पान:निवडक अंतर्नाद.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्या दिवशी जर माझी आणि सरांची भेट झाली नसती, तर कदाचित मी साहित्यपरिषदेच्या निवडणुकीत भागही घेतला नसता. काही दिवसांतच निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला. सरांच्या विरोधी पॅनेलमधून मी निवडून आलो, पण सरांबरोबर काम करताना त्यांच्यातला माणूस, हाडाचा कार्यकर्ता मला वेगवेगळ्या कोनांतून समजत गेला. काही दिवसांतच निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला. सरांच्या विरोधी पॅनेलमधून मी निवडून आलो, पण सरांबरोबर काम करताना त्यांच्यातला माणूस, हाडाचा कार्यकर्ता मला वेगवेगळ्या कोनांतून समजत गेला. सर साहित्यसंस्थांचे आधारवड होते. संस्थात्मक पातळीवर निरपेक्ष बुद्धीने कसे काम करता येते, याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला होता. त्यांच्या कार्यशैलीविषयी लोकांमध्ये मत- मतांतरे होती; पण त्यांची साहित्यनिष्ठा, सचोटी, प्रामाणिकपणा यांबाबत मात्र कुणाचेही दुमत नव्हते. मराठी साहित्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या कर्तृत्वसंपन्न विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडविल्या शिस्तप्रिय प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून फर्ग्युसन महाविद्यालयातले त्यांचे विद्यार्थी त्यांचे आजही नाव काढतात. सरांच्या विद्वत्तेचे तेज त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरती झळाळत असे. त्यांचे लिहिणे आणि बोलणे अतिशय नेमके, सुस्पष्ट आणि आटोपशीर असे. 'अभ्यासोनि प्रकट व्हावे । नाहीतरी झाकोनी असावे।' या समर्थविचाराला त्यांच्या जीवनात मोलाचे स्थान होते. करारी चेहरा, आवाजातली जरब आणि अफाट व्यासंग यांमुळे माणसे त्यांच्याशी बोलताना बिचकत असत. त्यांचा एक प्रकारचा नैतिक धाक वाटत असे. त्यांची स्मरणशक्ती अफाट होती. संस्थेच्या घटनेतल्या बारीक सारीक तपशिलापासून ते वाड्मय इतिहासाच्या खंडातल्या एखाद्या संदर्भापर्यंत त्यांना अनेक गोष्टी मुखोद्गत होत्या. साहित्याचा इतिहास त्यांना सनावलीसहित पाठ होता. मी कधीतरी त्यांना गमतीने म्हणत असे, "सर, आपण साहित्यातले बाबासाहेब पुरंदरे आहात." या माझ्या टिपणीवर ओठ किंचित पसरट करीत ते स्मित करीत असत. सरांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा संसार मनोभावे केला. थोडी-थोडकी नव्हे तर आपल्या आयुष्यातली तीस वर्षे त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता या संस्थेसाठी दिली. कार्यकारिणी सदस्य, कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादक, कोशाध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कार्याध्यक्ष असा त्यांचा प्रवास घडत गेला. कार्याध्यक्ष म्हणून ते चौथ्यांदा निवडून आले होते. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी परिषदेच्या प्रतिष्ठेत भरच घातली. सातत्य हे त्यांच्या जीवनातले एक महत्वाचे सूत्र होते. वेळेबाबत ते खूप काटेकोर होते. त्यांच्या परिषदेत येण्याच्या व जाण्याच्या वेळा पाहून आपले घड्याळ लावावे इतके ते वेळेबाबत दक्ष होते. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांच्या समृद्धीसाठी परिषदेच्या माध्यमातून काम करताना त्यांनी याविषयी आस्था असणाऱ्या चांगल्या लोकांचे संघटन केले. मराठीच्या जुन्या-नव्या प्राध्यापकांना एकत्र आणले. त्यातून वाड्मय इतिहासाच्या खंडाच्या पुढच्या भागाच्या निर्मितीला चालना मिळाली. मुळात एखादा माणूस ज्ञानी असणे, त्याचा जनसंपर्क दांडगा असणे, त्याच्याकडे व्यवस्थापनकौशल्य असणे, एवढे सगळे असताना संस्थेसाठी काम करण्याची तयारी असणे आणि ही सारी गुणवत्ता एकाच व्यक्तीच्या ठायी असणे हा एक दुर्मिळ योग असतो. सरांकडे ही सारी गुणवत्ता होती, त्याच्या जोडीला तत्त्वनिष्ठ होती. त्यामुळे साहित्यसंस्थांचा संसार ते मनोभावे करीत होते. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा स्थायिभाव होता. एखादी गोष्ट नाही म्हणण्यासाठी जे धाडस लागते, ते त्यांच्याकडे होते. एखाद्या माणसाच्या अपरोक्ष त्याची निंदानालस्ती करण्यापेक्षा त्याला चांगले-वाईट काय असेल ते तोंडावर सांगण्यात ते कचरत नसत. त्यामुळे फटकळ अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती. त्याचे त्यांना दु:ख नव्हते. शासनाविषयी त्यांच्या मनात आदराची भावना होती. पण शासनाची भाषेसंदर्भातली भूमिका विसंगत असेल, तर ते कडक शब्दात त्याविषयी लेखात आणि भाषणात आपली भूमिका मांडत असत. साहित्यसंमेलनासाठी शासनाकडून मिळणारा निधी असो, साहित्य संस्कृती मंडळाकडून साहित्य संस्थांना मिळणाऱ्या अनुदानाबाबतच्या काही अटी असोत, जोगळेकरसरांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. त्यासाठी त्यांना अनेकांचा विरोध सहन करावा लागला, पण त्याची त्यांना तमा नव्हती, वाईटपणा विकत घेण्यासाठी जे एक प्रकारचे नैतिक धैर्य लागते ते त्यांच्याकडे होते. त्यामुळे वाईटपणा विकत घेणारा माणूस, पण संस्थेच्या भल्यासाठी, अशी त्यांची ख्याती होती. त्यांचा जन्म कर्नाटकातील जमखंडी येथे झाला होता. निवडक अंतर्नाद १९१