पान:निवडक अंतर्नाद.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मग आज हे पत्र कशासाठी? तुम्ही विसरला असाल पण आपल्या मैत्रीची सुरुवातच माझ्या एका पत्रापासून झाली. १९७५ मध्ये आणीबाणी जारी होऊन सेन्सॉरशिप लागू असताना 'माणूस' मध्ये अनिल बर्वेची 'थँक्यू मिस्टर ग्लाड' ही लघुकादंबरी तुम्ही दोन भागांत दिली होती. त्या धाडसाचं आणि त्या कथेचं बेभान स्वागत करणारं पत्र मी 'माणूस कडे पाठवलं होतं. त्या अंकाच्या कव्हरपेजच्या पाठीमागच्या पानावर - जिथे बहुधा तुमचं संपादकीय टिपण असायचं तुम्ही ते संपूर्ण पत्र छापलं होतं. पुढच्या वीस-बावीस वर्षांच्या संवादाची ती नांदी होती. मात्र ते पत्र लिहायला मला कित्येक वर्षे लागली होती! - २ १९६१ मध्ये तुम्ही 'माणूस मासिक सुरू केलंत तेव्हा मी आठवीमध्ये होतो. आमच्या घरी मासिकाची वर्गणी भरण्याइतकी आर्थिक ताकद नव्हतीच तरीपण किर्लोस्कर, स्त्री, मार्मिक, कुमार ही नियतकालिके आसपासच्या कमीअधिक ओळखीच्या घरांतून आणून वाचत होतो, मासिकाचं नाव 'माणूस' असण्यातला ठोस अर्थ कळण्याचं ते वय नव्हतंच पण काही अंक पाहिले होते. आमच्या मराठीच्या पुस्तकात 'स्मृतिचित्रे' मधला बालकवींनी लक्ष्मीबाईंना 'माणूस' (शब्द) काढून दाखवला तो गमतीचा उतारा होता. 'माणूस' या गाजलेल्या सिनेमातलं 'कशाला उद्याची बात' गाणं आईच्या तोंडी होतं. त्या शब्दाशी याच दोन आठवणी जोडल्या असताना त्या नावाचं मासिकही असण्यात अपूर्वाईही होती. 'सांगत्ये ऐका' एका दिवाळी अंकात आल्यावर आम्ही कोल्हापूरचे असल्यामुळे आपल्या घरातल्या, ओळखीतल्या काही 'रसिक' मंडळींची नावं तर त्याच्यात आलेली नाहीत ना, अशी चर्चाही झाली होती. मात्र मी माणूसशी जोडला गेलो ते डेमी आकाराच्या अंकातून 'नाझी भस्मासुराचा उदयास्त येऊ लागल्यानंतर! सीरियल रहस्यकथेच्या पुढच्या भागाची जशी उत्कंठा वाटते, तसं ते ' रा. म. शास्त्री' या गूढ नावाने येणारं रूपांतर आमच्यासमोर दुर्बल राष्ट्र बलवान कसं करता येतं त्याची हकीकत जिवंत करत होतं. त्याच काळात संघातही जात असल्यामुळे हिटलरबद्दल ओढही होतीच, मी मन लावून हिटलरच्या उदयाची कहाणीच वाचली होती - पाडावाचा वृत्तांत धावता वाचला होता! त्या पाठोपाठ अरुण साधूंची आणि ड्रॅगन जागा झाला' ही लेखमाला आली आणि मी माणूसचा नियमित वाचक झालो. ‘फिडेल, चे आणि क्रांती', वसंत पोतदारांच्या 'अग्निपुत्र ची प्रकरणं वाचल्यावर थरारून जायला झालं होतं. माओ, फिडेल, चे यांच्या तर प्रेमातच पडलो होतो - हिटलर हळूहळू विसरतही होतो. मासिक पाक्षिक- साप्ताहिक असा 'माणूस'चा विकास ४/५ वर्षांतच अतिशय वेगाने झाला. त्यातच डेमी आकारातले अंक अतिशय देखणे असायचे. रोज लोकलने अपडाऊन करणाऱ्या मुंबईच्या वाचकांसाठी तो आकार स्वीकारला होता. योगायोगानं त्या आकारामुळे नासाडी होणार नाही अशा कागदाचा मोठा साठाही उपलब्ध होता, ही माहिती तुम्हीच नंतर सांगितली होती. डेमी पुस्तकाच्या आकारामुळे साप्ताहिकसुद्धा छोट्या पुस्तिकेसारखंच वाटायचं, टाकून