पान:निवडक अंतर्नाद.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दिसायला लागला की ती सारी धावत सुटतात. वडाची गळून पडलेली पानं चघळतात. कोणी पारावर बसतात. एखादा बोकड आपले पुढचे पाय वडाच्या बुंध्यावर रोवून, मान उंच करून, ओल्या पापडासारखी गोल, हिरवीलूस पानं मटामटा खाणार किंवा खाली आलेल्या पारंब्यांची कोवळी टोकं तटातय खुडणार हे रोजचंच. मी त्यांच्या हालचाली निरखीत राहतो. कधी वाटलं तर उभ्या उभ्या त्यांची रेखाटणं करतो. असंच केव्हातरी केलेलं भुंडीचं रेखाटण मी त्या मुलीला दाखवलं विचारलं- 'हीच भुंडी ना?' ती हो - नाही काही बोलली नाही. चित्र बघत राहिली. बिनशिंगांची भुंडी शेळी मोठ्या चौकसपणानं, मान तिरकी करून काही शोधू पाहतेय, असं केलेलं ते रेखाटण होतं. मुलीच्या डोळ्यांत पाणी आलं. तिनं चित्राकडं बोट दाखवलं, म्हणाली - 'हीच भुंडी, हिलाच शोधतोय आम्ही. ' उन्हाचा ताप सपाटून होता. माणूस त्यात करपून जाईल. चिमुरडी खरोखरच करपली होती. तिचे पाय भेंडाळले होते. 'आता काय करणार?' 'खाली जाते. मंडईकडं बघते तिकडं आहे का,' 'मंडई संध्याकाळी भरते. आता तिथं कोण आहे?' 'कोणी नाही. पण मंडई उठल्यावर शिल्लक माल, टांबाटू, कोबी, मुळ्याचा पाला, खराब सबजी टाकून जात्यात. ते खायाला शेरडांना घेऊन आम्ही जातो की. भुंडी तिकडंच गेलीय का, बघते, असेल तिथं.' नेटानं पाय ओढत ती पोर गेली. दुपारी तीन वाजता त्या दोघी पुन्हा पारावर बसलेल्या दिसल्या. पिसं झडलेल्या मैनेसारखी म्हातारी अन् बावरलेल्या पिलासारखी तिची नात दिसत होती. हिरव्यागार टंच झालेल्या वडानं त्यांच्यावर गडद सावली धरली होती, तरी त्या दोघी सैरभैर झालेल्या. मी विचारलं - 'काय झालं?' 'आम्हांला वाटलं, आमची वाट बघत भुंडी पारावर येऊन उभी राहिली असेल, पण ह्यो एकलाच इथं उभा दिसतोय. ' माझ्याकडं केविलवाणं बघत म्हातारीनं विचारलं - 'दादा, भाकरतुकडा देशील?' ती माझ्याकडं मोठ्या आशेनं बघत राहिली. मी मागं वळलो. स्वयंपाकघरात काही शिल्लक होतं. दोघींना दोन भाकऱ्या, पीठ पेरून केलेली भोंगी मिरची आणि एक कैरी दिली. दोघी घास घेत राहिल्या. पण भुंडीच्या आठवणीनं, घास दोघींच्या, घशाखाली उतरत नसावा. मी विचारलं – 'शेळी अशी कशी हरवली?' 'काय कळत नाय. ' 'शेरडं होती किती?' म्हातारीचा हिशेब ह्यतांच्या बोटांवर म्हणाली – 'एक विसा तीन.' 'म्हणजे तेवीस?' 'हो.' 'आता किती आहेत?' 'एक विसा दोन.' 'शेळी हरवलीय हे तुला कसं कळलं?" 'कळलं.' 'सगळ्या शेळ्या काळ्या एकसुद्धा काळी पांढरी किंवा हरणासारखी तपकिरी, पांढऱ्या ठिपक्यांची नाही. ' 'त्या लई महाग असतात दादा. ' 'त्या कोणत्या जातीच्या ?' 'बाबरी.' 'आणि ह्या तुझ्या काळ्या ?' 'उस्मानाबादी, ' 'तू तुझ्या शेरडांना नावं ठेवलीयंस का?' 'न्हाय.' 'मग कसं ओळखणार? कोणती हरवली ते?' 'भुंडी हरवलीय' असं उत्तर देत पुढं म्हणाली – सकाळी इथंच आलो होतो. शेरडांचं खाणं- चरणं झालं की निघालो. एक ठिकाण सोडताना शेरडं मोजायचीच तशी मोजलीसुद्धा बरोबर होती. मग निघालो, उगवतीकडं तिकडून शाळेतली पोरं यायला लागलेली. लई मोठी रांग. त्यांना घेऊन मास्तर डोंगरावर चाललेला...' निवडक अंतर्नाद १३७