पान:निवडक अंतर्नाद.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ती अडखळली, पुन्हा पुन्हा तिने तो शब्द वाचला आणि मग ती भडकली “What do you mean by distractingly beautiful?" “अर्थ अगदी स्पष्ट आहे," मी उत्तरलो, "म्हणजे तुमच्याही लेखी बाई म्हणजे एक distraction?" "मी कोणत्याही बाईंबद्दल ही कॉमेंट केलेली नाही. ही केवळ तुला दिलेली compliment आहे." “Compliment, my foot! म्हणजे तुम्ही आहात विश्वामित्र किंवा तत्सम कोणी ऋषी आणि मी तुमचा तपोभंग करणारी अप्सरा ?” "तपोभंग वगैरे सोडून दे, पण अप्सरा ही compliment आहे, एवढं तर मान्य करशील?" .... मी अजूनही मस्करीच्या मूडमध्ये होतो. मी केवढी मोठी चूक करतोय ह्याची मला कल्पनाच नव्हती. "सर, तुम्ही माझ्या प्रेमात पडला त्या क्षणी तुम्हांला माझ्यात फक्त एक सुंदर बाईच दिसली? आणखी काहीच नाही? तुम्हांला मी इतकी सुंदर वाटले? मी तशी नसते तर तुम्ही माझ्या प्रेमात नसता पडला?" "कम ऑन यार.... एवढी सिरीयस होऊ नकोस, शेवटी प्रेम हे प्रेम असतं, त्याची अशी काटेकोर समीक्षा नाही करता येत. ते मनानं समजून घ्यायचं असतं.” "तुम्हांला व तुमच्या प्रेमाला मनानं समजून घेत मी आलेय. इथे पोहोचण्यासाठी मी किती लांबचा प्रवास केलाय, काय काय सहन केलंय ह्याची कल्पना आहे तुम्हांला ? नाही सर, मला तुम्ही 'सिरियस होऊ नकोस' असं नाहीच म्हणू शकत मी ह्या नात्याकडे अतिशय गांभीर्याने बघते. कारण मी एकूण आयुष्याकडेच गांभीर्याने बघते. जरा मजेत त्याच्याकडे पाहावं इतकी 'मोहलत' मला त्याने दिलेली नाही. आणि हे नातं त्या आयुष्यातली अतिशय महत्वाची व मोलाची बाब आहे, असावी, असं मी मानते. तुम्हांला कळतंय का मी काय म्हणतेय ते?" मी गप्पगार, मानेपर्यंत बर्फात पुरलेला, "मी सुंदर आहे हे माहीत आहे मला. अगदी वीट येईपर्यंत लोकांनी मला हे ऐकवलं आहे - लहानपणापासून ते आतापर्यंत पुरुषांनीच नाही तर बायकांनीही कोणी प्रेमाने, कोणी मत्सराने, कोणी माझ्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग म्हणून, तर कोणी बायकांशी वागण्याची पद्धत म्हणून बायकांना म्हणे असं म्हटलं की गुदगुल्या होतात, त्यांचा इगो सुखावतो, मला नाही असं वाटत. कारण कळायला लागलं तेव्हापासून माझा हा रंग, ही त्वचा, हे नाकडोळे, हा बांधा ह्यांनी माझ्या व्यक्तिमत्त्वाची जागा व्यापून टाकली आहे मी लहानपणापासून खूप चांगली विद्यार्थी होते. प्रत्येक गोष्ट मुळापासून समजून घेणं हा माझा ध्यास होता. मी कधीही पाठांतर केलं नाही. शाळा- कॉलेजातली, शहरातली वाचनालयं चाटून पुसून साफ केली. मला परीक्षांत यशही उत्तम मिळालं. पण त्याचं श्रेय कधी माझ्या बुद्धिमत्तेला, मेहनतीला मिळालं नाही. जणू 'ही आहे ना सुंदर, मग तिला मिळणारच चांगले मार्क्स, असाच सर्वांचा आविर्भाव असे. मी कधीही माझ्या दिसण्याचा वापर केला नाही काही लाभ मिळविण्यासाठी नाही तसंच कोणावर छाप टाकण्यासाठीही नाही. कोणी माझ्यावर तसा आरोप करू नये म्हणून मी नेहमी घोळक्यापासून दूर असते. चार लोकांत मिसळत नाही. माझ्यातच मान असते. तुमच्या अध्यातमध्यात मी येत नाही. तरी माझ्यामुळे तुमचं लक्ष विचलित होतं. मग मी करायचं तरी काय?" ★ ★ ★ खरं होतं तिचं म्हणणं ती आपल्या जागी ठाम होती, कामात व्यग्र होती; विचलित होत होती तिच्याभोवतालची माणसं. (मी एकटाच तसा नव्हतो, हेही लौकरच कळलं मला.) म्हैसूरच्या त्या मुक्कामातले तीन दिवस संपले. चौथ्या दिवशी सकाळीच निघायचं होतं. माझ्या सगळ्या भाषणांना ती ● आली होती. शांतपणे नोट्स घेत होती. पण भाषणानंतर माझ्याभोवती पडणाऱ्या गराड्यात ती नसायची. शेवटच्या भाषणानंतर सगळ्यांशी बोलून मी निघणार तेवढ्यात ती आली. माझ्या दोन भाषणांतली तीन महत्त्वाची विधानं तिने टिपली होती, त्यांचे संदर्भ तिला हवे होते. त्यातले दोन मी लगेच सांगितले. तिसरं माझ्या नुकत्याच येऊ घातलेल्या पुस्तकातलं होतं. माझ्या उत्तराने तिचे समाधान झालेलं दिसलं. जाता जाता थबकून ती म्हणाली - "सर, तुमचा pregnant pauseचा मुद्दा महत्त्वाचा आहे. भारतात जागतिकीकरणाची आत्ता कुठे सुरुवात झाली आहे त्यामुळे त्याच्या परिणामांविषयी बोलण्यात आपण घाई करत आहोत असं नाही वाटत तुम्हांला ? हा पॉज अजून लांबवता नसता आला?” इट वॉज अ डॉट बॉल! त्यानंतरही मी जेव्हा जेव्हा जागतिकीकरणावर बोललो, तेव्हा तेव्हा तिची कॉमेंट किती समर्पक होती ह्याचा प्रत्यय मला येत गेला. मी तिला तिचं नाव विचारलं "सुचित्रा, सुचित्रा वेदान्त मी जयंत सरांच्या मार्गदर्शनात एम. फिल. करतेय. मार्चमध्ये थीसिस सबमिट करीन, " ती म्हणाली. "मग पीएच. डी. करणार ना?" "काही ठरवलं नाही अजून,” असं म्हणून ती निघून गेली. रात्री जेवताना तिचा विषय निघाला, जयंत म्हणाला, 'एकदम वेगळी मुलगी आहे विलक्षण बुद्धिमान, मेहनती, माझ्या आतापर्यंतच्या करियरमध्ये असा स्टुडंट मी पाहिला नव्हता. पण एकदम मनस्वी आहे. खरं तर पीएच. डी. चं निम्म्याहून अधिक काम तिने एम. फिल. मध्येच संपवलं आहे निवडक अंतर्नाद १५१