेही २२ • निवडक अंतर्नाद कवितेत चित्रित करू लागल्या. 'डोळा वाटुली संपेना' ही त्यांची रंगबावरी संग्रहातून इथे घेतलेली कविता याच प्रकारची आहे. हे दुःखमान प्रणयिनीचे रूप नाही तर एका प्रपंचरत, घरगुती, मुलाबाळांत रमलेल्या गृहिणीचे, वत्सल मातेचे लोभसवाणे रूप आहे. मुला बाळांचे लाडकोड पुरवणारी, त्यांच्या संगतीत सुखावणारी एक आई इथे आहे. त्याचबरोबर ती मुले वयाने वाढल्यानंतर, आपापल्या मार्गाला लागल्यानंतर पुन्हा वाट्याला आलेल्या एकटेपणामुळे व्यथित होणारी अशी निखळ स्त्रीही आहे. हे आईपण कवयित्रीने या कवितेत कसे चित्रित केले आहे ते बघण्याजोगे आहे. इथे मुलांचे तपशील, त्यांची नावे न देता इंदिराबाई फक्त कधी मुलांची अंगत-पंगत, कधी त्यांचे अभ्यास व खेळ, कधी संध्याकाळी शाळा आणि खेळणे आटोपून घराच्या ओढीने परतल्यावर आईच्या कमरेला पडणारी त्यांची गाढ बाळमिठी या तुटक संदर्भातून एक मुला-बाळांनी भरलेले, हसते-खेळते आणि कदाचित घरात वडील नसल्यामुळे केवळ आईभोवतीच केंद्रित झालेले असे घर आपल्यासमोर साक्षात उभे करतात. हे सर्व चित्रण कवयित्रीच्या व्यक्तिगत अनुभवांतून आलेले असावे, इतके ते जिवंत आणि प्रत्ययकारी बनले आहे त्याबरोबरच कुठल्याही मध्यमवर्गीय कुटुंबाच्या चित्रासारखेच हे चित्र असल्यामुळे त्याला एक प्रकारची सार्वकालीन प्रातिनिधिकताही लाभली आहे. - या कवितेतली आई आता मुलांशिवाय ओक्याओक्या वाटणाऱ्या घरात इथे तिथे फिरते. त्याबरोबर त्या त्या खोलीशी, स्थळाशी निगडित असलेली अनुभवचित्रेही तिला दिसू लागतात. ती म्हणते. इथे रंगली पंगत, मिटक्यांची, भुरक्यांची साधासुधा माझा हात, बाळजीभ अमृताची आपला हात 'साधासुधा होता. जेवणातले पदार्थही काही खास नव्हते. पण मुलांच्या बाळजिभेतच अमृत भरलेले असल्यामुळे ते साधे पदार्थही ती कशी मिटक्या मारून, भुरके घेऊन खात होती! जेवणानंतर कवयित्री मुलांच्या खोलीत जाते. इथे तर त्यांच्या असंख्य आठवणी भरून राहिलेल्या आहेत. इथेच त्यांनी अभ्यास केला. इथे मुलींनी आपली भातुकली साजरी केली. इथे मुलांनी पतंग बनवले. भोवरे फिरवले. मुलींचा हदगा इथे • रंगला. आणि खुडलेल्या मोगऱ्याच्या कळ्या इथेच त्यांनी केसात हौसेने माळल्या, किती गोष्टी, किती गाणी, किती थट्टामस्करी क्वचित भांडणे देखील – इथेच झाली असतील. मुलांचे ते सुखी, खेळकर, प्रसन्न असे बाळपण आजही त्या खोलीत कवयित्रीला अगदी बारीक बारीक तपशिलांसह आठवते आणि तिचे मन व्याकुळ होते. घरातल्या खोल्या खोल्यांतून अशी हिंडत, जुन्या आठवणी मनात घोळवत कवयित्री अखेर घराच्या दारात येऊन उभी राहते. आणि मग तर काय, आठवणींचा पूरच घोंघावत येतो - खेळा-शाळेच्या मागून, दूर दूर दिसाकाठी सांजावता दारामध्ये, कमरेला घट्ट मिठी! खेळ, शाळा आयेपून मुले घराकडे परततात. सांजवेळ झालेली असते. आता आईची आठवण त्यांच्या मनात दाटून येते