पान:निवडक अंतर्नाद.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दया लोभ असावा... " हे सदर लिहिताना एक प्रकारे मीच स्वतःला शोधीत होतो, घडवीत होतो आणि माझ्या आयुष्याचं प्रयोजन शोधताना मी माझ्या वाचकांना त्यात सहभागी करून घेत होतो.” प्रिय भानू, हे पत्र जरी तुझ्या नावानं लिहिलं असलं तरी एका परीनं ते तुझ्याद्वारा 'अंतर्नाद' च्या सर्व वाचकांसाठीही आहे तुझं पत्र वाचलं, लक्ष्मणझुला हे सदर अंतर्नादच्या पहिल्या अंकापासून चालू आहे. ते या अंकातील सर्वांत जास्त चाललेलं सदर आहे याचा लेखक म्हणून माझ्या मनाला रास्त अभिमान आणि प्रकारे अपार समाधानही वाटत आलेलं आहे. त्यातच वेळोवेळी आलेली वाचकांची कौतुकाची पत्रं आणि "लक्ष्मणझुला हे सदर एका अर्थी अंतर्नादची फिलॉसॉफीच सांगतं' असे तू माझ्यापाशी काढलेले उद्गार यांनी 'झुल्याला' अंतर्नादच्याच नव्हे, माझ्याही विश्वात एक निराळंच स्थान मिळत गेलं. वास्तविक 'ज्याचा त्याचा बोधिवृक्ष' हा पहिला लेख प्रत्यक्ष लिहिला त्यावेळी ते सदर लेखन स्वरूपात चालवावं असं माझ्या मनातही नव्हतं. भानूच्या नव्या मासिकाच्या पहिल्याच अंकात आपला लेख हवा असा त्यानं आग्रह धरला आहे, म्हणून एक चांगला लेख लिहिण्याचा तो प्रयत्न होता. तुला तो लेख आवडला, मी सदर स्वरूपात तसे लेख लिहावे ही सूचनाही तूच केलीस. इतकंच काय, लक्ष्मणझुला हे सुंदर नावही तूच दिलंस. तेव्हा सदर आतापर्यंत आपला दर्जा टिकवून राहिलं, अंतर्नादच्या अतिशय चोखंदळ आणि दर्जेदार वाचकांमध्ये लोकप्रिय झालं याचं बरंच श्रेय माझ्याइतकंच तुझंही आहे हे प्रांजळपणे मान्य करण्यात मला आनंदच वाटतो. सर्वच सदरांना एखादी निश्चित कालमर्यादा असावी असं माझंही मत आहे, किंबहुना वाचकांनी 'आता थांबा' म्हणण्यापूर्वीच लेखकानं थांबण्यात मजा असते. यापूर्वी मी एकदा मुंबई सकाळ, दोन वेळा सोबत आणि तीन वेळा महानगर मध्ये जी सदरं लिहिली त्या प्रत्येक वेळी संपादकानं सांगितलेलं नसताना, किंबहुना ते •अजून लिहा म्हणत असतानाच, मी आपण होऊन ती बंद केली होती. त्यामुळे लक्ष्मणझुल्यालाही निश्चित कालमर्यादा हवी याबद्दल तुझ्या माझ्यात दुमत नाही. पण इतर सदरं थांबवताना मला जसं वाईट वाटलं त्याहून जास्त वाईट मला लक्ष्मणझुला थांबवताना वाटणार आहे इतकी माझी या सदराशी अॅटॅचमेंट झाली आहे. याला काही वैयक्तिक कारणं आहेत. माझं वय आज त्रेपन्न वर्ष म्हणजे हे सदर मी माझ्या पन्नासाव्या वर्षी लिहायला सुरुवात केली. माझ्या वैयक्तिक आयुष्यात या वर्षी दोन फार महत्त्वाची स्थित्यंतरं घडली. एक म्हणजे नुकतीच माझ्या हृदयावर बायपास शस्त्रक्रिया केली गेली होती. या शस्त्रक्रियेनंतर माणसाची मनःस्थिती फार नाजूक होते. आपण आयुष्याची 'दुसरी लीज' सुरू केली आहे याची जाणीव ही शस्त्रक्रिया किंवा अशा प्रकारचा महत्त्वाचा आजार तुम्हाला करून देतो. हे माणसाला अंतर्मुख करणारं स्थित्यंतर असतं. शिवाय याच काळात मी माझ्या वीस वर्षांच्या नोकरीनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली व आता अन्यत्र कोठेही नोकरी करायची नाही असंही त्याचक्षणी ठरवून ठेवलं होतं. अशावेळी आता उरलेलं आयुष्य जगण्याचं प्रयोजन मी शोधीत होतो. हा माझा शोध चालू असताना माझ्याकडून झालेलं वाचन आणि मनात चाललेलं चिंतन यांचं प्रतिबिंब लक्ष्मणझुल्यात उमटत होतं. हे सदर लिहिताना एक प्रकारे मीच स्वतःला शोधीत होतो, घडवीत होतो आणि माझ्या आयुष्याचं प्रयोजन शोधताना मी माझ्या वाचकांना त्यात सहभागी करून घेत होतो. अखेर वाचकाशी माझं नातं हे एवढं जवळचं आहे, एवढं आपुलकीचं आहे. माझ्या भावविश्वात मी त्यांना सहभागी करून घेतलं आहे! मागे वळून आत्तापर्यंत या सदरात आलेल्या विषयांकडे पाहिलं तर काय आढळून येतं? या सदरात जीवनाच्या विविधांगांनी घेतलेल्या शोधाला विज्ञानाचा स्तर होता पण विज्ञानाचा तर्ककर्कशपणा नव्हता. जीवनातल्या 'सत्य- शिव सुंदरा वर मनापासून केलेलं प्रेम होतं, सौंदर्याचा शोध होता, व्यक्तीपलीकडे जाऊन समष्टीचा विचार होता आणि या समष्टीत सारी मानवजातच नव्हे तर निसर्ग, पुढल्या पिढ्याही होत्या. पर्यावरणाविषयी प्रेम होतं, काळजी होती... या सदराच्याद्वारे मी स्वतःच घडत होतो असं जे मी म्हणतो ते हेच. आधी उल्लेखलेल्या माझ्या वैयक्तिक जीवनातल्या स्थित्यंतरांनंतर गेली तीन साडेतीन वर्षं मी काय करतोय याचं मला मिळालेलं उत्तर लक्ष्मणझुला हे होतं. 'झुला' थांबला तरी माझा हा शोध चालूच राहील. दरमहा अंतर्नादमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखाच्या स्वरूपात नव्हे तर अन्य काही प्रकारे मला माझ्या साया वाचक सुहृदांस या शोधात कसं सहभागी करून घेता येईल या विषयी माझ्या मनात काही विचार आहेत. ज्या वाचकांना या प्रकल्पात रूची असेल त्यांनी माझ्याशी स्वतंत्रपणे संपर्क साधावा. अधिक काय लिहिणे? असाच दयालोभ ठेवावा ही विज्ञापना, तुझा, लक्ष्मण (जानेवारी १९९९) निवडक अंतर्नाद १५