पान:निवडक अंतर्नाद.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

“भाभी? आगं कुठं? कुठं जायाचं?” "चल जलदी शेवे, जलदी चल." आयेशाबीनं बळजबरीनं खेचत शेवंताक्काला टॅक्सीत बसवलं. इकडं टॅक्सी सुरू झाली तसे तिकडं वाऱ्यानं सगळे पापड आभाळभर उधळले. पिवळ्या-पिवळ्या ठिपक्या होऊन गरगरत खाली रूळांवर, रस्त्यावर मातीवर, चिखलात, गटारांवर येऊन पडू लागले. "काय झालं भाभी? दंगल पेटली की काय?" "दंगल? दंगल को कौन डरताय शेवे? मेरे धनी को वो दंगल में तुम्हारे लोगोंने रास्ते में काट्या था तलवारसे, तबसे दंगलका भ्याच मेरे मनसे निकल गया. कौन डरताय दंगलको?” बोलता बोलता आयेशाबीने डोळ्यांना पदर लावला, ती गदगदून रडायला लागली तसा शेवंताक्काचा धीर सुटला. "बोलंनास गं भाभी? बोल की.” टॅक्सी सायन हॉस्पिटलच्या दारात थांबली. सगळीकडे नुसती बघ्यांची आणि रोग्यांची गर्दी, खोकल्याची ढास आणि औषधांचा वास. काऊंटरवर कसली तरी चौकशी करून आयेशाबी शेवंताक्काला खेचत एक वॉर्डात गेली. दोन-चार पोलीस आणि एक इन्स्पेक्टर, समोर एक झाकलेला मुडदा. भाभीनं इन्स्पेक्टरला सांगितलं, "ये है उसकी मां. शेवंताक्का.” "हा बडा सिंधीसाठी काम करायचा. सुरमा वंजारीचं आणि बड्याचं पहिल्यापासून वाकडं माटुंगा रेल्वेस्टेशनसमोर ह्याला आज अपोझिटवाल्यांनी गोळ्या घातल्या. " इन्स्पेक्टरच्या सांगण्याकडे शेवंताक्काचं लक्ष नव्हतं. थरथरत्या ह्यतांनी तिनं फडकं दूर केलं. कसल्यातरी भितीनं हणम्याचे डोळे विस्फारले होते. ते तसेच उपडे राहिलेले. बापासारखीच झुबकेदार मिशी लहानपणी चाळीच्या जिन्यातून गडगडत पडल्यावर कपाळाला खोक पडलेली. त्याची एक निशाणी, खालचा ओठ दातात अडकून फाटलेला, कानाच्या मागून एक रक्ताचा ओघळ. आता पोस्टमार्टम आणि पुढचं सगळं म्हणजे नगरसेवक बनसोडेलाच गाठायला पाहिजे, या विचारात आयेशाबी शेवंताक्काच्याजवळ सरकली. आभाळ फाटलेल्या शेवंताच्या तोडून शब्दही बाहेर पडेना. हुंदका तर नाहीच नाही. "दातखीळ बैठ्या है, लगता है।” स्वत:चं आडमुठं तिरपागडेपण सोडून ऊन जरा तिरकं व्हायला लागलं, तसं ते शेवंताक्काच्या सरळ सरळ बुबुळांतच घुसायला लागलं. बाजू बदलून बसावं तर समोर चार पाच महारोगी नकोच ते, हाय हे बरं हाय. एक हवालदार काठी आपटत आला. दम द्यायला लागला. "कुणी बसायला सांगितलंय?” "इसाकभाईनं.” "मं ठीक हाय कामाचा माणूस, चालू द्या." हवालदार निघून गेला. तिसरी टोपली अर्धा भरली होती. दुसऱ्या टोपलीचं झाकण किलकिलं करून एक नाग बाहेर डोकवायला बघत होता. उन्हानं शुद्धबधिर झालेली