पान:निवडक अंतर्नाद.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बेडेकर अरविंद गोखले (कै.) अरविंद गोखले यांचा हा लेख त्यांचे चिरंजीव श्री. आनंद अरविंद गोखले यांनी अंतर्नादकडे दिला. लेख तसा जुना आहे. हस्तलिखितावरची तारीख मार्च १९८३ ची आहे. परंतु विश्राम बेडेकरांकडे पाहण्याच्या एका आगळ्या, वेधक नजरेमुळे हे लेखन पुन्हा प्रकाशित करणे योग्य वाटले. एका श्रेष्ठ लेखकाने दुसऱ्या श्रेष्ठ लेखकाच्या व्यक्तित्वाचा घेतलेला हा शोध वाचकांना आवडावा. राहून राहून वाटतं की या माणसाची व आपली मैत्री व्हायला हवी होती. वारंवार भेटीगाठी घडायला हव्या होत्या. याची आगळे अनुभव घेण्याची किमया व ते प्रत्ययकारी पद्धतीत मांडण्याचं कसब शिकून घ्यायला हवं होतं. लेखनातलं याच्या शब्दकळेचं कूळ आणि सिनेमातलं याच्या संहितेचं मूळ समजून घ्यायला पाहिजे होतं. हा माझ्याहून वयाने मोठा, बराच प्रसिद्धिविन्मुख, अतिशय बुद्धिमान, विलक्षण प्रतिभावान, स्नेह, सहवास जरासा अशक्यच. तरी पण ज्या आमच्या ओझरत्या गाठीभेटी झाल्या त्यामुळे ओळखीची ओढ वाटते. पण मीच आळस केला, अनास्था दाखवली. याच्याशी सलगी करण्यात हीरोवर्शिप, गुरुबाजी वगैरेचा वास येईल असं वाटून मीच... मूर्तिभंजक मनोवस्थेत असतानाच या माणसाचं नाव मला कळलं. किंबहुना हाती आलेल्या पुस्तकावर लेखकाचं नाव छापलेलं नव्हतं. त्यामुळे ते कळलेलं नाव अधिक लक्षणीय झालं. सवंग प्रसिद्धी, उथळ जाहिरातबाजी, परभूत लेखन, खोटी मूल्यं - या सर्वांविरुद्ध मन नुकतंच बंड करू लागलं होतं. पाश्चात्य साहित्याचा परिचय होत होता आणि मराठीत काही सकस, सर्वस्पर्शी वाचायला मिळत नाही याची खंत वाटत होती. अशा अस्वस्थ अवस्थेत नुकतीच प्रसिद्ध झालेली 'रणांगण' ही छोटेखानी कादंबरी हाती आली. एका बैठकीत ती मी झपाटल्यासारखी वाचून काढली. अन् मग विकत घेऊन वेळीअवेळी वाचत राहिलो. मला हवी तशी सकस, सर्वस्पर्शी, आत्म्याला हात घालणारी कलाकृती! 'रणांगण' या अपूर्व भावकथेने मी भारावून गेलो. मंत्रमुग्ध झालो. भावपूर्ण भाषा, आगळी शैली. अंतर्मुख करणाऱ्या, भावजीवन ढवळून यकणाऱ्या घटना अनोखी, विफल प्रेमाची कहाणी. जागतिक महायुद्धाची विदारक पार्श्वभूमी. अपूर्व, अक्षर ! 'रणांगण' मधील दोन- चार शब्दांची वाक्यं, अशा वाक्यांच्या मालिकेतून परावर्तित होणारा आशय, काळजात स्रवणारी भावनांची कारंजी आणि डोळ्यांपुढे येणारी रंगीत इंद्रधनुष्यं... .... उशासमोर पोर्टहोल होते. बाहेर नजर टाकली. आकाश झाकोळले होते. त्यामुळे सगळे खिन्न वाटे समुद्राचे डबके झाले होते. शांत आणि गढूळ. मध्येच थोडे ऊन पडले...' हे सुरुवातीचं वर्णन. अन् - '... ऐन तारुण्य, सगळे जग समोर सगळ्या शक्ती अधीन, आणि दोन मानवी जीव जवळ येतात. हात हातात घेतात. म्हणतात, हा भेटीचा क्षण अखेरचा! असे आयुष्यात सहसा कधी होते का? मृत्युवेळेशिवाय ? ही जीवाला घोर लावणारी प्रारंभीची खेळी. जुन्या स्मशानास, "मृत्यूच्या हिवाळ्याने पसरलेले पांढरे शुभ्र बर्फ !” अशासारख्या वेगळ्या विलक्षण उपमा, काळीज पिळवटत, डोळे विस्फारित एक करुणरम्य भावकथा कायमची झपाटून गेली. हॅर्टाची पत्रातली ती अखेरची वाक्यं तर मनावर कायमची कोरली गेली. '... अनेक दुःखांच्या आघातांनी, आशंकांनी, भीतीने माझ्या काळजाचे पाणी झाले होते. त्या मनाचा तू स्वीकार केलास. येशूच्या नुसत्या नजरेने पेल्यातल्या पाण्याचे सुंदर मद्य झाले ! तुझ्या स्वीकाराने माझ्या साठलेल्या गढूळ जीवनाला आशेची आरक्ती आणली! नेहमी कठोर भासणाऱ्या तुझ्या नजरेत क्वचित आर्द्रता चमकते, त्या खोल दडलेल्या झऱ्यांचा शोध लावण्यासाठी मन उत्सुक होते. तुझा कठोरपणा कितीही खणत राहावे लागले, त्यासाठी कष्ट पडले, प्राण कासावीस झाले तरी त्या श्रमात आनंद होतो. आणि शेवटी थकून जाऊन मनाचे वेडे पाखरू तुझ्या हाती सोपविले की पाहता पाहता तू स्वतःच नाजूक होतोस. मधुर शब्दांच्या फुलांचे, कल्पनांचे हिंदोळे बांधून देतोस, त्यावर झुलवीत बसतोस... हेच प्रीतीचे अपार वैभव माझ्या अपुऱ्या हातांनी लुटण्याचा मी वारंवार यत्न केला. तरीही ते उरलेच!' असल्या अनोख्या कलाकृतीचा लेखक अज्ञात राहून साहित्यातील या 'हॅपनींग' ला एक नवीनच परिमाण आलं. पण 'रणांगण' चे लेखक विश्राम बेडेकर आहेत हे उघड गुपित लवकर सर्वत्र फैलावलं. निनावी नाही, पण 'विभावरी शिरूरकर' निवडक अंतर्नाद १७७