पान:निवडक अंतर्नाद.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वळणावर रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ आयुष्याच्या एखाद्या अडनिड्या वळणावर कोणी भेटलं आणि दोघांनी ते नातं उत्कट अलवारपणे सांभाळलं, तरी पुढे त्याचं काय करायचं हा तिढा कायमच राहतो. आपली प्रत्येक संवेदना पिंजून ती सूक्ष्मदर्शकाखाली न्याहाळणारा बुद्धीमान, संवेदनशील पुरुष व तितकीच कर्तबगार पण कणखर स्त्री यांनी आपल्या नात्याचा घेतलेला प्रगल्भ शोध... मला? आयुष्याच्या अशा अडनिड्या वळणावर का भेटलीस तू हे एकच वाक्य पिंजत बसण्याचा एकमेव अजेंडा घेऊन एकांताच्या निबिड अरण्यात येऊन बसलोय मी! लहानपणी आमच्या गल्लीच्या टोकाला उस्मानभाई पिंजाऱ्याचं घर होतं. दुपारी संध्याकाळी, कधी कधी रात्रीदेखील त्याच्या खोलीतून कापूस पिंजणाऱ्या धनुकलीचा आवाज यायचा. मला त्या आवाजाचं वेडच लागलं होतं. तो आवाज कुठून येतो हे पाहायला एकदा मी त्याच्या घरी गेलो. कोणालाही नकळत त्याच्या खिडकीचं दार उघडून आत डोकावून पाहिलं. मला ना उस्मानभाई दिसला ना त्याची धनुकली. साऱ्या खोलीभर उडणारे रुईचे पुंजके न् त्या पुंजक्यांच्या ढगातून येणारा भुंग्याच्या गुंजारवासारखा आवाज ह्यांच्या आत उस्मानभाई व त्याची धनुकली पार लपून गेले होते. आता मीही उस्मानभाई बनून ह्या एका वाक्याच्या चिंधोट्याचिंधोट्या करणार. मग त्यातला एकेक तंतू घेऊन तो पिंजणार, गहन एकांताच्या गुहेत मी, गुंजारव करणारं माझं मन आणि आम्हांला व्यापणारी अर्थांची असंख्य वलयं, उडणाऱ्या रुईच्या म्हाताया क्या बात है! ★ ★ ★ मी स्वतःशी मारे कापूस अन् धनुकलीच्या बाता मारतोय, पण फॅक्ट ऑफ द मॅटर इज अॅज फॉलोज् - पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा, पहाटे पाच वाजून दहा मिनिटांनी मला डाव्या खांद्यातून जाणारी वेदनेची सूक्ष्म लहर जाणवली. मी नुकताच ध्यान करायला बसलो होतो. माझं मन सजग होतं व संवेदना अतिशय लख्खपणे जाणवत होत्या. पहिली कळ ओसरली तोच दुसरी आली. पहिलीहून अधिक तीव्र, ह्यावेळी ती दंडातून खांद्यात व तिथून खाली पाठीत पसरली, तिसरी कळ खांद्याकडून छातीकडे पसरत असताना मी माझे अवघं चित्त एकाग्र करून तिच्याकडे पाहिलं. साक्षीभावाने पाहिलं. हृदयाचे स्नायू आकुंचित होत असताना त्या वेदनेशी मी डोळा भिडवला व मला तिची खूण पटली. त्या स्पंदनांवर हेच वाक्य कोरलं होतं - 'आयुष्याच्या अशा अडनिड्या वळणावर का भेटलीस तू मला?' गेली बावीस वर्षं ह्या वाक्याशी लपंडाव खेळल्यावर आज त्याच्याशी नजर भिडविण्याची वेळ येऊन ठेपली होती. •नेमकं सांगायचं तर बावीस वर्षं, एक महिना व अकरा दिवस. चौदा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव, म्हैसूर विद्यापीठाच्या अॅकेडेमिक स्टाफ कॉलेजमध्ये सामाजिक शास्त्रांच्या प्राध्यापकांसाठी आयोजिलेल्या रिफ्रेशर कोर्समध्ये मार्गदर्शन करायला मला बोलावलं होतं. हे शहर आणि इथल्या विद्यापीठाचा परिसर ह्या दोन्ही माझ्या अतिशय परिचयाच्या व आवडीच्या गोष्टी! ह्या कोर्सचा समन्वयक जयंत शिरूर माझा जुना दोस्त. गेली दोन वर्षं मला इथे येणं जमलं नव्हतं म्हणून त्याने मला यंदा चार दिवस राहायला बोलावलं होतं. कोर्समध्ये दोन सेशन्स, एक-दोन मीटींग्ज, आणखी दोन भाषणं असा भरगच्च कार्यक्रम होता. मला प्लेनरीत बोलायचं होतं. त्यामुळे हॉल थोडा मोठा होता. शे- सव्वाशे माणसं असतील. जयंतने माझी ओळख खुसखुशीत पद्धतीने करून दिली, पण त्याचवेळी मी समाजशास्त्र व तत्त्वज्ञान ह्या दोन विषयांत कोलंबिया विद्यापीठातून मिळविलेल्या डॉक्टरेट्स, भारतीय व पाश्चात्त्य - दोन्ही ज्ञानपरंपरांविषयीचं माझं अध्ययन, माझी पुस्तकं व माझं देश-विदेशातलं फॅन फॉलोइंग ह्याचाही उल्लेख केला. इतकी वर्षं झाली; पण अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलण्यापूर्वी मी थोडासा कॉन्शस असतो. हळूहळू श्रोत्यांचा अंदाज घेत मी पुढे जातो. एकदा आवाज लागला, की मैफल कशी सजवायची- गाजवायची ते मला चांगलंच अवगत आहे. मी नेहमीप्रमाणे छोटे छोटे विनोद पेरत, म्हैसूरच्या जुन्या आठवणी सांगत सुरुवात केली. ओळखीच्या चेहऱ्यांशी नजरानजर होत होती. त्यातून मिळणारी दाद व स्नेह- आदराचा निवडक अंतर्नाद •१४७