शेवंताक्का, नागाच्या किलकिलत्या नजरेकडं तिचं लक्षच नव्हतं. नागोबानं फट मोठी केली. हळूच मान बाहेर काढली. भीड चेपली तसं सगळं अंग सळसळत बाहेर आलं. रस्ता दिसेल तिकडं सुसाट पळालं. रिकामी टोपली गुपचूप फतकल मारून बसली. सुरवातीला दोन-दोन पाळ्या करणारा धनाजी कामाचाच कंटाळा करू लागला. एखादी पाळी केली नाही केली, मनानी मर्जी. पानं पिसायला पायजेत, दारू ढोसायला पायजे. पोरगं सरळ शाळा शिकंना आनी ह्यो बाबा संसारात लक्ष घालंना, आई जेवायला वाहीना आनी बाप भीक मागू देईना अशी अवस्था, कुठं एकटीने मी फुरं पडायचं? आनी किती फुरं पडायचं? जोडीला गिरणीचा संप रावणासारखा येऊन बसला मानेवर पाय देऊन, चाळीच्या चाळी हडबडल्या वस्त्याच्या वस्त्या गडबडल्या तोंडाचं पाणी पळालं. मनिऑर्डरची वाट बघणाऱ्यांच्या पोटाचा घास पळाला. हमाली तरी करावी. पण एकाचवेळी कितीतरी हजार नवीन हमाल रस्त्यावर कोणी हमाली द्यावी आणि कोणाकोणाला द्यावी? बायकांचे अगोदर कान मोकळे झाले, मागनं गळे मोकळे झाले. जुन्या फाटक्या चपला किती दिवस वापरायच्या? नव्या आणणार कुठनं? मातीमोलाला खोल्या विकून, डोक्यावर ट्रंका घेतलेले अनवाणी पाय मोकळे झाले. दिसेल त्या दिशेला पायवाय फुटू लागल्या. जमीन फुटलेली आणि आभाळ फाटलेलं, कोणी टाका घालावा ? कसा टाका घालावा? डोकं काम देईना, आतडं गप बसू देईना, दारूनं नशा येईना, तसा धनाजी स्पिरीट पिऊ लागला. त्याच्या भपकाऱ्याच्या वासानं खोली गुदमरू लागली. शेवंताच्या मनाची भिंत आतल्या आत ढासळू लागली. कोणाच्या तरी सांगण्यावरनं धनाजी नको नको म्हणताना शहापूरला गेला. नोकरी बघायला जातोय म्हणाला, खरं गेला वेगळ्याच कामाला. नागपंचमी तोंडावर आलेली. शहापूरच्या जंगलात जाऊन नाग पकडून आणू एकेक नाग हजार पाचशेला जातो. भांडवल काय लागतं सोबत ? एक पोतं आणि एक दोरी, दोस्ताबरोबर बावीस नाग पकडले. दलालाकडनं पैसे घेतले, दारू प्याला, नाग मोजून दिले. एका नागाचं तोंड अर्ध शिवायचं राहून गेलेलं. त्यातनं त्याची जीभ दातासकट वळवळली. धनाजीचं मनगट हिरवं काळं झालं. अगोदरच आतडं सडलेलं, त्यात दारूचा अंमल, त्यात नागाचं विष काळ्या ठिक्कर पडलेल्या धनाजीला वाचवायला शेवंताक्का हंबरडा फोडत धावली. खोली लिहून देते म्हणाली. "पैसे उभी करीन, वाचवीन धन्याला. " बाकीच्या चाळवाल्या म्हणाल्या, “आता कुठं खोली इकतीस मर्दिने ? जुगारासाठी खोलीवर अगोदरच धनाभाऊ पाच-पन्नास हजार उचलून बसल्यात. काय हातात पडलंच किडूकमिडूक, तर एखादं झोपडं घेता येईल तुला धारावीला, न्हाईतर गोवंडीला. निवडक अंतर्नाद •१२७