पान:निवडक अंतर्नाद.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नेमका अर्थ काय? अर्थ असा की, जणू तुम्ही या देशाचे नागरिकच नाही, कधी रे येणार तुमच्यामध्ये राजनैतिक चेतना आणि अस्मितेचा हुंकार ? जा, आता मी सांगतो तसं वागा. मतदानाच्या दिवशी सक्काळी सक्काळी आपल्या डेऱ्याच्या सर्व लोकांना नेऊन लायनीत उभं करा. या वेळी निवडणूक आयोग डोळ्यांत तेल घालून जागरूक आहे तुम्हांला मत यकण्यापासून कुणी अडवलं तर पोलीस येऊन त्यांना गिरफ्तार करतील, मी तुझ्या गावाचं नाव कलेक्टरांकडे देऊन ठेवतो. तुमच्या मतदानकेंद्राचं नाव अतिसंवेदनशील मतदानकेंद्रांच्या यादीत टाकतो. कुठे असतं तुमचं मतदान?" असं म्हणून सुखराम बाबूंनी आपली डायरी आणि पेन बाहेर काढलं. केंद्राचं नाव लिहून घेतलं. पलटू निघाला तसं त्याला बजावलं - "जा आणि निःशंक मनानं मतदानाच्या दिवशी वोट टाकून या. कुणी अडवलं तर पोलिसांना सांगा. यावेळी आपल्या इकडच्या बंदोबस्ताला 'पंजाब पोलीस येणार आहेत. मतदारांना सर्व तऱ्हेची सुरक्षा दिली जाईल. तरी कुणी मतदार स्वतःच भीती बाळगून घरात दबकून बसला तर पोलीस काय करतील? हे तू मतपत्रिकांचे काही नमुने घेऊन जा, हे माझं निवडणूक चिन्ह. त्यावर असा शिक्का मारायचा. हे सगळं आपल्या डेऱ्यातल्या लोकांना नीट समजावून सांग. शेवटी मीच अडीअडचणीला तुमच्या मदतीला धावून येणार, काळजी करू नका, अरे, जिथं तुमचा घाम सांडेल तिथं या सुखरामचं रक्त सांडेल. कधीही आजमावून बघा." सुखराम बाबूंच्या शेवटच्या वाक्यानं पलटूत नवीन उत्साह संचारला. त्यांची सगळी वाक्यं त्यानं त्यांच्याच स्टायलीत नक्कल करत बोलून दाखवली तेव्हा डेऱ्यातील सगळ्या घरांमध्ये चैतन्य सळसळलं, मत टाकायला जायचं म्हणून. आणि खरंच मतदानाचा दिवस उजाडला तसं अर्धा तास आधीच सर्वजण रांगेत जाऊन उभे राहिलं, तसं तर एक दिवस आधी मिसिरची माणसं येऊन धमकावून गेली होती की, मत देण्याचा अपराधाचा दंड भयानक असेल. पण कोणी ते मनावर घेतलं नव्हतं, उत्साहाच्या भरात त्यांचं शहाणपण हरवलं होतं जणू! आणि आता प्रातर्विधीसाठी बांसवाड्यात न जाण्याची शिक्षा अतिकठोर ठरत होती. डेऱ्याच्या चहूकडे जमीन त्यांचीच आहे. पूर्वेकडे मोठी आमराई, त्याला आठ फूट उंच भिंत घातलेली, दक्षिणेकडे इतर फळबागा आहेत, तर त्याला काटेरी तारांचं कुंपण घालून आत एक अल्सेशिअर मोकळा सोडून ठेवला आहे. उत्तरेकडे त्यांचंच शेत आहे आणि बांधा बांधावर रखवालदार असतात. राहिलं पश्चिमेकडचं हे मोठं अंगण आणि त्याच्याअलीकडे हे बांबूंचं बन. आता डेरावाल्यांनी जायचं तरी कुठं? झोपड्यांमध्ये तर कुठेही शौचाची जागा नव्हती. पहिल्या दिवशी सगळ्यांनी मधल्या मैदानात सहा बाय सहाचा एक पुरुषभर खड्डा खणला. सगळ्यांनी तिथेच विधी उरकले आणि वर माती लोटून दिली. पण दुसऱ्या दिवशीची माती जमिनीच्या लेव्हलपर्यंत येऊन पोचली, आणि दुर्गंधी अशी की खोपयच्या आत स्वयंपाक होणं मुश्कील झालं, पलटू पहिल्याच दिवशी सायंकाळी मिसिरच्या माणसांचा डोळा चुकवून सुखराम बाबूंना याची कल्पना देण्यासाठी बक्सरला गेला होता, दुसऱ्या दिवशी रात्री पलटू परतला, त्यानं सांगितलं, तो सुखराम बाबूंकडे पोचला तेव्हा ते विजय मिरवणुकीतून थकून भागून परतले होते. 