पान:निवडक अंतर्नाद.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सद्बुद्धी मूळ हिंदी कथा : कुमार नयन अनुवाद : लीना मेहेंदळे असा काय गुन्हा केला होता आम्ही ? हां! एकच केलं होतं. यावेळी इलेक्शनमध्ये जाऊन मतं देऊन आलो होतो. हा काय असा मोठा गुन्हा आहे, ज्यासाठी दोन-दोन पिढ्यांचं नातं विसरून गेले? बस, हुकूम करून मोकळे झाले की, 'आजपासून या लोकांना आमच्या बासवाड्यावर शौचासाठी जाता येणार नाही. कुणी हुकुमाची बेदखल केली तर हरियासारखीच अवस्था केली जाईल.' वद्य पक्षाची दशमी एकादशी असेल. चंद्राची मंद कोर आकाशात जडवत थबकलेली वाटत होती. तिच्या अर्धवट प्रकाशात सगळं वातावरण अंधुक अंधुकच होतं. सुमेसर बसलाय बांबूच्या गचपणात तिथून पूर्वेकडे दीड-दोनशे पावलांच्या अंतरावर त्यांचे डेरे पडलेले. वर्षानुवर्षं आणि इकडे पश्चिम दिशेला जोगिंदर मिसिरची अवाढव्य कोठी, आणि कोठीसमोरच विस्तीर्ण अंगण, बांबूच्या जाळीतून सुद्धा अंगणात पडलेल्या बाजा आणि त्यावर झोपलेले मिसिरचे पहारेकरी स्पष्ट दिसताहेत. सुमेसरचं सगळं लक्ष त्यांच्याकडेच आहे विशेषतः एका बाजेखाली पहुडलेल्या अल्सेशियन कुत्र्याकडे. तोही पाय ताणून झोपला आहे, पण अधूनमधून खात्री केलेली बरी, उकिडव्या बसलेल्या सुमेसरनं पायाला रग लागत्येयसं वाटून पाय थोडा हलवायचा विचारच फक्त केला, पण तेवढंच निमित्त होऊन पायाखालची वाळकी पानं चुरमुरली आणि त्या आवाजानं सुमेसरला धस्स झालं. कुणी पहारा देणारा जागा झाला का? पण त्यांच्यात काही हालचाल नव्हती. अल्सेशिअनपण अजून तसाच पाय ताणून झोपला होता. श्वास रोखून सुमेसर अविचल बसून राहिला. बऱ्याच धाकधुकीनंतर तिकडे हालचाल होत नसल्याची खात्री पटल्यावर सुमेसर आपल्या कामाचा विचार करू लागला. म्हणजे शौचाचा, ते काम आता घाईनं उरकायला हवं होतं. त्यानं पोट वारंवार दाबलं, कुंथून कुंथून थुकून गेला. इतरही प्रयत्न करून झाले. घरून आणलेल्या तंबाखूच्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या एव्हाना दाढेखाली गेल्या होत्या. पण आतड्यातून काहीच बाहेर निघत नव्हतं. सुमेसरनं ऐकलं होतं की, भीतीमुळे पोयत मुरडा येऊन हगायला होतं. कितीतरी किस्से! बलेसरकाका अजूनही बेचाळीस- त्रेचाळीसच्या काळातला इंग्रजी अधिकाऱ्याचा किस्सा सांगतो. चौफुल्यावर उभं राहून हातात तलवार घेतलेल्या बलेसरकाकानं त्या इंग्रज अधिकाऱ्याला ललकारलं होतं, तर भीतीनं त्या अधिकाऱ्याची पँटच पिवळी होताना दिसली, खोटं बोलत असावा बलेसरकाका इथं तर भीतीनं गाळण उडालेली आहे आणि पोटातलं चलनवलन मात्र शून्य, अर्धा तास होत आला. सुमेसरला आता वेळेची काळजी लागून राहिली. चार वाजायला कितीसा वेळ शिल्लक असेल अजून? चार वाजले की तिकडे मिसिरच्या अंगणात जाग यायला सुरुवात होईल. मग ते पहारेकरीपण बहिर्विधीसाठी इकडेच येऊ लागतील - हे एक नवीन कारण झालं काळजी करण्यासाठी. अंगणातल्या बाजांवर अजून काही हालचाल दिसत नाही. अल्सेशिअनची शेपटी मात्र मधेच हलत्येय. कदाचित माशा बसत असाव्यात आणि तो शेपटीनं उडवत असावा. सुमेसर त्या भयंकर हिंस्त्र कुत्र्यावरच डोळे रोखून बसला आहे. - याला जरा जरी वास लागला आपण इथं असल्याचा तर शरीराचे लचके पडतील आतंकाची एक प्रचंड लाट सुमेसरच्या शरीराला थरथरून टाकत गेली. पण कुत्र्याची शेपूट आता पुन्हा शांत झाली होती. त्याच्या जिवात जीव आला. विचारांचं चक्र पुन्हा सुरू झालं. कुणीहीकडून बघा, आजचा त्याचा निर्णय आणि शौचासाठी इकडं मिसिरच्या बांबूच्या वनात येऊन बसायची कृती म्हणजे मूर्खपणाचा कळस होता हे नक्की. असं चोरासारखं इथे येण्याचा विचार त्यानंच का केला? त्यांच्या डेऱ्यावर इतर बापये नव्हते का ? आणि पुरुषच का, बायका आणि मुलंपण आहेत. ही समस्या काय त्याची एकट्याची आहे? एकूण आठ घरं आहेत. घरटी मोठी परिवार, साठ-सत्तर माणसांचा कबिला सगळ्यांनाच परसाकडे जाण्याच्या समस्येला एखाद्या मोठ्या अजगराप्रमाणं जखडून टाकलं होतं. आज तीन दिवस संपून चौथा दिवस, त्यानं कोणाशी सल्लामसलत न करताच हा धोका पत्करला. आता इथून सहीसलामत निसटणं म्हणजे धावत्या रेल्वेखाली दोन रुळांच्या मधे पडूनही जीव वाचवण्याइतकंच कठीण होतं. या दुस्साहसाचा परिणाम काय होईल ते मिसिरनं आधीच सांगून ठेवलेलं आहे. हे त्याचे जल्लाद पहारेकरी सुमेसरची गठडी वळून अंगणाच्या कोपऱ्यातल्या कोठीत टाकतील आणि अल्सेशिअनच्या तोंडी देतील. पुनः एकदा सुमेसरचा थरकाप उडाला. इतकं भय त्याला आतापर्यंत कधीच वाटलं नव्हतं. त्यानं निवडक अंतर्नाद ११७