देववत नसे. काही अंक फुटपाथवरच्या रद्दीत आले तरी तिथेही त्यांचा दिमाख वेगळाच असे. सुटसुटीत आकार, 'संगम' ची सुबक छपाई, विषयांची वेगळी निवड, वाचनीय मजकूर, परिणामकारक सदरे प्रत्येक अंकाला वेगळी ओळख बहाल करीत होती. सगळ्या विचारसरणींचे लेखक 'माणूस' मध्ये होते – जरी साधना, विवेक, सोबत, मार्मिक अशी त्या त्या विचारांची साप्ताहिकं होती तरी अगदी नवख्या युवकांपासून ते अनुभवी वृद्धांपर्यंत सगळ्या वयांचे लेखक हा आणखी एक विशेष, त्यांतले काही जण आधीच नाव कमावून होते, काही नंतर नावारूपाला आले, काही 'माणूस' मध्ये थोडे दिवस दिसले आणि नंतर गायब झाले. ललित लेखन, विचारक- अभ्यासक- विश्लेषक - निरीक्षक, लिहू शकणारे राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, लिहू न शकणाऱ्या पण निरनिराळ्या चळवळींचं नेतृत्व करणाऱ्यांच्या खयटोपावर वस्तुनिष्ठपणा कायम ठेवून पकड घेणारं लेखन करू शकणारे वृत्तांतलेखक - नुसती 'निवडक माणूस' ची अनुक्रमणिका पाहिली तरी हे सगळे प्रकार दिसतात; प्रत्यक्ष संख्या अजून खूपच मोठी होती. टायटल पेजवर नावांची गर्दी नाही, ब्रीदवाक्य, घोषणावजा वाक्य नाही. संपादकीयाचा आकार बेताचा, अग्रलेखाचा बडेजाव नाही. त्यात कुणाची 'काढणे' किंवा कुणाची 'उडवणे' ही मराठी संपादकांच्या हाडीमासी खिळलेली चापलुसी नाही, संपादकीयाखाली लफ्फेदार सही नाही - फक्त 'श्री. ग. मा.' अशी तीन अक्षरे 'माणूस' प्रतिनिधी म्हणून तुम्ही स्वतः काही लिहिलं असेल तरच तुमचा मोठा लेख अंकात असे. वाचकांची पत्रेदेखील मूळ अंकातल्या मजकुराची वैचारिक चर्चा काही पुढे नेण्याची गरज भासली तरच, एकूणच 'मेरी आवाज सुनो' या स्वभावाचे संपादक आसपास कंठाळी आवाजात 'आम्ही बजावून सांगतो असा फुकट राणा भीमदेवी किंवा 'आमचा नम्र सल्ला आहे असा कुचकट छद्मी रतीब घालत असताना 'माणूस' वेगळा आणि ताजा ठरला नसता तरच नवल! 'अकरा कोटी गॅलन पाणी' ही लेखमाला आली आणि त्यावेळी कॉलेजच्या मासिकात थोडेफार लिहिलेल्या मला 'माणूस'मध्ये आपलाही लेख आला आहे असं स्वप्न पडायला लागलं, कारण अनिल बर्वे माझ्याच बरोबरीचा हे मला माहीत होतं! 'माणूस' चा खप 'जनता' अंकानंतर पंधरा हजारच्या घरात पोचलेला भव्य मळेकरवाड्यात तुमचं ऑफिस. गर्दीचं तुम्हांला कायमच वावडं त्यामुळे कुठेही पॉप्युलर व्यासपीठावर तुमची हजेरी नाही, स्वतःची भ्रमंती चालू असल्यामुळे ऑफिसात गप्पा मारायची सवड नाही. एकदोन वेळा तुम्हांला लांबून पाहिलं तर भव्य व्यक्तिमत्त्व वगैरे काही नाही. एकदोन किरकोळ लेख पाठवले होते, त्यांचा स्वीकार सोडा, साधी पोचदेखील आली नव्हती. आता तुमच्यापर्यंत पोचायचं कसं आणि माझं लेखन 'माणूस' मध्ये यायचं कसं! ओळखीच्या लेखकांचं तुम्ही छापताच असं नाही तर लेखन पसंत पडलं, तुम्हांला हलवून गेलं तर त्या लेखकाची ओळख स्वतः करून घेता, हे तेव्हा माहीत नव्हतं. आणखीही एक अडथळा नव्हे पण अडचण होती. मीही तुमच्याप्रमाणे शालेय शिक्षण संपवून पुण्यात आलो होतो. मात्र निवडक अंतर्नाद २११