'उद्या सकाळी तुझं ऐकू,' असं सांगून लगेच झोपायला निघून गेले. रात्री तो त्यांच्या कार्यालयात गेला आणि तिथल्या ओट्यावर तसाच उपाशी पोट दुमडून झोपला. सकाळी त्यांना भेटण्यासाठी खूप कासावीस होऊन प्रयत्न केले पण भेटू शकला नाही. बक्सर मोठं शहर, जिल्ह्याचं ठिकाण एकेक मोठाली माणसं येऊन त्यांना भेटत होती- अभिनंदन करत होती. गळ्यात हार घालत होती. मोठमोठ्या टोपल्या भरभरून मिठाया येत होत्या. सुखराम बाबू त्या आत पाठवत होते. मोटारगाड्यांची लाइन लागली होती. आतल्या खोलीत दाटीवाटीनं बसलेल्या लोकांकडून सुखराम बाबू अभिनंदनांचा स्वीकार करीत होते. तासन्तास तिथल्या चपराशाची विनवणी करून कसाबसा पलटू आत जाऊ शकला आणि त्यांच्यापर्यंत पोचू शकला. त्यानं रडत कढत आपली अडचण सांगितली. त्यांचा चेहरा गंभीर झाला. बऱ्याच वेळानं मौनभंग करून ते म्हणाले, "आता तू गावी परत जा. मी तिथं पोलीस पाठवतो. हा कुठला जंगली नियम? कुणाचं हगणं-मुतणं बंद करण्याचा त्यांना काय अधिकार? मग गरिबानं कुठं जायचं? मी बघतो... तू गावाकडं जा. मला तर आजच पटण्याला जावं लागेल. उद्या विधानसभेत शपथ घ्यायची आहे...” पटळूला सांगायचं होतं की पोलीस फोर्स पाठवा, मीपण त्यांच्याबरोबरच गावी जातो. पण तेवढ्यात तिथं बसलेल्या एका थुलथुलीत माणसानं संभाषणाचा ताबा घेतला - "सर मला विश्वास वाटतो की यावेळी तुम्हांला मंत्रिमंडळात नक्की जागा मिळेल. पण तसं नाही झालं तर हे घोषणा पत्राच्या विरुद्ध झालं, असंच मानावं लागेल. मग आमचे लोक गप्प बसणार नाहीत. आपलंच सरकार असलं म्हणून काय? आम्ही धरणं धरू आणि उपोषणं आयोजित करू तेवदी परवानगी असावी. " “धीर धरा, लोकहो, धीर धरा. आता आपलंच सरकार येईल. त्यात अन्याय कसा होऊ शकतो? म्हणूनच तर मी आज रात्रीच जातो आहे.” सुखराम बाबू हसत त्याच्याकडे वळून म्हणाले. पलटू त्या थुलथुलीत माणसाच्या तोंडाकडे पाहतच राहिला. कारण आता त्याच्याकडे कुणाचंच लक्ष जाणार नव्हतं. त्याची उपस्थिती सगळे जण विसरले. हास्य-विनोद सुरू झाले. थोड्या वेळानं पलटू उठला आणि सुखराम बाबूंना नमस्कार करत बाहेर पडला. तो गावी येऊन आता दोन दिवस झाले. कुठली पोलीस पार्टी आणि कुठलं काय! कोणी नेतापण फिरकला नाही आणि कोणी ऑफिसरपण नाही! सुमेसरच्या मनात सगळं घटनाचक्र एकदा वेगानं फिरून गेलं आणि त्याचं मस्तक सुत्र झालं का त्यानं केला इकडे येण्याचा आगाऊपणा ? इतरांसारखंच डेऱ्यावरच का नाही गेला? पण तिथल्या हगणवाड्यात आता तो पाऊल टाकू शकत नव्हता. निवडक अंतर्नाद ११९