पान:निवडक अंतर्नाद.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असं तू मला विचारीत नाहीस? रागावत का नाही खरंखरं? असं कसं तुझं वागणं आणि अशी कशीएस तू..? माणूस दूर असलं, की किती हळवं होतं याची जाणीव तुझ्या नजरेत दिसते मला आणि दूर असलेलं माणूस आजारी असलं तर.. आता पड़ा नं काय झालं ते. तुझ्या ऑपरेशनपूर्वी तू कशी होतीस ते सारखं आठवतं मला आणि ते दोन दिवस... त्या दोन दिवसांची आपली गॅदरिंग! पोरांसहित तू इथं आली होतीस, माझ्या गावाला! माझ्या एकुलत्या एका खोलीत! पोरं किती खुश होती! सकाळी खोलीसमोर दूधवाली कशी ओरडते, नळ कसा खाकरतो, दहीवाला कसा आवाज देतो, भाजीवाली कशी ओरडते यांचं मी आधीच अॅक्टिंग केलं होतं. पोरं ते पडताळून पहात होती, हसत होती. खिदळत होती. तू माझ्या लहानग्या संसारात भातुकली खेळत होतीस. मी लक्षपूर्वक पहात होतो. तुझी सहजता, स्नान झाल्यावर तुझं ते देवापुढे ह्यत जोडणं, हळदी कुंकवाची हलकी टिकली लावणं, हे एवढं कसं जमतं तुला इतक्या सहज ? पोरांबरोबर हसत खेळताना माझ्याशी मस्त गप्पा मारताना... मला असंच वाटत रहातं, की तुझ्यात आणखी एक तू आहेस, की मला वाटतं, तो भास आहे...? संध्याकाळी नांदेडला परत निघताना तुझी ती लगबग... मला दिलेल्या सूचना... "लोणचं त्या बाटलीत आहे, ते मेतकूटपण आणलं आहे, पीठ आठ दिवस पुरेल. रोज सकाळी लाडू खात जा..." आणि लाडूचा रिकामा डबा उघडून त्यात एक लाडू घातलास, सोबत घेतलास - का? "आईचा डबा आहे हा. तिला पाठवून देते..." किती सहज... असं कसं? तुम्हाला नांदेडला सोडून सोमवारी इथे आलो, ते सरळ ऑफिसला गेलो. स्वयंपाकाचा कंटाळा आला होता. बाहेरच जेऊन खोलीवर रात्री आलो. दार उघडून लाईट लावला. अन् भक्क उजेडात सगळं आठवलं. दोन दिवसांचा पोरांचा धिंगाणा... तुझा वावर, टापटीप... पंख्याच्या आवाजाची संगत घेऊन झोपलो. सकाळी दूधवालीनं विचारलं, "ग्येला का सगळा बाजार?" स्नान करून आरशात पाहिलं, तर कोपऱ्यात तुझी टिकली चिकटलेली! पोळ्या करायला बसलो. पिठाचा डबा उघडला. पाहिलं - डब्यात पीठ चोपून बसविलेलं होतं. पिठावर तुझं दोनही त उमटले होते. हातांच्या रेषांसहित... मला सांग, तू इथे दोन दिवस होतीस, माझ्या या खोलीत वावरलीस मी पहात होतो. लक्ष होतंच. माझं तुझ्या सगळ्या हालचालीकडं - मग हे उसे उमटवताना मला तू दिसली नाहीस? का? की माझ्या पिठावर तुझे हात तुझ्याशिवाय उमटले होते? त्या दिवशी बघ, मी स्वैपाक केलाच नाही. करावासा वाटला नाही मला! मला न सांगता सवरता तुझे हात कसे फिरतात माझ्यावरून? (दिवाळी १९९६) निवडक अंतर्नाद ९९